शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Updated : मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (14:35 IST)

महादेव आरती संग्रह

लवलवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ कळा त्रिनेत्री ज्वाळा ॥
लावण्य सुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥  धृ. ॥
 
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचे उधळण शीतकंठ नीळा ।
ऎसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव. ॥ २ ॥
 
दैवी दैत्य सा़गर मंथन पै केलें ।
त्यामाजी अवचीत हळहळ सांपडले ॥
तें त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय. ॥ ३ ॥
 
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनीजन सुखकारी ॥
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ जय देव जय देव ॥ ४ ॥

जय जय जय शिव शंभो गंगाधर गिरीश ।
पंचारति मंगीकुरु स्वामिन्‍  विश्वेश ॥ धृ. ॥
 
चंद्रोद्‌भासित मौल कंठे धृतगरलं ।
त्रिभुवन दाहक पावकचक्षु: स्थितभालं ॥
प्रियभूषण कृतव्यालं वरवाहन विमलं ।
उज्वल सुंदर ह्रदयं नरशिर कृतभालं ॥ जय. ॥ १ ॥
 
राजितकर तलचतुरं खङगै: खट्‌वांगं ।
पिनाकड मरूमंडित त्रिशूलधर भुजगं ॥
रजता चलसमवर्ण सुंदरसर्वांगं ।
दिग्‌वसनं शिरजटिलं स्वीकृत कुशलांग ॥ जय. ॥ २ ॥
 
वरदाभयदा इशा दुरित क्षयकर्ता।
सुरनरभजनें स्तवनें वांछित फलदाता ।
त्रिपुरांतक सुखदायक विषता संहरता ॥
शरणागत रक्षक मम करुणाकर त्राता ॥ जय. ॥ ३ ॥
 
गौरीरमणा गहना श्रेष्ठा । स्मरदहना ।
भस्मोध्दूलित सदना । जनता मनहरणा ।
तापत्रय अघशमना करुणाकर गमना।
विघ्नेशा गणनायका त्राता परिपूर्णा  ॥ जय. ॥ ४ ॥
 
पशुपतिं स्मशानवासि परवेष्टित भूतै: ।
अनुचर मंगिश सुत वर्णित प्रणिपातै: ॥
दीनोद्धार पतितोऽहं तारय तदभूतै: ।
जय जय शंकर अभीष्ट वांछित इत्यैते: ॥ जय. ॥ ५ ॥

जय जय जय मृड शंभो सतंत कुरु शंभो ।
स्मरहर मयि विस्तारय करुणामनि शंभो ॥
परिहर कल्मषमखिलं विद्या मृतसिंधा ।
प्रबिलोकय नीराजन मतिक निजबंधो ॥ धृ. ॥
 
दुस्तर मायाजाले पतिता खिलजंतून्‌ ।
गाभिंक पींडा नुभवै: स्मरतो निजमंतून्‌ ॥
प्रसवजदु:खं तेषां क: प्रभवति वक्तुम ।
विधूत पापा दितरो न हि शक्तस्रातुम्‌ ॥ जय. ॥ १ ॥
 
बहुविध पीडा संकुल शैशवमनु भवताम् ।
मत्कुण मुखकृमिदं शैरुच्चै संरटताम् ।
पर्यकादौ शयने तनुभि परिलुटाम्‍ ।
विधूतपाप त्वदृते कस्तानु द्धरताम्‌ ॥ जय. ॥ २ ॥
 
पतितं यौवन गहने व्यथितं गजकामै:।
लोभा जगरौर्ग लितं दीर्ण मदकैले: ॥
विषधर विषये दृष्ट क्लिष्टं भयजालै ।
करुणा पांगैविश्वं शिव पाहिं सलिलै: ॥ जय. ॥ ३ ॥
 
वार्धकता वज्ज्ञातं गलितेंद्रिय शक्तिम ।
यातायात श्रांतं व्याधि भिरभि भूतम ॥
दुरंत चिंता कुलितं निज जलपरि भूतम ।
जन मवता दधभयहर विश्वेश्वर सततम ॥ जय. ॥ ४ ॥
 
संकटपारावरे पतितं भूशभीतम ।
नित्यं दुस्थितचितं तापत्रयतप्तम् ।
जगदखिलं गंगाधर कुरु करुणासक्तम ।
काशीविप्रंमोचय भवसर्पग्रस्तम ॥ जय. ॥ ५ ॥

भस्मप्रिया भूतपते सदय शंकरा ।
पंचारति करितों तुज हे महेश्वरा ॥
विविधताप दूर करीं तारिं किंकरा ॥
कृपार्णवा, सदाशिवा ॥
त्रिविधताप दूर करीं तारिं किंकरा ॥
कृपार्णवा, सदाशिवा ॥
विठ्ठलात्मजासिं पदीं देई आसरा ॥ १ ॥
 
 
ःःःःःःःःःःःःःःःःः
 
जयजयजी मदनांतक गौरीशंकरा ॥
पंचारति करितों तुज हे महेश्वरा ॥ धृ. ॥
 
व्याघ्रांबर अंगी तूं नित्य सेविसी ॥
रुंडमाळ कंठिं असे मस्तकी शशी ॥
गिरिजा तव वामांकीं शोभते तशी ॥
भस्मप्रिया भूतपते इंदुशेखरा ॥ जय. ॥ १ ॥
 
बहु दुर्जन त्रिपुर दैत्य प्रबल जाहला ॥
हरिविधीसह विबुध पिडुनि त्रास दीधला ॥
तेव्हां ते अति भावें स्तविति मग तुला ॥
त्रिपुरासुर वधुनि सुखी करिसी सुरवरां ॥ जय. ॥२ ॥
 
एकवीस स्वर्गाहुनि उंची तव अति ॥
सर्वेशा दाता तूं सद्‌गतीप्रती ॥
तव लीलावर्णनासि अल्प मम मती ।
विठ्ठलसुत विनवितसे रक्षि किंकरा ॥ जय. ॥ ३ ॥

महाजी महादेव ॥ महाकाळमर्दना ॥
मांडिले उग्र तप महादित्यदारुणा ॥
परिधान व्याघ्रांबर ॥ चिताभस्मलेपना ॥
स्मशान क्रीडास्थळ ॥ तुम्हांसी त्रिनयना ॥ १ ॥
 
जय देवा हरेशवरा ॥ जय पार्वतीवरा ॥
आरती ओंवाळीन ॥ तुज कैवल्यदातारा ॥ धृ. ॥
 
रुद्र हें नाम तुझें ॥ उग्र संहारराशी ॥
शंकर शंभुभोळा ॥ उदार तूं सर्वस्वीं ॥
उदक बेलपत्र ॥ तुज वाहिल्या देशी ॥
आपुले पदीं दासां ॥ ठाव शुद्ध कैलासीं ॥ जय. ॥ २ ॥
 
त्रैलोक्यव्यापका हो ॥ जन वन कीं विजन ॥
विराट स्वरुप हे ॥ तुझें साजिरे ध्यान ॥
करिती वेदस्तूती ॥ कीर्ति मुखे आपण ॥
जाणतां नेणवे हो ॥ तुमचें हें महिमान ॥ जय. ॥ ३ ॥
 
बोलतां नाममहिमा ॥ होय आश्चर्य जगीं ॥
उपदेश केल्यावरी ॥ पापें पळती वेगीं ॥
हरहर वाणी गर्जे ॥ प्रेम संचारे अंगीं ॥
राहिली दृष्टी चरणीं ॥ रंग मूनला रंगीं ॥ जय. ॥ ४ ॥
 
पूजिलें लिंग ऊमा ॥ तुका जोडोनी हात ॥
करितो विज्ञापना ॥ परिसावी ही मत ॥
अखंड राहों द्यावें ॥ माझें चरणी चित्त ॥
साष्टांग घातले मी ॥ ठेवा मस्तकी हात ॥ जय. ॥ ५ ॥

कर्पूरगौरा गौरीशंकरा आरति करूं तुजला ॥
नाम स्मरता प्रसन्न होउनि पावसि भक्ताला ॥ धृ. ॥
 
