काँग्रेसचा मोठा नेता करणार भाजपचा पूर्ण प्रचार
मुंबई – काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. कृपाशंकर सिंह हे अपक्ष किंवा कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवत नसले तरी त्यांनी भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे. कृपाशंकर यांचा जनसंपर्क तसेच उत्तर भारतीयांमध्ये त्यांच्या शब्दाला मान असल्यामुळे काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिरा-भाईंदरचे भाजपाचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांचा प्रचार करण्याचा निर्णय कृपाशंकर सिंह यांनी घेतला आहे. कृपाशंकर सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. काही दिवसांपूर्वीच कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला होता. परंतु त्यानंतर त्यांनी कोणत्याही अन्य पक्षात प्रवेश केला नव्हता. आता नरेंद्र मेहतांच्या प्रचारात ते सहभागी होणार असल्याने ते भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत.