बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (08:14 IST)

मराठा आरक्षण : 96 कुळींसह सर्व मराठा खरंच कुणबी आहेत का?

maratha aarakshan
तुषार कुलकर्णी
जालन्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनानंतर आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल का, अशी चर्चा सुरू झालीय. अर्थात, राज्य सरकारकडून याबाबत अद्याप कुठलीच माहिती समोर आली नाहीय.
 
मात्र, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करून म्हटलंय की, "एक सवाल आहे, मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने मे महिन्यात समिती नेमली होती. चार महिने होऊन एकदा ही त्या समितीची बैठक झाली नाही. आज पुन्हा एकदा हीच समिती एक महिन्यात अहवाल देणार असे मुख्यमंत्री म्हणाले, मग चार महिन्यात या समितीने नेमके काय केले की जे आता एक महिन्यात होईल?"
 
मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येतो, तेव्हा कुणबी-मराठा हा मुद्दाही चर्चेच्या केंद्रस्थानी येतो. पण कुणबी समाजाला आरक्षण आहे. मग मराठा समाजाला आरक्षण का नाही, असाही प्रश्न उपस्थित केले जातात. पण कुणबी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत का? सविस्तर जाणून घेऊ.
 
line
मराठा समाजाला आरक्षण मिळावे की नाही याबाबत अभ्यास करण्यासाठी तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली 21 मार्च 2013 रोजी एका समितीची स्थापना करण्यात आली. मराठा आणि कुणबी समाज एकच आहे आणि ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण आहे त्या प्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस या समितीच्या अहवालात करण्यात आली.
 
या अहवालाच्या जोरावरच मराठा समाजाला काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने 16 टक्के आरक्षण देऊ केलं. पण पुढे कोर्टाने यावर स्थगिती आणली. आरक्षण देण्यासाठी हे सिद्ध करणं आवश्यक आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टींनी मागास आहे.
 
मराठा समाजाचा भाग असलेल्या कुणबींना याआधीच ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळत आहे. आता राणे समितीने असं म्हटलं की सगळेच मराठे कुणबी आहेत. त्यामुळे ते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टींनी मागास आहे. (कारण कुणब्यांचं मागासलेपण याआधीच सिद्ध करण्यात आलं आहे.)
 
सगळे मराठे कुणबी आहेत का?
ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट व्हेन रसेल यांनी त्यांच्या 'द ट्राइब्स अॅंड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया' या पुस्तकात कुणबी हा समाजच मराठा असल्याचं म्हटलं आहे.
 
"मराठा समाज हा लष्करी सेवेत होता पण त्यांचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला असण्याची शक्यता आहे. नेमकं कोणत्या काळात मराठा आणि कुणबी हे दोन समाज वेगळे समजायला सुरुवात झाली हे अद्याप निश्चित समजले नाही," असं या पुस्तकात म्हटलं आहे.
 
मराठा आणि कुणबी समाज एकच आहे, असा दावा नारायण राणे समितीने केला आहे. त्यांच्या अहवालात म्हटलं आहे :
 
1. महाराष्ट्रातील मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करत असे पण युद्धाच्या काळात हा तलवार घेऊन लढण्यात पटाईत झाला होता. याच वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं.
 
2. शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि नंतरचे साम्राज्य या काळातील कुणबी मराठ्यांचा लष्करीपेशा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली. मोगलांच्या मुलखातून मिळणाऱ्या चौथाईच्या हक्काने महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी आली. 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य बुडवले. त्यानंतर महसूलाच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्न बंद झाल्यानंतर हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला.
 
3. अहवालात महात्मा फुले यांच्या साहित्याचा संदर्भ देऊन म्हटले आहे की ज्या शेतकऱ्याचे वर्णन महात्मा फुले यांनी केले आहे तो शेतकरी कुळवाडी म्हणजेच कुणबी आहे. महात्मा फुलेंनी 'शेतकऱ्यांचा असूड', 'इशारा' अशा पुस्तकांमधून ज्या शेतकऱ्याच्या हलाखीचे वर्णन केलेले आहे तो मुख्यत्वे मराठा कुणबी शेतकरी आहे.
 
4. संत तुकाराम महाराजांच्या 'बरें देवा कुणबी केलों, नाही तरि दंभे असतो मेलो' या अभंगाचा संदर्भ देऊन तुकोबा हे शेतकरी कुणबी होते असं म्हटलं आहे.
 