त्रिशूळ डमरू शोभत हस्तीं कंठि रुंडमाळा ॥
उग्रविषातें पिऊनि रक्षिसी देवां दिक्पाळां ॥
तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नी ज्वाळा ॥
नमिती सुरमुनि तुजला ऎसा तूं शंकर भोळा ॥ १ ॥
 
ढकळानंदी वाहन शोभे अर्धांगी गौरी ॥
जटा मुकुटीं वास करितसे गंगासुंदरी ॥
सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारीं ॥
मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरी ॥ २ ॥

सद्यो जातं प्रपद्यामितिस्मरणे श्रतिमंत्रं ॥
सांब पंचवक्र चेतो मम देवं ॥
सहजं सहजानंदं सकलं परिपूर्णं ॥
सर्वं ब्रह्मातीतं श्रुतिभि:प्रतिपाद्यं ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय त्र्यंबकराजन् ॥
गंगाधर गौरीवर शंकर शूलपाणिम्‌ ॥ धृ. ॥
 
भवेभवे नाति भवे भजने त्रिनेत्रं ॥
भवस्व तेजो बुद्धिर्महता जगदीशं ॥
अनाथनाथं वंदे आत्मविश्वेशं ॥
मृगधर परशुहस्तं शिव चंद्रमौलिं ॥ जय. ॥ २ ॥
 
वामदेवं वंदे विदेहकैवत्यं ॥
सद्योजातं सिद्धिं ज्येष्ठं श्रेष्ठत्वं ॥
विभूति सुंदर चर्चित शंभोसर्वांगं ॥
नमामि रुद्रं कालं तारकजगदीशं ॥ जय. ॥ ३ ॥
 
अघोर घोरिघोरं भयरु द्‍रोभीमं ॥
भूतं भूतनाथं भुजग मणिभूषं ॥
कपर्दीका मारीभय कृद्‌भयनाशं ॥
सर्वं सर्वाध्यक्षं भक्तानु ग्रहदं ॥ जय. ॥ ४ ॥
 
तत्पुरुषायविद्महे चिन्मय आकाशं ॥
महादेवो बुद्धिव्यापक सर्वज्ञं ॥
त्रिगुणं त्रिगुणातितं तत्पर परमेशं ॥
शंभोनादं मोदं प्रणवं ॐकारं ॥ ५ ॥
 
ईशान: सर्वभूते भजते विद्युत्तं ॥
ब्रह्माधी पन्यत्वं ब्रह्मापरमेंशं ॥
सत्य सत्यानंदं चिन्मय आकाशं ॥
चिदानंदोहेतु: शिवशिव ॐकारं ॥ जय ॥ ६ ॥
 
गुह्यक अप्सर किन्नर गायति संगीतं ॥
नंदी भृंगी चंडीगणपति नित्यत्वं ॥
तांडवनिपुणं सांबं अद्‌भुत आनंदं ॥
हरिहर ब्रह्माध्याक्षं त्र्यंबक प्रभूराजं ॥ जय. ॥ ७ ॥
 
अनंत शेषो हरिहरब्रह्मा मध्यस्थं ॥
नारद तुंबरगीतं सन्मुख हनुमंत ॥
अगणित महिमाध्यक्षं अभय वरदानं ॥
गंगाधर दीक्षितकृत मुक्ती सायुज्यम्‌ ॥ जय. ॥ ८ ॥

जय जय आरती पार्वती रमणा ॥
भवभय नाशना दुष्टनिकंदना ॥ धृ. ॥
 
पंचवदन दशभुज विराजे ॥
जटाजुटी गंगा सुंदर साजे ॥ १ ॥
 
कंठी रुंडमाळा हस्तिकपाल ।
वाहन नंदी शोभे भूषण व्याल ॥ २ ॥
 
गजचर्मांबर तव परिधान ॥
त्रिशुलधारण भस्मलेपन ॥ ३ ॥
 
दिगंबररूपा शिव महारुद्रा ॥
वासुदेव प्रार्थी ज्ञानसमुद्रा ॥ ४ ॥
 
ःःःःःःःःःःःःःःःःः
 
महारुद्रा जगन्नाथा शिवाभोळ्या शंकरा ॥
अति प्रेमें आरती ही करितों मीं तूजला ॥ धृ. ॥
 
भयकृद्भयभंजनादी ही नामें तुजप्रती ॥
विबुधादी सर्व प्रेमें तव सेवा वांछिती ॥
तव लीला वर्णनाची प्रीती असे मज अति ॥
भो ईशा सुप्रसादें दे दासा सद्‌गिरा ॥ महा. ॥ १ ॥
 
तव पादांबुज सेवा मम हातीं देउनी ॥
आसक्त भ्रमरप्राय रस द्यावा या जनीं ॥
उपदेश बोधुनीयां करि ऎसें मन्मनी ।
ज्ञानामृता पाजिं प्रेमें विठ्ठलात्मज किंकरा ॥ महा. ॥ २ ॥

शंभो शिवहर गौरी स्मरहर जय शंभो ॥ धृ. ॥
शंभो सांबसदाशिव शशिशेखर शंभो-हरहर शिवशंभो ॥
शंभो ओंकाराव्यय सिद्धेश्वर शंभो ॥
शंभो त्रिशूल डमरू पन्नगधर शंभो ॥
शंभो भस्मोद्‌धूलन गिरजाप्रिय शंभो ।
शंभो हिमनग गंगा गौरीपति - शंभो ॥ १ ॥
 
ःःःःःःःःःःःःःःःःः
 
अभिनव सुंदर गंगाकाशी पुरवासी ॥
विश्वेश्वर येउनियां तारक उपदेशी ॥
जातां उत्तर पंथा हिमगिरि गगनासी ।
भजतां केदारासी कलिकिल्मष नाशी ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय गिरिजा रमणा ।
पंचप्राणें आरती स्वामीच्या चरणां ।। धृ. ॥
 
स्मरतां महाकाळा नगरी उज्जयिनी ॥
प्रदोषाकाळीं पूजा पाहावी नयनीं ॥
सोरटी सोमेश्वर नांदे त्रिभूवनीं ॥
चित्तीं चिंतन केल्या राहे निज सदनीं ॥ जय. ॥ २ ॥
 
औढंकपूरीचें वन हें दारुणवृक्षांचा ॥
भूषण नागेशाचा मणिमयमुक्तांचा ॥
परळी वैजेश्वर हरिहर तीर्थांचा ।
ऎसा शंकर शोभे बिल्व पत्राचा ॥ जय. ॥ ३ ॥
 
ॐकार ममलेश्वर रेवापुरपटणीं ।
हरिहर युद्धें झालीं बाणांच्या खाणीं ॥
शेवाळी घृणेश्वर वदति कपि वाणी ॥
वेरूळीची महिमा ऎकावी श्रवणीं ॥ जय. ॥ ४ ॥
 
गौतमऋषिंच्या तपें गोदा आली हे ।।
त्र्यंबकराजा नमिता भवभव जाताहे ॥
शाकिनी डाकिनि काळा ज्या क्षेत्री राहे ॥
भीमाशंकर सुंदर तेथुनि दिसताहे ॥ जय. ॥ ५ ॥
 
दक्षिणयात्रा करितां जाता ते मार्गी ।
शिवरात्रीजागरण मल्लिकार्जुनलिंगीं ।
रामेश्वर रत्नाकरमौक्तिकिच्या संगीं ।द्वादशलिंगें ॥
कथिलीं कृष्णानें अंगीं ॥
जय देव जय देव जय गिरिजारमण ॥
पंचप्राणें आरती स्वामींच्या चरणां ॥ जय. ॥ ६ ॥
 

गौरीवर गंगाधर तनु कर्पूरऎसी ॥
गजव्याघ्रांची चर्मे पांघुरसी ॥
कंठी कपालमाळा भाळीं दिव्य शशी ॥
अनिलाशनभूषण हर शोभत कैलासी ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय रतिपतिदहना ॥
मंगळआरति करितों छेदी अघविपिना ॥ धृ. ॥
 
