शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By

गणपती आरती संग्रह भाग 2

ganesha idol
आदि अवतार तुझा, अकळकळपठारी।
ब्रह्मकमंडलु गंगा रहिवास तये तीरी।
स्नान पै केलिया हो, पाप ताप निवारी।
मोरया दर्शनें हो, जन्ममरण दूरी॥१॥
जय देवा मोरेश्वरा जय मंगळमूर्ती॥
आरती चरणकमळा, ओवाळू प्राणज्योती॥जय.॥धॄ.॥
सुंदरमस्तकी हो, मुकुट पिसे साजीरा।
विशाळ कर्णद्वय, कुंडले मनोहर।
त्रिपुंडटिळा भाळी,  अक्षता ते सोज्वळी।
प्रसन्न मुखकमळ, मस्तकी दुर्वांकुर॥जय.॥२॥
नयन निर्मळ हो भुवया अति सुरेख।
एकदंत शोभताहे, जडित स्वर्ण माणिक।
बरवी सोंड सरळ,  दिसतसे अलौकिक।
तांबूल मुखीं शोभे अधररंग सुरेख॥जय॥३॥
चतुर्भुजी मंडित हो, शोभती आयुधें करी।
परशुकमलअंकुश हो, मोद्क पात्र भरी।
अमृतसम मधुर, सोंड शोभे तयावरी।
मूषक वाहन तुझें, लाडू भक्षण करी॥जय.॥४॥
नवरत्नहार कंठी, यज्ञोपवीत सोज्वळ।
ताईत मिरवीतसे, त्याचा ढाळ निर्मळ।
जाईजुई नागचांफ़े, पुष्पहार परिमळ।
चंदनी कस्तुरीचा शोभे टिळक वर्तुळ॥जय.॥५॥
 
****************************  
 
हरिहरब्रह्मादीकी तुजला पूजीलें।
म्हणोनि त्यांचे कार्य सिद्धी त्वां नेले॥
ऎसा तू गणराजा नवसा योजिले।
वर्णावया नकळे तुझी पाऊलें॥१॥
जय देव जय देव जय गजानना।
आरती ओवाळू तुज सुंदर वदना॥जय.॥धृ.॥
तुज ऎसा सुंदर आणिक न दीसे।
जिकडे पहावे तिकडे गणराज भासे।
श्रवणी कुंड्लांची दीप्ती प्रकाशे॥
चंद्र सूर्य दोन्ही हेलावति जैसे॥जय.॥२॥
गंधपुष्पे दुर्वा तुजला जे वाहती।
ते नर भाग्यवंत लक्ष्मी पावती॥
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती।
सहज नामा याणें गाइली आरती॥जयदेव॥३॥
 
****************************  
 
एकदंता गुणवंता गौरी सुखसदना।
ऋद्धीसिद्धीदायक कलिकिल्मिषदहना॥
उन्नत गड स्त्रवती डुलती नग नाना।
शुंडादंडेमंडित गंभीर गजवदना॥१॥
जय देव जय देव जय शंकरकुमरा।
पंचप्राणे आरती उजळूं तुज चतुरा॥ जय॥धृ.॥
अंबुजनेत्री बुब्बुलभ्रमर भ्रमताती।
भारेंसुरवर पुजा देवा तुझि करिती।
लाडूधर वरदका मुनिजन गुण गाता।
कर्णी कुंडले देखुनि रविशशि लपताती॥जय.॥२॥
चरणी नुपुरांची रुणझुणध्वनी उठली।
एकविस स्वर्गी भेदुन तदुपि संचरली॥
अनंत अंडे ज्यांच्या घोषे दुमदुमली।
अदभुत पंचभुतें तेथुनि उद्भवली॥जय.॥३॥
ऎसे वैभव तुझे नाटक नृत्याचें।देखुनियां लुब्धलें मन गंधर्वाचे॥
ऎकुनि चिंतन करणे तुझिया चरणाचें।
चिंतन करितां नासे दु:ख विश्वाचें॥जय.॥४॥
कमलासन भयनाशन गिरिजानंदना।
कटि सुंदर पीतांबर फ़णिवरभूषणा॥
विद्यावर पदिं तोडर अमरारीमथना।
मनरंजन रहिमंडण गणपति गुरु जाणा॥
जय देव जय देव जय शंकर.॥५॥
 
****************************  
 
अनादिनायक चिंतामणीदेवा।
विद्याधर तुज म्हणती करिती सुर सेवा॥
नकळे ब्रह्मादिकां पार्वतिसुत ठेवा।
भावे पाहावा निज मानसिं घ्यावा॥१॥
जय देव जय देव गणपती स्वामी।
पंचप्राणी आरती करितो तुजला मी॥जय.॥धृ.॥
परशू अंकुश कमळां धरिलें अवलीळा।
सिंदूरचर्चित भाळा।
शोभसि रिपु काळा॥
गंडकपालालंकृति पुष्पांच्या माळा।
रुणझुण चरणी होती नुपुर अवळीला॥जय.॥२॥
 
श्वेत छत्र चामरी तुजला मिरवीती।
उंदीराचे वाहन तुजला गणपती॥
खाज्यांचे लाडू शोभती हाती।
मूर्ती अवलोकितां न ढळती पाती॥जय.॥३॥
राजस उंदीर ठमकत ठमकत चाले।
हालत हालत दोंदिल डोलत मग चाले॥
ध्याने ध्यातां गातां सर्वहि जन धाले।
हरिगुणमंडित वाणी जन पंडीत बोले॥
जय देव जय देव.॥४॥
 
 
****************************  
 
दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी।
तव चरणांची सखया मजला आवडी मोठी॥धृ.॥
कवण अपराध म्हणवुनि देवा केला रुसवा।
अहर्निशी मी हृदयी तुझा करितसे धांवा॥दीन.॥१॥
चिंताकूपी पडलों कोण काढील बाहेरी।
धांवें पावें सखया करुणा करुनि उद्धरी॥दीन.॥२॥
ऐसे होते चित्ती तरि का प्रथमचि देवा।
अंगीकार करुनि केला कृपेचा ठेवा॥दीन.॥३॥
आतां करणें त्याग तरिही स्वामी अघटित।
शरण आलों माझा आता चुकवी अनर्थ॥दीन.॥४॥
यादवसुत हा विनवी दोन्ही जोडूनियां कर॥
तव चरणाचा सखया मजला आहे आधार॥दीन.॥५॥
 
****************************  
प्रेमगंगाजळे देवा न्हाणियेलें तुजला।
सुगंध द्रव्ये मर्दन करुनी हेतू पुरविला॥
गंगाजळे रौप्याची त्यांत कि भरिलें जळाला।
सुवर्णाचा कलश आणुनी हाती तो दिधला॥
अंग मर्दितां ह्स्तें मजला उल्हासचि झाला।
स्नान घालूनि वंदियेलें मी तुझीया चरणाला॥
चरण क्षाळुनि प्राशियेले मी त्याही तीर्थाला।
वाटे सात पिढयांचा मजला उद्धारचि झाला॥
अंग स्वच्छ करुनि तुजला पीतांबर दिधला।
अति सन्मानें सिंहासनि म्यां तुजला स्थापियला॥
भक्ता सदाशिवतनय सदा लागत तव चरणी।
सर्वस्वहि त्यागुनि झाला निश्चय तव भजनी॥
 
****************************  
गणपति नमिती स्तविती सुरपति तुज भजती।
सकलारंभी स्मरती विघ्ने संहरती॥
शुंडामांडतमूर्ती अतर्क्य तव कीर्ती।
आरती कवणालागीं देई मज स्फ़ूर्ती॥१॥
जय देवा जय देवा सुंदरगजवदना।
तव भजनासी प्रेमा देई सुखसदना।जय.॥धृ.॥
जागृति स्वप्नी माझ्या हृदयी त्वां राहावें।
दुरतर भवपाशाच्या बंधा तोडावें॥
सिंदूरवदना सखया चरणा दावावें।
अघोरदुर्गतिलांगी सत्वर चुकवावे॥जय.॥२॥
न कळे अगाध महिमा श्रीवक्रतुंडा।
अतर्क्य लीला तुझी शोभे गजशुंडा॥
तुजविण न दिसे देवा शमविल यम पीडा।
भक्तसंकट येसी धावत दुड्दुडां॥जय.॥३॥
नयनी शिणलो देवा तव भेटीकरितां।
तापत्रय दीनाचे शमवी समर्था॥
अनाथ मी कल्पदुम तूंची शिव सूता।
विष्णूदासें चरणी ठेवियला माथा।जय देवा.॥४॥
****************************