5. छत्रपती शाहू महाराज यांनी असं म्हटलं होतं, "मराठ्यांचे धंदे दोन, शेतकी व शिपाईगिरी, कुणब्यांचा शेतकी एकच, असे आम्ही वर म्हणालो. यावरून मराठे हे कसब्यांत राहणारे आणि कुणबी गांवखेड्यात राहणारे हे सिद्ध होते. पण या दोघांचा इतका एकजीव झाला आहे की, धंद्याच्या दृष्टीने त्यांच्यात भिन्न कल्पिणें केवळ अशक्य झाले आहे. शंभर वर्षांत म्हणजे तिसऱ्याच पिढींत मराठ्याचा कुणबी आणि कुणब्याचा मराठा, म्हणजे शेतकऱ्याचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलटापालट निदान महाराष्ट्रात तरी गेल्या दोन हजार वर्षांत बेमालूम चालू आहे."
 
6. तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने 1931मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे 16.29 टक्के आणि 7.34 टक्के होते. 1931 ते 1945 या कालावधीत बहुतांश कुणबी समाजाने स्वतःला कुणबी म्हणणे बंद करून मराठा असे संबोधण्यास सुरुवात केली.
 
समितीनं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर मराठा समाजाची लोकसंख्या 32.14 टक्के असल्याचं म्हटलं आहे. मराठा समाज आणि कुणबी समाज हा एकच आहे आणि कुणबी समाज  इतर मागासवर्गीय आहे, त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस समितीनं केली आहे.
 
'मराठा आणि कुणबी वेगळे आहेत'
मराठा आणि कुणबी हे दोन्ही समाज वेगळे आहेत, असं म्हणणारा देखील एक मतप्रवाह आहे.
 
"कुणबी आणि मराठा हा समाज एक आहे असा जो दावा आहे तो तितका खरा नाही. याचं स्वरूप आपल्याला वर्गाच्या स्वरूपात समजून घ्यावं लागेल. जमीनदारी गेल्यानंतर याच वर्गातील लोक शेती करू लागले. पण तत्कालीन जमीनदार वर्ग आणि कुणबी या दोन्ही वर्गात फरक होता.
 
कुणबी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणारा वर्ग तर ज्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या तो वर्ग जमीनदार, वतनदार किंवा प्रशासकीय पद असणारा वर्ग होता," असं समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणी सांगतात.
 
'96 कुळी'सुद्धा कुणबी आहेत?
महाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक, कुर, भोज, कलचुरी, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, हैहय, गुर्जर, कदंब, मानांक, यादव हे सर्व क्षत्रीय राजवंश होऊन गेले. त्यांचे कुल-संबंधित आणि वंशज हे देखील क्षत्रीय होते. याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट, महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेलं.
 
याच वर्गाचे दोन प्रमुख वंश आहेत. चंद्रवंश आणि सूर्यवंश. या दोन वंशात मराठ्यांची 96 कुळांची (कुटुंबाची) विभागणी झाली आहे. त्याच कुळांना 96 कुळे म्हणतात, अशी माहिती प्रा. रामकृष्ण कदम यांनी लिहिलेल्या 'मराठा 96 कुले' या पुस्तकात आहे. सूर्यवंश आणि चंद्रवंशांच्या उगमाबाबत पुराणांमध्ये आख्यायिका आहेत. सूर्यवंश हा रामचंद्र तर चंद्रवंश हा ययाती यांच्याशी संबंधित असल्याचा संदर्भ या पुस्तकात देण्यात आला आहे.
 
"अकराव्या शतकापासून 96 कुळे ही संकल्पनेचं स्पष्ट स्वरूप लक्षात येण्यास सुरुवात झाली. सैन्यात नसलेले मराठे शेती करत किंवा सैन्यात भरती होणारा समाज कृषक समाजातून येत असे. याचाच अर्थ असा की मराठे हे आधी शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रिय होते, व्यवसायाच्या आधारावर त्यांना मराठा क्षत्रिय आणि कुणबी असं वर्गीकरण झालं," असं इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक इंद्रजित सावंत म्हणतात.
 
96 कुळी मराठ्यांबद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या ती सरकार दरबारी 96 कुळी मराठा असा या समाजाचा उल्लेख केला जात नाही. "96 कुळी ही कागदोपत्री जात नाही. शाळेच्या दाखल्यावरही अनेक लोक फक्त 'मराठा' असा उल्लेख करतात. 96 कुळी मराठा ही जात नसून तो कुटुंबांचा समूह आहे," असं सोनवणी सांगतात.
 
96 कुळी मराठे हेसुद्धा कुणबी असल्याचं मत डॉ. सदानंद मोरे यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं. "जे शेती करतात ते कुणबी. 96 कुळी मराठा आणि सामान्य मराठ्यांमध्ये काही फरक नाही. पर्यायाने मराठा आणि कुणबी एकच आहेत. काही मराठ्यांचा राजघराण्याशी संबंध जरी असला तरी त्यांचे प्रमाण कमी आहे," असं ते सांगतात.
 