त्रिपुरासूर अति दुस्तर प्रबल तो झाला ॥
तृणवत् मानित वासव विधि आणि हरिला ॥
तेव्हां निर्जर भावें स्मरताती तुजला ॥
होऊनि सकृप त्यांवरि मारिसी त्रिपुराला ॥ जय. ॥ २ ॥
 
जे तव भक्तिपुरस्सर जप तप स्तव करिती ॥
त्यांत अष्टहि सिद्धी स्वबलाने वरितो ॥
शिव शिव या उच्चारें जे प्राणी मरती ॥
चारी मुक्ती येऊनि त्यांचा कर धरिती ॥ जय. ॥ ३ ॥
 
वृषभारुढा मूढां लावी तव भजना ॥
भवसिंधू दुस्तर ती करिं गा सुलभ जना ॥
होवो सुलभ मला तव मायेची रचना ॥
दास म्हणे ताराया दे सकृप वचना ॥ जय. ॥ ४ ॥

अर्धांगी हे तुझे पार्वती अबला ॥
त्रिशूळ डमरू शोभे भस्माचा उधळा ॥
कपाल हस्तीं गळां रुंडांच्या माळा ॥
भुजंग भूषण शोभे त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय आदिपुरूषा ॥
त्रिभुवनपालक भक्तां देसी तूं हर्षा ॥ धृ. ॥
 
गजचर्मांबर शोभे तुजला परिधान ॥
ढवळा नंदी आहे तुझें पै वहन ॥
विशाळ काळकूट कंठी धारण ॥
त्रिताप हरूनी भक्ता चुकवीसी विघ्न ॥ जय. ॥ २ ॥
 
दिगंबर रुप तुझें लावुनियां मुद्रा ॥
जटाभार शोभे ज्ञानमुद्रा ॥
परशुरामपालक एकादश रुद्रा ॥
निरसी हे भवरजनी चकोरस्वानंदा ॥ ३ ॥

निर्गुणा निर्विकारा ॥ शिवा कर्पूरगौरा ॥
व्यापुनी चराचरीं ॥ होसी प्रकृतीपरा ॥
अगणितकोटीलिंगे ॥ पुराणप्रसिद्ध बारा ॥
एक तरीं दृष्टीं पाहें । अन्यथा भूमीभारा ॥ १ ॥
 
जयदेवा नील कंठा सकलदेवां आदि श्रेष्टां ।
रंक मी शरण आलों ॥ निवारीं भवकष्टा ॥ धृ. ॥
 
सोरटीसोमनाथ ॥ जगीं एक विख्यात ॥
तयाच्या दर्शनें हो ॥ चुके संसारपंथ ॥
हिमवंतपृष्ठभागीं ॥ लिंगकेदार मुक्त ॥
साधुसंत सेविताती ॥ धरुनि कैवल्यहेत ॥ जय. ॥ २ ॥
 
उज्जयिनी नामपूरीं ॥ पवित्र सचराचरीं ॥
महाकाळ लिंग जेथें । धन्य जो पूजा करी ॥
ओंकारमहाबळेश्वर ॥ ज्योतिर्लिंग निर्धारी ॥
तयाच्या दर्शने हो जन्ममरण निवारी ॥ जय. ॥  ३ ॥
 
पश्चिमें लिंग एक ॥ जया नाम त्र्यंबक ॥
गौतमी उगम जेथें ॥ वाहे मंगलदायक ॥
दर्शने स्नान मात्रे ॥ पुण्यपावन लोक ॥
तैसाच घृष्णेश्वर ॥ सेवाळें रमणीक ॥ जय. ॥ ४ ॥
 
भीमेचा उगम जेथें । भीमाशंकर तेथें ॥
डांकिनी स्नान करिती ॥ लिंग म्हणती तयातें ॥
अगणित पुण्य जोडे ॥ चालतांची तेणे पंथें ॥
दक्षिणे रामेश्वर ॥ ज्योतिर्लिंग म्हणती त्यातें ॥ जय. ॥ ५ ॥
 
आवंढ्यानागनाथ ॥ देव आपण नांदत ॥
भक्त जन कुटुंबिया भुक्तिमुक्तिदायक ॥ प्रत्यक्ष लिंग जेथें परळीवैजनाथ ।।
हरिहर तिथें ॥ जन होत कृतार्थ ॥ जय. ॥ ६ ॥
 
श्रीशैल तो पर्वत ॥ लिंगरुप समस्त ॥
सभोवती नीळगंगा ॥ माजी श्रीमल्लीनाथ ॥
भूमीकैलास दूजा ॥ जन साक्ष दावीत ॥
साठिवरुपें वाट पाहे ॥ कृपाळुं तो उमाकांत ॥ जय. ॥ ७ ॥
 
धन्य हो काशिपुरी मणिकर्णिकातीरी ॥ विश्वेश्वरलिंग जेथें ॥
जीवमात्रा उद्धरी ॥ तारक ब्रह्ममंत्र ॥ जपे कर्णविवरी ।
तेणेंची मोक्षपद ॥ प्राप्त होय निर्धारी ॥ जय. । ८ ॥
 
येऊनियां संसारा ॥ माजी ज्योतिर्लिंगें बारा ॥
एक तरी दृष्टीं पाहें ॥ अन्यथा भूमिभारा ॥
विश्वेश्वर विश्वनाथ ॥ भावभक्ति निर्धारा ॥
नामया श्रीशिवदास ॥ ध्याय परात्परा जयदेवा नीलकंठा ॥ ९ ॥

आरती रत्नेश्वराची । करु या राऊळनाथाची ॥
धससी धामणसे भुवनी नमिते तवभक्त सदाचरणी ।
पडतां भक्त हाक कानीं । संकटी येता धांवोनी ॥
चाल - उमावृष नाहीं मनीं तेव्हां रुपतव सगुण , सदाकरि चिंतन , अनन्य होऊन ,
आसधरी तुमची , कराया सेवा चरणाची ॥ आ . ॥
 
रत्नासुर तव भक्ति करी । पूजिती पार्थिव लिंग करी ॥
तोषवि तुजत्या वर देसी । मातला असुर जन त्रासी ॥
चाल - रक्षणा यावें या समया , वधुनि तो असुर जन त्रासी ॥
चाल - रक्षणा यावें या समया , वधुनि तो असुर नाम रत्नेश्वर , स्वयंभू लिंगवर तेणे सकलाची लोपली भीति तव जनांची ॥ आ . ॥
 
संनिध वाहे सोम गंगा श्रीविष्ठेद् ‌ भूतहि वारिधिगा । 
स्नानार्चन अभिषेकाला । इतर जलीं आवड ना तुजला ॥
कृपेने पाहि पाहि आम्हां । तुजवांचोनी नाहीं आम्हा कुणी ॥
दयार्द्र नयनीं करी कणव अमुची , घाली पाखर मायेची ॥ आ . ॥
 
ऎसे वर्णू किती देवा । अमितगुण समुह कसा गावा ॥
अमुचा कल्मष नासावा ॥ सतत तव घडो चरण सेवा ॥
चाल - इहपर पुण्य फला देई ॥
ध्यात तव चरण , सदा तुज शरण , अनंतज
अजाण दामोदर विनंती भवदु : ख्न हरायाची ॥ आ . ॥

कर्पूर गिरिसम कांतिदशकर शोभे शिरी गंगा ।
जवळी गणपति नृत्य करितो मांडुनिया रंगा ॥
 
अंकी अंबा सन्मुख नंदी सेविती ऋषी संगा ।
ब्रह्मादिक मूनि पूजा इच्छिती ध्याति अग्यंगा ॥
 
जय जय देवा आरती हरि हरेश्वरा । दयाळा ॥
काया वाचा मनोभावेम नमू परात्परा ॥ धृ . ॥
 
सुंदरपण किती वर्णूं रति - पति मदनाची मूर्ति ।
तेज पहातां संतृप्त होती कोटी गभस्ती ॥
 
वेदां नकळे पार जयाचा तो हा सुखमूर्ति ।
भक्तकाजकल्पद्रूम प्रगटे पाहूनियां भक्ति ॥
 
अंधक ध्वसुनी मेख विध्वंसुनी बलहत करी दक्षा ।
त्रिपुरा सुरशल मर्दूनि सुखकर खला करी शिक्षा ॥
 
तो तू अगुणी सगुण होसी भक्तांच्या पक्षा ।
धर्म स्थापुनि साधु रक्षिसी सूरांकृति दक्षा ॥
 
नारद तुंबर व्यास सुखादिक गाती सद् ‌ भावे ।
सनक सनंदन वशिष्ट वाल्मिक याना यश द्यावें ॥
 
चिन्मय रंगा भवभयभंगा हरि प्रिया धांवें ।
तवपद किंकर रामदास हा यासी नुपेक्षावे ॥

जय देव जय देव सोमनाथा ।
आरती ओवाळीतो मनोभावें आतां ॥ जय देव ॥ धृ ॥
 
मालुबाई सती पतिव्रता थोर ।
भक्ति करुनी आणिले सोरटी सोमेश्वर ॥
पतीने पाळत धरुनी पाहिला चमत्कार ।
जावा नंदाचा त्रास सोसिला फार ॥ जय . ॥ १ ॥
 
देखोनी सतीच्या त्रासाते देव ।
स्वप्नी प्रगटोनी सांगितसे सर्व ।
शेषरुपी येऊनी करीन वास्तव्य ।
धेनुसी वेष्ठुनी दुग्ध प्राशीन मी बरवे ॥ जय . ॥ २ ॥
 
स्वप्नाप्रमाणें नाथ शेषरुपी आले ।
धेनु वेष्ठुनी दुग्ध पिऊं लागले ।
देखोनी खोमणेराव भयचकित झाले ।
कुऱहाड फेकुनी देवा तुम्हां मारिले ॥ जय ॥ ४ ॥
 
उत्तर ऎकता मालू त्रासली फार ।
देखोनी खोमणा शाप दिलासे थोर ।
ऎकोनी शाप खोमणा कापे थरथर ।
प्रगटोनी देवा त्याचा केला उद्धार ॥   जय ॥ ४ ॥
 
खोमण्याचा उद्धार मालू देखोनी ॥
देवा तुजला मी बोलू कशा रीतीनी ।
मालूचे शब्द देवा ऎकोनी कानी ।
तत्काली उद्धरीली मालू भामिनी ॥ जयदेव ॥ ५ ॥
 
सर्परुपे निघतां भक्ति पाहूनी ॥
भक्त घेताती आनंदे उचलोनी ।
विधीयुक्त तुमची पुजा करोनी पाजिती दूग्ध तुम्हां शर्करा घालॊनी । जयदेव ॥ ६ ॥
 
सोमनाथा तुम्ही भक्ति भुकेला ।
मालू महादू यांचा उद्धार केला ।
अल्पबुद्धि खोमणा तोही उद्धरिला ।
आबा पाटील दास लागें चरणाला ॥ जयदेव ॥ ७ ॥

जगशिवशंकर गंगाधर गौरी कांता ।
प्रमाण आद्य गुरो तुज जय हर जगयंता ॥ धृ . ॥
 
कर्पुरगौरा कांती भस्मचर्चित काय ।
नीलप्रभ - कंठ विषें भूषणचि होय ॥
चंद्र दिवाकर वन्ही नेत्र तुझे तीन ।
चारी वेद मुखे तव दिव्य किती ध्यान ॥ १ ॥
 
न वर्णवे तव महिमा कुंठित मन - वाणीं ।
श्रुति ही मौनवीत त्या नेऽति असे म्हणुनि ॥
नटसी द्विगुणी परि तूं अससी गुणातीत ।
मायामय तव लीला मुग्ध करी चित्त ॥ २ ॥
 
होता भंग तपाचा जाळियला मदन ।
दक्षणखा नेसि लया होता अवमान ।
कल्पान्ती विश्वाचा करसि संहार ।
तांडव नृत्य तदा तव चाले बहु घोर ॥ ३ ॥
 
परि शिवा , तूं भोळा भाळसिं भक्तिला ॥
आत्मलिंगही देंसी रावण दैत्याला ॥
प्राशिसि विष जे दाहक हो ब्रह्मांडाला ।
भक्तिस्तव झेलिसि शिरी तू गंगौघाला ॥ ४ ॥
 
हर तूं हरसी पापा अन्   भव तापाते ।
शिव शंकर तूं देसी नित कैवल्यातें ॥
जय वरदा जय सुखदा सदाशिवा गतिदा ॥
गणेश नमुनी याची रति तव पायी सदा ॥ ५ ॥

भस्मासुरां करिसी स्ववरानें थोर । दैत्याचे मस्तकींठेवला कर ॥
त्याकरितां घेसी विष्णू अवतार । सिंहनाद लागे नाचाया मोर ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय सोमेश्वरदेवा । पंचारति करितों मी हरहर महादेवा ॥ धृ. ॥
रामाचे चरित्र सांगसि पार्वती । तेव्हा तुजला करी गिरिजा आरती ॥
अर्धांगी गिरिजेसह घेसी गणपती । ऎसी तुझी करणी जगतातें ख्याती ॥ २ ॥
तुझा हा उत्साह शुद्ध कार्तिक मासी । सत्वर जन येती तव दर्शनासी ॥
येती त्यांचे मनोरथ पूर्ण करीसी । म्हणुनि रघुसुत नमितो तवचरणापासीं ॥ ३ ॥
ःःःःःःःःःःःःःःःःः
मंगेश महारूद्रा जय पार्वतीवरा ॥
आरती ओवाळीन । शिवा भोळ्या शंकरा ॥ धृ. ॥
आपुले म्हणविसी । देशील आणिका हाती हांसतील संतजन ॥
कृपासागरमूर्ती ॥ मंगेश. ॥ १ ॥
सर्वत्र व्यापलासी । जळी स्थळी पाषाणी ॥
कृपेचा सागर हो । आम्हां पावे निर्वाणी ॥ मंगेश. ॥ २ ॥
विभूती व्याघ्रांबर । गजचर्म परिधान ॥
वासुकी हार शोभे । आला कृष्ण शरण ॥ मंगेश. ॥ ३ ॥
ःःःःःःःःःःःःःःःःः
जय देव जय देव जय आदि पुरूषा ।
त्रिभुवनपालक भक्तां देसी तूं हर्षा ॥ धृ. ॥
अर्धांगी हे तुझे पार्वती अबला ।
त्रिशुळा डमरू शोभे भस्माचा उधळा ॥
कपाळ हस्ती गळां रुंडाच्या माळा ।
भुजंग भूषण शोभे त्रिनेत्री ज्वाळा ॥ १ ॥
गजचर्माबर शोभे तुजला परिधान ।
ढवळा नंदी आहे तुझे पै वाहन ॥
विशाळकाळकुट कंठी धारण ॥
त्रिताप हरुनी भक्तां चुकविसी विघ्न ॥ जय. ॥ २ ॥
दिगंबर रूप तुझेलेवुनियां मुद्रा ॥
जटाभार शोभें ज्ञानसमुद्रा ॥
परशुराम पाळक एकदशरुद्रा ॥
निरसी हे भवरजनी चकोर स्वानंदा ॥ ३ ॥

