1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात

शिवसेना १६९, भाजप ११९ जागी लढणार

युतीची घटस्थापना
PTI
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीच्‍या जागा वाटपाचा तिढा नवरात्रीच्‍या पहिल्‍या दिवशी अखेर सुटला असून घटस्‍थापनेचा मुहुर्त साधून युतीने आपल्‍या जागावाटपचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य विधानसभेच्‍या 288 जागांपैकी शिवसेना 169 तर भाजप 119 जागांवर लढणार असल्‍याचे भाजप नेते गोपिनाथ मुंढे, शिवसेना कार्याध्‍यक्ष उध्‍दव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्‍यक्ष नितीन गडकरी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले.

गुहागर आणि घाटकोपरच्‍या जागेवरून दोन्‍ही पक्षांमध्‍ये असलेले मतभेद अखेर शुक्रवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या उपस्थितीत झालेल्‍या बैठकीत सुटला असून गुहागरची जागा शिवसेनेसाठी सोडण्‍यात आली आहे. तर त्या बदल्‍यात शिवसेनेने भाजपला घाटकोपर पश्चिम आणि मोशी हे दोन मतदार संघ दिले आहेत. गुहागरच्‍या जागेवरून विरोधी पक्षनेते रामदास कदम हे निवडणूक लढणार आहेत.

नव्या वाटाघाटीनंतर भाजपच्या दोन जागा वाढल्‍या असून त्यांच्‍या पदरात 119 जागा आल्‍या आहेत. तर सेनेकडे 169 जागा शिल्‍लक राहिल्‍या आहेत. शनिवारी याबाबत झालेल्‍या युतीच्‍या अधिकृत पत्रकार परिषदेत त्‍याची घोषणा करण्‍यात आली.

आता युतीमध्‍ये कुठलाही मतभेद नसून युतीचा संयुक्त जाहीरनामा लवकरच प्रकाशित केला जाणार असल्‍याचे यावेळी जाहीर करण्‍यात आले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा