मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. महाराष्ट्रातील किल्ले
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2023 (15:26 IST)

जंजिरा : शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनाही कधीच जिंकता न आलेला किल्ला

Murud-Janjira Fort
22 एकरांमध्ये पसरलेला, 22 सुरक्षा चौक्या असलेला आणि बांधकामासाठी 22 वर्षं लागलेला किल्ला...350 वर्षांहूनही अधिक काळ अजिंक्य राहिलेला किल्ला...शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटीश सर्वांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले, पण कोणालाही तो जिंकता आला नाही.
 
शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला जिंकण्यासाठी याच्यापासून जवळच एक दुसरा किल्लाही उभारायला घेतला, पण त्यांनाही जंजिरा जिंकण्यात यश आलं नाही.
 
मजबूत बांधकाम, एंजिनिअरिंगमधल्या तंत्रांचा वापर, देखणं स्थापत्य, सामरिकदृष्ट्या अत्यंत अचूक जागा...अशी सगळी वैशिष्ट्यं असलेला हा किल्ला मुंबईपासून दक्षिणेला 165 किलोमीटर अंतरावर समुद्रात वसलेला आहे.
 
अनेक हल्ले, आक्रमणं पचवून आजही ताठ उभा असलेला हा अजेय किल्ला आहे मुरूड जंजिरा.
 
रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राला लागूनच असलेल्या मुरुड तालुक्यात मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडपासून चार-पाच किलोमीटर अंतरावर राजपुरी गाव आहे. याच गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे.
 
हा किल्ला सिद्दींनी बांधला होता.
 
जंजिरा हा शब्द ‘जजिरा’ या अरबी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ बेट असाच होतो.
 
आभियांत्रिकीचा आविष्कार
जंजिऱ्याचा किल्ला हा 22 एकरांच्या परिसरात पसरला आहे. या किल्ल्याभोवती 40 फूट उंचीची भक्कम तटबंदी आहे. इथले स्थानिक सांगतात की, दगड मजबूतीने एकमेकांसोबत जोडण्यासाठी वाळू, चुनखडी, गूळ आणि वितळलेलं शिसं वापरलं गेलं होतं.
 
मुंबईतल्या के. जी. सौमय्या महाविद्यालयातील असिस्टंट प्रोफेसर गौरव गाडगीळ सांगतात की, जंजिरा किल्ला हा आभियांत्रिकातला एक आविष्कार मानला जातो. इतकी वर्षं गेली तरी तो टिकून आहे. अनेक सत्ताधीशांनी जंजिरा जिंकण्यासाठी आक्रमणं केली, पण हा किल्ला तसाच ताठ राहिला. जर तुम्ही किल्ल्याचं बांधकाम पाहिलं तर यामागची कारणं लक्षात येतात.
 
जर लांबून पाहिलं तर किल्ल्याचं प्रवेशद्वार नेमकं कोठे आहे, हेच लक्षात येत नाही. तुम्हाला प्रवेशद्वार कळलं, तरी बोटीने तिथे उतरणं अजून कठीण आहे. कारण इथे विशिष्ट अशी ‘लँडिंग स्पेस’च नाहीये. तुम्हाला थेट प्रवेशद्वाराच् पायऱ्यांपाशीच उतरावं लागतं.
 
अर्थात, तिथपर्यंत पोहोचण्याआधीच शत्रूला सामना करावा लागायचा त्याच्या तोफांचा. या किल्ल्यावर अनेक बुरूज आहेत. या प्रत्येक बुरूजावर असायची एक तोफ. त्यांपैकी काही तोफांची क्षमता तर दहा किलोमीटरपर्यंत मारा करण्याची होती.”
 
यातल्या एका तोफेचं नाव होतं ‘कलालबांगडी’. या तोफेचा जो हादरवणारा आवाज होता त्यामुळे कलाल आणि तोफेभोवती गोल आकार होता, जो बांगडीसारखा दिसायचा.
 
कलालबांगडी ही लांब पल्ल्याची आणि अजस्त्र तोफ होती.
 
शत्रूला आत येण्यापासून रोखण्यासाठीच मुळात या किल्ल्यात इतकी चोख व्यवस्था होती.
 