मस्तकि जान्हूतनया विमलार्जुन तारी । भाळी रजनीनायक वामांगी गौरी ॥
नयनी पावक श्रवणी विनतसुतागौरी ॥ कंठी विषम तुंबळ व्याघ्रांबरधारी ॥ १ ॥
हर हर हर महादेव हर शिव भूतेशा, शिव हर नागेशा ।
उजळितों उत्तमदीपा, लावितो कर्पूरदीपा दुर करिं भवपाशा ॥ धृ. ॥
विश्वंभरा जटिला शिव कर्पूरगौरा । रतिपति जाळुनि क्रोधें त्वां वधिले त्रिपुरा ॥
शिव शिव नाम जपतां वाचे रघुवीरा । नकळे महिमा तुझा निर्गुण ॐकार ॥ हर. ॥ २ ॥
दशभुज पंचानन तूं वससी स्मशानीं । भस्मधूळ अंगी कथा परिध्यानी ॥
पन्नग रुळती गळां सुर भजती वाणीं । वृषारूढ तूं योगी शिव शूळपाणीं ॥ हर. ॥ ३ ॥
जपतसाधन तेथे साक्षी कर्माचा । तत्पर नामा योगी आश्रम धर्माचा ॥
तादर परमार्थी तूं भक्ता चौंसाचा । गावा स्वानंदाचा अंतक सर्वांचा ॥ हर. ॥ ४ ॥
सर्वहि सर्वेशा तूं सद्‌गतिचा दाता । मायेचे निर्मूळ शंकर तूं कर्ता ॥
एकविस स्वर्गे उंची त्याहूनि तूं वर्ता । वदनी तानाजीच्या शिव शिव हे वार्ता ॥ हर हर हर महादेव. ॥ ५ ॥
 
ःःःःःःःःःःःःःःःःः
 
जय देव जय देव श्रीमंगेशा ।
पंचारति ओवाळू सदया सर्वेशा ॥ धृ. ॥
सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी ।
गौरीरमणा आद्या मदनांतकारी ॥
त्रिपुरारी अधहारी । शिवमस्तकधारी ।
विश्वंबर विरुदे हें नम संकट धारिं ॥ १ ॥
भयकृत भयानाशन ही नामें तुज देवा ।
विबुधादिक कमळासन वांछिती तव सेवा ॥
तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा ।
अभिनय कृपाकटाक्षें मतिउत्सव  द्यावा ॥ जय. ॥ २ ॥
शिव शिव जपतां शिव तू करिसी निजदासा ।
संकट वारी मम तूं करिं शत्रुविनाशा ॥
कुळवृद्धीते पाववि हीच असे आशा ।
अनंतसुत वांछितसे चरणांबुजलेशा ।जय देव जय देव. ॥ ३ ॥
 
 
ःःःःःःःःःःःःःःःःः
उपमा नाही रूपी निर्गूणगुणरहिता ।
कैलासाहुनि मानस धरिला भजकार्था ॥
काशी आदि करूनी गणनाच्या तीर्था ।
लिंगदेहे वससी भक्ती भावार्था ॥ १ ॥
जय देव जय देव अजिनांबरधारी ।
आरती तुज मंगेशा निर्गुण उपचारी ॥ धृ. ॥
गजचर्म परिधान शशि धरिला शिरी ।
भूधर जिंकुनी कंठी केली उत्तरी ॥
जटाजूटी बसे गंगा सुंदरी ।
वाहन नंदी तुझें अर्धागी गौरी ॥ २ ॥
मंगलदायक तुझें शिवनाम घेतां ।
तत्क्षण भस्म होंती तापत्रयव्यथा ।
अभिन्नभिन्न भाव दासाच्या चित्ता।
चरणाविहित न करी मज गौरीकांता ॥ ३ ॥

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ।
त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ॥
वृषभारुड फणिभूषन दशभुज पंचानन शंकरा हो ।
विभूतिमाळाजटा सुंदर गजचर्माबरधरा हो ॥ धृ. ॥
पडलें गोहत्येचे पातक गौतमऋषिच्या शिरी हो ।
त्याने तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरी हो ॥
प्रसन्न होउनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ।
औदुंबरमुळि प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय. ॥ १ ॥
धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णू किती हो ।
आणिकही बहुतीतें गंगाद्वारादिक पर्वती हो ॥
वंदन मार्जन करिती त्याचे महा दोष नासती हो ।
तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ जय. ॥ २ ॥
ब्रह्मगिरींची भावे ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ।
तै ते काया कष्टें जंव जंव चरणी रूपती खडे हो ।
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्याचें झडे हो ।
केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पाया पडे हो ॥ जय. ॥ ३ ॥
लावुनिया निजभजनी सकळहि पुरविसी मनकामना हो ।
संतति संपत्ति देसी अंती चुकविसी यमयातना हो ॥
शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो ॥
गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ जय. ॥ ४ ॥
ःःःःःःःःःःःःःःःःः
शुक्रेश्वर सिद्धेश्वर शंभो महादेवा ।
विश्वेश्वर त्रिगुणालय दिनरजगी घ्यावा ॥
मुकुटी गंगा भाळी शशि नीलग्रीवा ।
सुंदर ध्यान दिगंबर जगदात्मा गावा ॥ १ ॥
जय देव जय देव जय गिरिजारमणा ।
त्रिपुरांतक हर रुद्रा नमितो तवचरणा ॥ धृ. ॥
नमिती सुरमुनी ऎसा तूं शंकर भोळा ।
होऊनी याचक येऊनि चिलया उद्धरिला ॥
मार्कंडेयालागी मृत्यू चुकविला ॥
मत्करुणा कां न ये जिव उरला डोळां ॥ जय. ॥ २ ॥
जन्मार्जित दोषाने चौर्यांशी फिरलो ।
कवण्या योगें न कळे नरजन्मा आलों ॥
विसरुनि हितमतिगतिला भवडोहि फसलो ।
तापत्रयसंतापे जर्जर बहु झालो ॥ जय. ॥ ३ ॥
मृगजलतृष्ण लटकी हे मजला कळले ।
मायेच्या अनुसंगे कवटाळुनि धरिले ॥
कामक्रोधादिक हे रिपु जागे केले ।
विषयांच्या लोभाने स्वहित बुडविले ॥ जय. ॥ ४ ॥
ऎसी दु:खे वदतां थकलो मी ताता ।
आतां अंत न पाहें होई मज दाता ॥
विष्णूचा कैवारी सांब प्रिय असतां ।
मग कां करणे लागे भवसागरचिंता । जय. ॥ ५ ॥
ःःःःःःःःःःःःःःःःः
आरती चंद्रशेखराची ।
अंबिकेश्वरा शंकराचि ॥ धृ. ॥
कमलासना नंदिवहना ।
रजताचली रचित भवना ॥
त्रिनयना मूर्ति पंचवदना ।
गिरिजा वामांगी ललना ॥
चाल ॥ मस्तकी गंगा भंगसंगा ।
अंगाभरण भूति नुति, करिति सुर नति, प्रेमाभक्ति यति, वरिति नित्य ज्याची दुर्लभा वरिति नित्य ज्याची ॥ आर. ॥ १ ॥
कविगण ध्याति पदारविंदा ।
प्रभूच्या गति सुगुणवृन्दा ॥
यद्यशस्तुल्य इंदुकुंदा ।
भजतां तारितसे मंदा ॥
चाल ॥ यद्रति निखिलसौख्यजननी ।
होऊनि अभित, चरित भु निरत, सतत जन मुक्ति नीजसुखें भरित होति साची ॥ सर्वदा भरित होति साची ॥ आरती. ॥ २ ॥
वाणी देवी धरी वीणा ।
विधि करि करताल निपुणा ॥
इंदुरा गानरचन पूर्णा ।
इंद्र पटुवेणुनादकर्णा ॥ चाल ॥
धिमधिम थोंग मृदंगाचा ।
निशामुखिं नाद सांद्र पटू मंद हरि करिंद्र सुंदरस्य नाकेंद्र सर्व लक्षुनि सेविति विधृति तांडवांची ॥ 
शंभुला विघृति तांडवाची ॥ आर. ॥३॥
निरुपमिलिला नीळकंठा ।
वर्णिता श्रुतिहि  होति कुंठा ॥
त्रिकाळीं धरुनि अक्षकंठा ।
बुधसभा पूजि चिंरोत्कंठा  ॥ चाल ॥
करिती नृत्य थैयथैया ।
अप्सरा धरा, धारकोगेंद्रावरा, हरा रंजविति परा, प्रीति ज्या गानसेवनाची प्रभुला गानसेवनाची ॥ आर. ॥ ४ ॥
यत्स्मृति पापसिंधुतरणी । विधिहरी तेही रत स्मरणी ॥
गहना प्रभुवराचि करणी । नयनयुग  इंदु आणि तरणी ॥
चाल ॥ निधिदिनिं वासुदेव पाळी । विशाळिं भाळि, शोभलि श्रीदलालि रुद्राक्षमालीं, काकलित लळित अतिकांति धवलि विभुचि ॥
रंजनी कांति धवलि विभुचि ॥ आरती. ॥ ५ ॥