मराठ्यांमधील उपजाती
"मराठ्यांमध्ये राव मराठा, नाईक मराठा, मराठा कुणबी अशा उपजाती आहेत. इतिहासकालीन कागदपत्रं तपासली तर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रातील एकूणच 12 बलुतेदारांना मराठा म्हटलं जायचं, पण नंतर व्यवसायाच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण झालं आणि त्याच्या जाती निर्माण झाल्या.
 
जे शेती करत होते ते कुणबी म्हणवले गेले. तर ज्यांच्याकडे जमिनीदारी होती त्यांनी स्वतःला 'मराठा'च म्हणवून घेणं पसंत केलं," असं इंद्रजित सावंत सांगतात.
 
"मराठ्यांमध्ये प्रांतानुसार कोकणी मराठा आणि देशावरचे मराठे असा फरक आहे. पण या दोन्ही मराठ्यांमध्ये लग्न जुळतात. त्यामुळे ही उपजाती आहे असं म्हणता येणार नाही. सध्या चंद्रवंशी आणि सूर्यवंशी मराठ्यांमध्ये देखील लग्नं जुळतात. पूर्वी हे पाहिलं जात असे, पण सध्याच्या काळात हे फारसं पाहिलं जात नाही," सावंत पुढे सांगतात.
 
मराठवाड्यात कुणबी का कमी आहेत?
विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात कुणबींची सख्या कमी आहे. त्यामुळेच तिथे आरक्षणाची मागणी जोर धरत आहे, असं निरीक्षक सांगतात. पण असं का आहे?
 
"60च्या दशकात पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी मराठा नसून मराठा 'कुणबी' आहे अशी मांडणी केली आणि ती घटनात्मक रीत्या मंजूर करण्यात आली. त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र 'आम्ही जमीनदार आहोत, आम्ही स्वतःला ओबीसी म्हणवून घ्यायचं का?' असं म्हणत पंजाबरावांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं. आता 40 वर्षांनंतर विदर्भातील पूर्वाश्रमीच्या मराठा शेतकऱ्यांची तिसरी पिढी कुणबी प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाचा लाभ घेत आहे, तर इकडे मराठवाड्यातला मराठा शेतकरी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला आहे," असं मत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी व्यक्त केलं आहे. (याविषयीची सविस्तर बातमी इथे वाचा)
 
मुळात मराठा जात की समूह?
"सातवाहनांच्या काळात महारठ्ठी हे पद अस्तित्वात होतं. आजच्या काळात जसा जिल्हा असतो तसा त्या काळातल्या प्रांताला 'रठ्ठ' असं म्हटलं जायचं. या प्रांताच्या प्रमुखाला 'महारठ्ठ' म्हणत. आताच्या काळात जसा कलेक्टर असतो त्याप्रमाणेच हे प्रशासकीय पद होतं. महारठ्ठ या शब्दातूनच पुढे मराठा हा शब्द नावारूपाला आला," असं समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणी सांगतात.
 
"महारठ्ठ हे पद पूर्वी वंशपरंपरागत नव्हतं, पण कालांतराने ते पद वंशपरांपरागत झालं. अनेक वर्षं केवळ प्रशासकीय पद असणाऱ्या लोकांमध्येच लग्नं जुळली. त्यामुळे त्यांना जातीचं स्वरूप मिळालं. कालांतराने ज्यांच्याकडे जमीनदारी राहिली नाही किंवा विभागणी होत होत अल्प जमीन हाती राहिली ते लोक स्वतः शेती करू लागले. तो वर्ग शेतकरी किंवा कुणबी म्हणून नावारूपाला आला, असं आपण म्हणू शकतो," सोनवणी पुढे सांगतात.
 
"संपूर्ण मराठा ही एकच जात आहे. जर जातींचा समूह आहे असं म्हटलं तर इतर कोणत्या जाती त्यामध्ये येतात ते आपल्याला सांगावं लागेल. आणि जर पोटजाती त्यामध्ये आहेत, असं आपण म्हणणार असू तर सर्वच जातींमध्ये पोटजाती आहेत. ब्राह्मणांमध्ये पोटजाती आहेत. तरी देखील ब्राह्मण हा जातीचा समूह नाही तर ब्राह्मण ही जात ठरते. त्याचप्रमाणे, मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, 96 कुळी मराठे हे सर्व एकच म्हणजे मराठा आहे," असं सदानंद मोरे सांगतात.
 
मराठा समाजाला आरक्षण मिळावं की मिळू नये, ते कायद्याने शक्य आहे की नाही, वगैरे सर्व पेचांच्या मुळाशी मराठा समाजाची क्लिष्ट रचना आहे, असं दिसून येतं. समाज व्यवहारातली जात, कागदोपत्री असलेली जात आणि ऐतिहासिक संदर्भातली जात या भिन्न असल्यामुळे अनेकांना कायदेशीर अडचणी येत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय मराठा आरक्षणाचा निकाल कोर्ट लावू शकणार नाही.