हे झालं बांधकाम आणि शस्त्रसुरक्षेबद्दल. पण नैसर्गिक गोष्टींचाही जंजिऱ्याच्या सुरक्षेसाठी मोठ्या खुबीने वापर करून घेण्यात आला होता. ओहोटीच्या वेळेसही इथे पाणी 30 फुटांपर्यंत खोल असायचं. त्यामुळेही किल्ल्याच्या सुरक्षेत भर पडत होती.
 
या किल्ल्याचं इंजिनिअरिंगच नाही, तर अंतर्गत सुरक्षाही इतकी चोख होती की, त्यामुळेच तो अभेद्य ठरला होता. जर कोणाकडून या सुरक्षा नियमांचं पालन करण्यात चूक झाली, तर एकच शिक्षा असायची- मृत्यूदंड.
 
मुईन गोथेकर सिद्दी हे किल्ल्यातले गाईड आहेत आणि सिद्दीचे वंशज. किल्ल्याच्या सुरक्षेबद्दल त्यांनी सांगितलं होतं- “जेव्हा किल्ल्यातली कोणी व्यक्ती बाहेर जायचा तेव्हा किल्ल्याच्या द्वारपालांकडून त्यांना एक विशिष्ट मोहोर दिली जायची. परत येताना ती मोहोर असेल तरच किल्ल्यात प्रवेश दिला जायचा.
 
जर कोणाकडून ती मोहोर हरवली किंवा इकडे-तिकडे ठेवली गेलीच, तर काहीही ऐकून न घेता त्या व्यक्तीला मृत्यूदंड दिला जायचा.”
 
या बेटावर आपला वचक बसवताना सिद्दींनी अतिशय कठोर आणि काहीशी ताठर अशी व्यवस्था निर्माण केली होती.
 
किल्ला, दारू आणि विश्वासघात
भारतात सिद्दींचं आगमन हे सातव्या शतकात झाल्याचं मानलं जातं.
 
सिद्दींचे पूर्वज हे पूर्व आफ्रिकेतील ‘बांतू’ जमातीतले. अरब व्यापाऱ्यांसोबत गुलाम म्हणून सिद्दी भारतात आले.
 
धिप्पाड आणि बळकट शरीरयष्टी, शौर्य आणि निष्ठा या गुणांमुळे भारतातील राजांनी त्यांना आपल्या सेवेत ठेवून घ्यायला सुरूवात केली.
 
अहमदनगरच्या निजामशाहच्या पदरीही सिद्दी होते. त्यांपैकी सुभेदार पीरमखानला निजामाने जंजीरा हस्तगत करण्याची जबाबदारी दिली.
शरद चिटणीस यांनी जंजीरा संस्थानाचा इतिहास या पुस्तकात लिहिलं आहे की, जंजिऱ्याचा ज्ञात इतिहास हा 1490 पासूनचा आहे.
 
त्यावेळी राजपुरीला प्रामुख्याने कोळ्यांची वस्ती होती. त्यांचा प्रमुख होता राम पाटील. समुद्री लुटारू आणि चाच्यांपासून बचाव करण्यासाठी या कोळ्यांनी बेटावर मेढेकोट उभारला होता. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी.
 
हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला.
 
तर या राम पाटील याचा बंदोबस्त करून जंजीरा मिळवण्याच्या कामावर निजामाने पीरमखानची नेमणूक केली.
 
पीरमखानने जंजिरा मिळवण्यासाठी बळाचा नाही, तर युक्तिचा वापर केला.
 
तुम्हाला ती अलिबाबा आणि चाळीस चोरांची गोष्ट माहीत असेलच ना...चोरांचा सरदार वेश बदलून अलिबाबाच्या घरी येतो. आपण तेलाचे सौदागर असल्याचं तो सांगतो. बरोबर आणलेल्या मोठ्या बुधल्यांमध्ये त्याचे साथीदार लपलेले असतात.
 
असंच काहीसं जंजिऱ्यावरही घडलं होतं.
 