जय देव जय देव वंदे तं गिरिशं ।
विधिहर वासववंदित चरणांबुज मनिशं ॥ धृ.॥
रनीकरयुतभालं भुवनत्रयपालं ।
करतलधृतशरवाल दानवकुलकालं ॥
कंठे धृतविषजांल नरमस्तपाल विग्रहधृतसुव्यालं वरित भवं जालं ॥ १ ॥
निगमागश्रु तिसारं भुजगाधिपहारं ।
करुणा पारावारी भस्मीकृत मारं ।।
भैरवगणपतिवारं गिरितनया धारं ।
शुद्धं जगदुद्धारं संश्रित भुजसारं ॥ २ ॥
फणिवर कुंडल मंडित गंडस्थल युगुलं मूर्घ्नाधृत कलिनाशक गंगाशुभ सलिलं ।
त्रिभुवन पावनकृपया पीता खिलगरलं ॥ स्वेच्छाह्र्त कमलासन पंचकमुख कमलं ॥ जय. ॥ ३ ॥
कटितटि विलसद्धारणर्मांबर गमलं ।
भार्गवम शिवापह वरमंडित करकमलं ॥
स्कंदंमृग करहिम कर दुग्धार्णव धवलं ।
विजिताराति सुशोभित पंचानन कमलं ॥ जय. ॥ ४ ॥
पंचास्य गंगायुत भाले धृतनयनं । जनसर्ग स्थितियोजित पद्मत जलशयनं ॥
घ्वसितद क्षाध्वहर मदकंदल नयनं ।
निजपद पद्मजसंगत नारायण शरणं ॥ जय. ॥ ५ ॥
ःःःःःःःःःःःःःःःःः
जय देव जय देव जय जी मंगेशा ।
आरती ओवाळूं तुजला सर्वेशा ॥ धृ. ॥
महास्थान तुझे गोमांतक प्रांती ।
भावेकरुनी करितां तुजला आरती ।।
महाभक्त तुझे निशिदिनिं गुण गाती ।
मी तो दास तुझ्या चरणांची माती ॥ जय. ॥ १ ॥
धरिलासी अवतार दुष्टां माराया ।
साधूसंत जन पृथ्वी ताराया ॥
भक्तांचा तारक तूं मंगेशराया ।
सर्प अक्षय करितो तुजवरती छाया ॥ जय. ॥ २ ॥
दु:खदारिद्रादिक ही विघ्नें निवारी ।
संकष्टापासूनी मजलागीं तारीं ॥
शक्ती घेऊनि करीं दृष्टां संहारी ।
जैसा धेनू रक्षी कृष्ण नरकारी ॥ जय. ॥ ३ ॥
तत्व गुणवर्णन करितां पुण्याचे चेव ।
तुझिया चरणी आहे माझा दृढ भाव ।
तुझे देवालयीं बहुयचि उत्साह ।
मोरेश्वर तुज नमितो चरणी ठाव ॥ जय. ॥ ४ ॥
ःःःःःःःःःःःःःःःःः
जय देव जय देव जयगिरिजारमणा ।
पंचप्राणें आरती स्वामीच्या चरणा ॥ धृ.॥
अभिनय सुंदर गंगाकाशीपुरवासी ।
विश्वेश्वर येऊनियां तारक उपदेशी ।
जातां उत्तर पंथे हिमगिरिगगनासी ।
भजतां केदारासी कलिकिल्मिष नाशी ॥ जय. ॥ १ ॥
स्मरतां महाकाळ नगरीं उज्जयिनी ।
प्रदोषकाळी पूजा पाहावी नयनीं ॥
सोरटि सोमेश्वर नांदे त्रिभुवनीं ।
चित्तीं चिंतन केल्या राहे निज सदनीं ॥ जय. ॥ २ ॥
औंढकपुरिचें वन हें दारुण वृक्षांचा ।
भूषण नागेशाचा मणिमयमुक्तांचा ॥
परळीवैजेश्वर हरिहरतीर्थाचा ।
ऎसा शंकर शोभे बिल्वपत्राचा ॥ जय. ॥ ३ ॥
ॐकारममलेश्वर रेवापुरपटणीं ।
हरिहरयुद्धे झालीं बाणांच्या खाणी ॥
शेवाळी घृष्णेश्वर वदतो कपि वाणी ।
वेरूळीची महिमा ऎकावी श्रवणीं ॥ जय. ॥ ४ ॥
गौतमऋषिच्या तपे गोदा आली हे ।
त्र्यंबकराजा नमितां भवभय जाता हे ॥
शाकिनी डाकिनी काळा ज्या क्षेत्री राहे ।
भीमाशंकर सुंदर तेथुनि दिसताहे ॥ जय. ॥ ५ ॥
दक्षिण यात्रा करितां जाता ते मार्गी ।
शिवरात्रीं जागरण मल्लिकार्जुनलिंगी ॥
रामेश्वर रत्नाकार मौक्तिकिच्या संगी ।
द्वादश लिंगे कथिली कृष्णाते अंगी ॥ जय. ॥ ६ ॥

जय देव जय देव जय शंकर सांबा ।
ओवाळीन निजभावे नमितों मी सद्‌भावें वर सहजगदंबा ॥ धृ. ॥
जय जय शिव हर शंकर जय गिरिजारमणा ।
पंचवदन जय त्र्यंबक त्रिपुरासुरदहना ॥
भव दव भंजन सुंदर स्मर हर सुखसदना ।
अविकल ब्रह्म निरामय जय जगदुद्धुरणा ॥ जय. ॥ १ ॥
जगदंकुरवरबीजा सन्मय सुख नीजा ।
सर्व चराचर व्यापक जगजीवन राजा ।
पार्थित करुणावचनें जय वृषभध्वजा ।
हर हर सर्वहि माया नमितों पदकंजा ॥ जय. ॥ २ ॥
गंगाधर गौरीवर जय गणपतिजनका ।
भक्तजन प्रिय शंभो वंद्य तूं मुनिसनकां ॥
करूणाकर सुखसागर जननगिंच्या कनका ।
तव पद वंदित मौनी भवभ्रांतीहरका ॥ जय. ॥ ३ ॥
 
ःःःःःःःःःःःःःःःःः
 
वृषवाहन वृंदारक वृंदकवर शंभो ।
वारणसदजिनवासो वारिदगलशंभो ।
वासववंदितअंभोविकसितपदशंभो ।
वाक्पतिवर्णितवैभव विश्वेश्वर शंभो ॥ १ ॥
जय देव जय देव शिवशंकर शंभो ।
श्यामल शरण परात्पर शशिशेखर शंभो ॥ धृ. ॥
भोंगि विभूषण भासुर भावनभुज शंभो ।
भुसूर भूरिभयापद भगवन् भय शंभो ।
भैरव भक्ति कुंभोदर क्षणभर शंभो ।
भासित भूत भयंकर भिक्षाटन शंभो॥ जय. ॥ २ ॥
गंगाधर गिरिजावर गुह्यकगुण शंभो ।
गाढ करा सितगुणजितगायनगल शंभो गीतागोरसभुग्  भो गणपतिगुरु शंभो ॥
गंभीर गोपतिगर्जन गोपालक शंभो ॥ जय. ॥ ३ ॥
 
