मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By

Mahatma Gandhi Essay महात्मा गांधी यांच्यावर निबंध

मोहन दास करमचंद गांधी ह्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. त्यांचे वडील राजकोट येथे दिवाण होते. त्यांची आई एक धार्मिक स्त्री होत्या. स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन आणि देशाला स्वतंत्र करण्यात भाग घेतल्यामुळे त्यांना राष्ट्रपिता म्हणतात.
 
हे नाव त्यांना सर्वप्रथम नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांनी दिले. महात्मा गांधी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर इंग्लंड गेले होते जिथे त्यांनी न्यायशासनाचा अभ्यास केला. नंतर त्यांनी अ‍ॅडव्होकेट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर बॅरिस्टर म्हणून भारतात परतले आणि मग मुंबईत वकील म्हणून काम करू लागले.
 
महात्मा गांधी ह्यांना त्यांच्या एका भारतीय मित्राने कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत बोलावले होते. इथूनच त्यांची राजकीय जीवनाची सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिका गेल्यावर त्यांना एक विचित्र प्रकार अनुभवायला मिळाला. त्यांनी बघितले की कशा प्रकारे भारतीयांशी भेदभाव केला जात आहे.
 
एकदा गांधीजींना स्वतः एका ब्रिटिश गोऱ्या वर्णाच्या माणसाने ट्रेनमधून बाहेर काढले होते कारण गांधीजी त्या ट्रेनमध्ये प्रथम श्रेणीतून प्रवास करत होते. त्या काळात फक्त गोरे माणसंच फर्स्ट क्लास मधून प्रवास करणं आपला हक्क समजायचे. गांधीजींनी या घडलेल्या गोष्टीवरून प्रतिज्ञा घेतली की ते काळे आणि भारतीय लोकांसाठी लढतील. त्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या जीवनासाठी सुधार केले त्यासाठी काही चळवळी केल्या. दक्षिण आफ्रिकेमध्ये चळवळीच्या दरम्यान त्यांना सत्य आणि अहिंसा याचे महत्त्व समजले.
 
भारतात परत आल्यावर त्यांना तशीच परिस्थिती दिसली जशी त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये दिसली होती. 1920 मध्ये त्यांनी नागरी अवज्ञा चळवळ सुरू केली आणि ब्रिटिशांना आव्हान दिले. 1930 मध्ये असहकार चळवळ ची स्थापना केली आणि 1942 मध्ये त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास सांगितले.
 
स्वातंत्र्याच्या चळवळीत ते अनेक वेळा तुरुंगात देखील गेले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाले. परंतु दुर्दैवाने नाथूराम गोडसे नावाच्या व्यक्तीने 30 जानेवारी 1948 रोजी ते संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी जात असताना महात्मा गांधी ह्यांची गोळ्या घालून हत्या केली. शेवटी त्यांच्या मुखातून 'हे राम' शब्द निघाले.
 
त्यांच्या आवडीचे भजन होते-
रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीता राम
ईश्वर अल्लाह तेरो नाम , सबको सन्मति दे भगवान ।

Edited by: Rupali Barve