डॉ. गाडगीळ यांनी सांगितलं की, “पीरमखानने व्यापाऱ्याचा वेश घेतला. समुद्र खवळला आहे आणि आमच्याकडे किंमती सामान आहे, आम्हाला आश्रय द्या, अशी विनंती त्याने राम पाटील यांना केली. कोळ्यांनी त्यांना रात्रीसाठी राहण्याची परवानगी दिली.
 
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पीरमखानने त्यांना स्वतःजवळची उत्तम प्रतीची दारू भेट केली. जेव्हा सर्व कोळ्यांवर दारुचा अंमल चढला, तेव्हा त्याने गलबतामधून पीरमखानचे बाकीचे सैनिक उतरले आणि त्यांनी कत्तल करत मेढेकोटाचा ताबा घेतला.”
 
‘एकांत’ नावाच्या एका कार्यक्रमात मुरुड-जंजिऱ्यावरील भागात डॉ. गाडगीळ यांनी त्यांची ही भूमिका मांडली होती.
 
गॅझेटीअर ऑफ बॉम्बे प्रेसिडन्सी : कुलाबा अँड जंजिरा (पृष्ठ 435-436) मधील नोंदीनुसार जंजिरा किल्ल्याचं बांधकाम हे अन्सर बुऱ्हाण शाहच्या (1508-1553) काळात सुरू झालं.
 
1636 मध्ये अहमदनगर पडलं तेव्हा जंजिऱ्याचा सुभेदार होता सिद्दी अंबर. निजामशाहीच्या पाडावानंतर तो विजापूरच्या सुलतानांचा निष्ठावान बनला. जंजिऱ्याचा सुभेदार या नात्याने या मार्गावरील व्यापारी आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेची जबाबदारी त्याची होती.
 
शिवाजी महाराज आणि जंजिरा
शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचं महत्त्व ओळखलं होतं. त्यामुळेच त्यांनी जंजिरा जिंकण्यासाठी प्रयत्न केले.
 
शिवाजी महाराजांनी सर्वांत आधी 1657 साली रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या नेतृत्वामध्ये जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली होती. पण तिला यश आलं नाही.
 
मे 1669 मध्ये स्वतः महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. त्यावेळी जंजिऱ्याचा सिद्दी होता फत्तेखान. त्याच्या अंमलाखालील प्रदेशात सात इतरही किल्ले होते. मराठ्यांनी हे किल्ले काबीज केले. राजपुरीवरही ताबा मिळवला.
 
फत्तेखानची कोंडी झाली आहे, हे लक्षात आल्यावर महाराजांनी त्याला जंजिरा स्वाधीन करा, आम्ही तुम्हाला भरपाई देऊ आणि स्वराज्यात योग्य सन्मान बहाल करू, असं कळवलं. फत्तेखान कबूल झाला, पण त्याच्याविरोधात बंड झालं. त्याला कैद केलं गेलं. सिद्दी संबूल जंजिऱ्याचा मुख्य सिद्दी झाला.
 
त्याने थेट औरंगजेबाकडे मदत मागितली. औरंगजेबाने त्याच्या मदतीला सुरतेहून गलबतांचा काफिला पाठवला. (डिसेंबर 1669). महाराजांची जंजिऱ्याची ही मोहीमही अयशस्वी ठरली.
औरंगजेबाने सिद्दीच्या गादीला याकूतखान ही किताब दिला.
 
महाराजांनी सागरी सामर्थ्य आणि आरमाराचे महत्त्व ओळखले होते, त्यामुळे त्यांनी पुन्हा दोन वर्षांनी म्हणजे 1671 मध्ये जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. पण अपयश आलं. सिद्दी कासिमने मराठ्यांच्या ताब्यातून दंडा राजपुरीही हिसकावून घेतली.
 
महाराजांनी जंजिऱ्याच्या पलिकडे असलेल्या बेटावर पद्मदुर्ग नावाचा नवीन किल्ला बांधण्याचं काम हाती घेतलं होतं, पण जंजिऱ्यावरून बरसणाऱ्या तोफा त्यात अडसर ठरत होत्या.
 
राज्याभिषेकानंतर महाराजांनी 1676 मध्ये मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली जंजिऱ्यावर पुन्हा आक्रमण करायचं ठरवलं होतं. जंजिऱ्याच्या तटावर शिड्या लावून फौज आता आत उतरवायची धाडसी योजना त्यांनी आखली होती. पण या योजनेतही काहीतरी चूक झाली. जंजिरा काबीज झालाच नाही.
 
शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनीही 1682 मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी समुद्रात पूल बांधण्याचाही प्रयत्न केला. संभाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम आखली त्याचवेळी औरंगजेबाने हसन अली या सरदाराला 40 हजारांची फौज देऊन स्वराज्यावर पाठवलं. संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडावी लागेल.
 
किल्ल्यावर घरे बांधली आणि पाडलीही
या बेटावर निसर्गही अतिशय आल्हाददायक आहे. चारही बाजूंनी समुद्राने घेरलेलं असूनही येथे गोडं पाणी उपलब्ध आहे.
 
गोड्या पाण्याचे दोन तलाव इथे असून हे पाणी शेतीसाठी वापरता येतं. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी या किल्ल्यात 550 कुटुंबीयांचं वास्तव्य होतं.
 
येथील रहिवाशांच्या वंशजांच्या म्हणण्यानुसार, सिद्दी या लोकांना शेती करण्यासाठी सांगत. त्यांना कपडे आणि अन्नपदार्थ पुरवले जात. तसंच याठिकाणी एक शाळाही होती. त्यामध्ये मराठी आणि उर्दू भाषेचं शिक्षण दिलं जाई
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिद्दींनी हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात दिला आणि स्वतः मध्य प्रदेशात इंदूरला स्थायिक झाले. तिथे त्यांचे एक नातेवाईक सिद्दी मोहम्मद खान हे राहत असत.
 
सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह त्यांचे सचिव व्ही. पी. मेनन यांनी लिहिलेल्या 'द स्टोरी ऑफ इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स' या पुस्तकात याबाबत लिहिलेलं आहे.
 
पुस्तकातील पान क्रमांक 141 वर ते लिहितात, “जंजिरा किल्ला मुंबई प्रांताच्या सरकारच्या ताब्यात देण्यात आला. आम्ही नवाबाला करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितलं, जेणेकरून मुंबई सरकारला संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेता येईल. त्याला ते सहमत झाले.
 
8 मार्च 1948 रोजी दख्खन प्रांताचं भारतात विलीनीकरण झालं. एकूण 815 वर्ग किलोमीटर इतका भूभाग भारतात समाविष्ट करण्यात आला. याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची संख्या सुमारे 17 लाख इतकी होती.
 
पण नंतरच्या काळात येथील रहिवाशांना किल्ल्यावर राहणं अवघड झालं. त्यामुळे त्यांनी जवळच्या गावांमध्ये जाऊन निवारा शोधला.
 
त्या काळी संध्याकाळनंतर समुद्र सफर करणं अत्यंत अवघड होतं. पावसाळ्यात वातावरण आणि बिघडत असे. अशा स्थितीत जलवाहतूक करणं अत्यंत धोकादायक बनायचं.
 
या कारणांमुळे, येथील रहिवासी हळूहळू किल्ल्यावरून बाहेर पडले. किल्ल्यावरून निघताना येथील नागरिकांनी आपणच बांधलेली घरे पाडली.
 
या घरांसाठी वापरलेलं बांधकामाचं साहित्य पुन्हा वापरण्यासाठी त्यांनी हे पाडकाम केल्याचं सांगितलं जातं.
 
1980 पर्यंत येथील सर्वच नागरिक किल्ल्यावरून मुख्य भूमीतील विविध गावांमध्ये आले. कालांतराने या किल्ल्याला एका सुनसान ठिकाणाचं स्वरुप प्राप्त झालं. त्यातही या पडीक घरांमुळे हे चित्र आणखी प्रकर्षाने जाणवतं.
 
सध्या जंजिरा किल्ल्याचं नियंत्रण 'आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया'कडे आहे. किल्ल्यात कुणीही परवानगीशिवाय प्रवेश करू नये, अशी नोटीस किल्ला परिसरात दिसून येते. गेल्या काही दिवसांत या किल्ल्याला पर्यटकांची विशेष पसंती मिळत असल्याचं दिसून आलेलं आहे.
 
Published By- Priya Dixit