ःःःःःःःःःःःःःःःःः
शिव सांब शिव सांब शिव धूतपापा ।
त्वत्सेवकदासांच्या हरिसी भवतापा ॥ धृ. ॥
त्वन्मूर्तीध्यानचि बहू प्रेमळ आवडतें ।
पाहतां चंद्र ललाटी मन तल्लिन होतें ॥
पिंगट जटांत गंगाजळ शिरिं डळमळतें ॥
निर्मळ पाणी शीतळ सर्वांगी स्रवतें ॥ शिव. ॥ १ ॥
परिधान व्याघ्रांबर रुंडांच्या माळा ॥
भासे शुद्ध मयूरापरि कंठहि काळा ॥
तृतीय नेत्री निघती दीप्ताग्नि ज्वाळा ॥
अंगावर धुंदकारे नागांचा मेळा ॥ शिव. ॥ २ ॥
जगदीशा मज दे पादांबुज सेवा ॥
आसक्त भ्रमरापरि होउनि रस घ्यावा ॥
माया ही जग अवघें उपदेश व्हावा ॥
विष्णूने ज्ञानाचा सुदीप लावावा ॥ शिव. ॥ ३ ॥

जय जय नाथ निरामय शिव शिव अविनासी ॥
प्राणनकी पंचारति वारो मैं खासी ॥ धृ. ॥
अलखखलखके कारन धर गुणकी देही ॥
गुणमायाके संगत त्रिभुवन रचवाई ॥
हरिहर ब्रह्मा आपहि बन इह रखवाई ॥
सब घट पूरत न्यारे राजत सुखसाई ॥ जय. ॥ १ ॥
कब हूं मन दीपनमों मंदर गिरी कब हूं ॥
कैलासाचल कब हूं भक्तन मन कब हूं ॥
नंदन बन दंडक बन जल थल कछू कोहूं ॥
जित देखू उत तू हूं तुम चिन नहिं कोहूं ॥ जय. ॥ २ ॥
तूं मायासो प्राणी भूल रहे तोहे ॥
तूं बजानेसो तूंही बन गुनगन खोये ॥
अनन चरणशणालेत तुमपे जो आयें ॥
माया तर मंगिशसुत इहपर सुख पाये ॥ जय. ॥ ३ ॥
 
ःःःःःःःःःःःःःःःःः
आरती परम ईश्वराची ।
दिगंबर गौरिसह हराची ॥ धृ. ॥
भस्मप्रिय कश्मलांग भंगा ।
शिरावरि दुरित हरितगंगा ॥
त्रिलोचन भस्मिकृत अनंगा ।
सतत विज्ञान पतितदंगा ॥ चाल ॥
भूतपति पूतचरित शंभो ।
समरिं अरिदमित, अमर वग्नमित, कुमर गणदुमित उमेसह अमित केलि ज्याची ॥
वल्लरी प्रणवसिद्धि ज्याची ॥ १ ॥
अमल शिव जटिल नागभूषा ।
नीलग्रीव कालकूट शोषा ॥
सामप्रिय अर्चित प्रदोषा ।
स्वपदनत भक्तवृंद तोषा ॥ चाल ॥
नृकपाल मालकंठ धारा ।
सुपट गजअजिन, धुपट भववृजिन निपट दशभुजिन, निधृत सजिव विग्रहाची ।
कांतिआते मारनि प्रहाची ॥ २ ॥
श्वेतसित कर्पूरांग भासासा ।
पितृसुख केलिदाव भासा ॥
निगम कैलास गिरि निवासा ।
सुख प्रदव्याघ्र चर्मवासा ॥ चाल ॥
सांब हर मंगलांग यो़गी ।
मुसलपट्ट त्रिशुल, खङधर सुशिल, करित जनकुशल, स्मरांतक कुशल बुद्धि ज्याची ॥
वानिती शैव कीर्ति ज्याची ॥ आरती. ॥ ३ ॥
शैलजा आनन कंजभृंगा ।
योगी ह्रत्तिमिरहर पतंगा ॥ चाल ॥
ब्रह्मविज्ञान जलतरंगा ।
विमल वैराग्य दुर्ग शृंगा ॥
प्रणतर विदास चरणयुगुलीं ।
दुरित भयमरण, विमुर कृत शरण, भवाब्धी तरण, भवार्पण मालरव कुलांची ।
करित हरकरि ग्राहसाची ॥ आरती ॥ ४ ॥
 
ःःःःःःःःःःःःःःःःः
 
जय देव जय देव जन रतिपतिदहना ॥
मंगल आरती करितों छेदी अधविपिना ॥ धृ. ॥
 
गौरीहर गंगाधर तनु कर्पूरऎशी ॥
गजव्याघ्राची चर्मे प्रेमें पांघुरसी ॥
कंठी कपाळमाळा भाळीं दिव्य शशी ॥
अनिलाशन भूषण हर शोभत कैलासीं ॥ जय. १ ॥
 
त्रिपुरासुर अतिदस्तुर प्रबल तो झाला ॥
तृणवत मानित वासव विधी आणि हरिंला ॥
तेव्हां निर्जर भावें स्मरताती तुजला ॥
होउनि सकृप त्यांवरी मारिसी त्रिपुराला ॥ जय. ॥ २ ॥
 
जे तव भक्तिपुरस्सर जप तप स्तव करीती ॥
त्यांते अष्टहि सिद्धी स्वबलानें वरतीं ॥
शिव शिव या उच्चारे जे प्राणी मरती ॥
चारी मुक्ती येऊनी त्यांचा कर धरिती ॥ जय. ॥ ३ ॥
 
वृषभारुढा मूढां लावी तव भजना ॥
भवसिंधु दुस्तर तो करि गा सुलभ जना ।
होवो सुलभ मला तव मायेची रचना ॥
दास म्हणे ताराया दे तव सकृप वचना ॥ जय. ॥ ४ ॥

जय जय वो शिवसांबा अंबादेवीच्या निजवरा हो ।
जटाजूट शुळपाणी कर्पुरगौरा गंगाधरा हो ॥धृ॥
पंचवदन शशिभूषण नंदीवहना दिगंबरा हो ।
कपाळपाणी शंभू नीळग्रीवा शिवशंकरा हो ।
भस्मधूलित वपु सुंदर शोभे भाळीं नेत्र तिसरा हो ॥१॥
वामांकवरि गिरिजा शोभे कमळाक्षा सुंदरी हो ।
जीच्या ईक्षणमात्रें जगनगरचना नाना परि हो ।
स्थिरचर सुरनर किन्नरव्यक्ती ब्रह्मांडाभीतरि हो ॥२॥
व्याघ्रांबर फ्गणिवरधर लवथव गजचर्मांबरधरा हो ।
रुद्राक्षाचे भूषण मस्तकिं भूषित बिल्वतुरा हो ।
स्मशान निलईं क्रिडसि संगिं घेउनिया सहचरा हो ॥३॥
रघुविर प्रियकर वंदुनि करितों निरंजन आरती हो ।
सद्भावें गुणकीर्तीवर्णन केली यथामती हो ।
भूधर शिणला जेथें तेथें माझी प्रज्ञा किती हो ॥४॥
 
ःःःःःःःःःःःःःःःःः
जयजय शिवशंकरा कर्पुरगौरा गिरिजावरा हो ।
कृष्णातीरनिवासा स्वामी श्रीशकुंतेश्वरा हो ॥धृ॥
जटाजूट शशिभूषण नीलग्रीवा गंगाधरा हो ।
दशभुजपंचानना त्रिशूलपाणी विश्वंभरा हो ।
पिनाकधर हरशंभुनंदीवाहना दिगंबरा हो ॥१॥
ब्राह्मणशापें मघवा होउनिया पक्षि आपण हो ।
कृष्णातीरीं तप केलें तेणें वृक्षावरी बसूनि हो ।
ह्मणवुनि येणें केलें सांडुनि कैलासालागुन हो ॥२॥
आपुल्या ईक्षणमात्रें करुनि इंद्राचा उद्धार हो ।
भक्तजनाच्या साठीं वसते झाले नीरंतर हो ।
निरंजन गुण गातो होउनि चरणाचा किंकर हो ॥३॥
 
ःःःःःःःःःःःःःःःःः
जयदेव जयदेव जयजय शिवसांबा । आरती ओवाळू तुजसह हेरंबा ॥धृ॥
माथा मुकुट जटेचा हेमाकृति पिवळा ।
भस्म विलेपन आंगीं रुद्राक्ष - माळा ।
नाना सर्पविभूषण शोभे अवलीळा ।
कंठीं धारण केलें दुर्धर हळहळा ॥१॥
दशभुजा पंचानन शिरिं भागिरथी विलसे ।
कर्पुरवर्ण विराजित मंदस्मित भासे ।
प्रतिवदनीं नेत्रत्रय सुंदररूप दिसे ।
मन्मथ मरोनि गेला ज्याच्या सहवासें ॥२॥
गजचर्मांबर ओलें वेष्टुनिया वरुतें ।
त्रिशूळ डमरु हस्तकिं घेउनि पाशांतें ।
दंडन करि दुष्टाचें खंडुनि बहुमत्तें ॥३॥
वामांकावरि गिरिजा शोभे सुंदरी ।
सव्यांकावरि गणपति पाशांकुशधारी ।
निरंजन  पंचारति घेउनिया करीं ।
सद्भावें ओवाळी हरगुरु शशिधारी ॥४॥

जय जय शिवशंभो, शंकरा । हर, हर कर्पुंरगौरा ॥धृ०॥
अघटित घटित कृती तुझि सारी । विश्‍वंभर, संसारी
तुंबळजळगंगासहित शिरीं । प्रलयानळ तेजःश्री
केवळ निळकंठ विषधारी । चंद्रामृत रसधारी
लंपट अर्धांगी प्रिय नारी । अससी परी मदनारी
समान अहिमुषकासनमयुरा । गणपति-स्कंदकुमारा ॥१॥
अनंत ब्रम्हांडांच्या माळा । फिरविसि अनंत वेळा
सच्चिदानंद तुझी कळा । न कळे, भ्रम पदे सकळां
किंचित् जाणील तो नर विरळा । ब्रह्मांडामधिं आगळा
ब्रह्मज्ञानाच्या विशाळा । अभ्यासाच्या शाळा
नेणुनि बहु करती पुकारा । मूळाक्षर ॐकारा ॥२॥
आज्ञेविण न हले तृण, पाणी । पवनगजज्जिववाणी
भ्रमतीं नक्षत्रें शशितरणी । पन्नग, शिरिंधरी धरणी
खग-मृग-तरु-कीटक जडप्राणी । वर्तति ज्या अनुसरुनी
स्वतंत्र तो तूंची, तुझी करणी । शिव, शिव, हे शुळपाणी
अनाथ दीनांचा तूं आसरा । लोकत्रयिं नसे दुसरा ॥३॥
शरणागत आलों पायांस । संरक्षण करि यास
अखंड रक्षिसि तूं । विश्‍वास । आहे बहु विश्‍वास
सदैव हृत्कमलीं करि वास । एवढी पुरवी आस
आशा न करावी उदास । बोले विष्णूदास
अनंत भूलिंगा अवतारा । भवनिधिपार उतारा ॥४॥
 
 
ःःःःःःःःःःःःःःःःः
जय जय शिव शिव शिव शंभुशंकरा ।
हरहर हर महादेव, चंद्रशेखरा ॥धृ॥
जयजय गजवदन तात, मदन-दहना ।
जयजय प्रभु विश्‍वनाथ, नंदिवाहना ।
जयजय नत दिन अनाथ, जन कृपा करा ॥जयजय०१॥
शोभति शिरिं वेणि जटा मुगुट भूषणें ।
वाजति घन पैंजणादि, डमरु कंकणें ।
वर्णिति कवि अर्धनारी, नर नटेश्‍वरा ॥जयजय०२॥
गंगाधर शूलपाणि भाललोचना ।
पंचानन गज प्रपंच-तापमोचना ।
हे कर्पुरगौर गौरीनाथ ईश्‍वरा ॥जयजय०३॥
अन्यायी परि मी अलों, शरण या पदा ।
तूं करुणा करुनि सकल, वारि आपदा ।
म्हणे विष्णुदास धांव पाव किंकरा ॥जयजय०४॥
 
ःःःःःःःःःःःःःःःः
जयशिवशंकर, सर्वेशा । परमेश्‍वर, हरिहरवेषा ॥धृ०॥
कर्पुंरगौरा, शुभवदना । श्रीघननीळा, मधुसुदना
सदाशिव, शंभो, त्रिनयना । केशवाच्युता, अहीशयना
अखंड, मी शरण मदनदहना । दाखवी चरण गरुडवाहना
चाल - दयाळा हिमनगजामाता । कृपा कर श्रीलक्ष्मीकांता
स्तवितों दिनवाणि, पाव निर्वाणीं, गजेंद्रावाणि
सोडवी तोडुनि भवपाशा । धाव अविलंबें जगदीशा ॥जय.॥१॥
सुशोभितजटामुकुटगंगा । धृतपदालंच्छनभुजंगा
वामकरतलमंडितलिंगा । त्रिशुळ, जपमाळ, भस्म अंगा
निरंजन, निर्गुण, निःसंगा । सगुण रुप सुंदर आभंगा
चाल- क्षितितळवटीं जगदोद्धारा । करुणामृतसंगमधारा
जाहली प्रकट, चिंतितां लगट, शीघ्र सरसकट
करी नटखट चट गट क्लेशा । पालटवी प्राक्‍तनपटरेषा ॥जय० ॥२॥
लाविती कर्पुरदिप सांभा । आरती करिती पद्मनाभा
दिसतसे इंद्रभुवन शोभा , कीर्तनें होति, गाति रंभा
निरसुअ कामक्रोधलोभा । लाभति नर दुर्लभ लाभा
चाल- द्विजांच्या सहस्त्रावधि पंक्‍ति । प्रसादें नित्य तृप्‍त होती
चंद्रदिप भडके, वाद्यध्वनि धडके, पुढें ध्वज फडके
पतित जन होती निर्दोषा । ऐकुनि भजनाच्या घोषा ॥जय० ॥३॥
दीन ब्रिद वत्स वाढविणें । यास्तव रचिलें वाढवनें
प्रभुच्या चरणाश्रयिं रहाणें । वांच्छिति सनकादिक शाहणे
कशाला भागिरथिंत न्हाणें । तरि नको पंढरपुर पहाणें
पहातां समुळ दुःख विसरे । भुलोकीं वैकुंठचि दुसरें
गरुड-बैलास, वाटे कैलास, चढे उल्हास
विष्णुदास पावे हर्षा । करितां नमन आदिपुरुषा ॥जय० ॥४॥

कालभैरवाची आरती
आरती ओवाळू भावे, काळभैरवाला ॥
दीनदयाळा भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ॥
देवा, प्रसन्न हो मजला ॥धृ०॥
धन्य तुझा अवतार जगीं या, रौद्ररूपधारी ।
उग्र भयंकर भव्य मूर्ति परि, भक्तांसी तारी ।
काशीक्षेत्री वास तुझा तू, तिथला अधिकारी ।
तुझिया नामस्मरणे पळती, पिशाच्चादि भारी ॥
पळती, पिशाच्चादि भारी ॥आरती०॥१॥
उपासकां वरदायक होसी, ऐसी तव कीर्ती ।
क्षुद्र जीव मी अपराधांना, माझ्या नच गणती ।
क्षमा करावी कृपा असावी, सदैव मजवरती ।
मिलिंदमाधव म्हणे देवा, घडो तुझी भक्ती ।
देवा, घडो तुझी भक्ती । आरती० ॥२॥काळभैरवाची आरती
उभा दक्षिणेसी काळाचा काळ ।
खड्‍गडमरू हस्तीं शोभे त्रिशूळ ॥
गळा घालुनिया पुष्पांची माळ ।
आपुलिया भक्ताचा करितो सांभाळ ॥१॥
जयदेव जयदेव जयक्षेत्रपाळा ।
आरती ओवाळू तुमच्या मुखकमळा ॥ जयदेव जयदेव०॥
सिंदूरगिरीं अवतार तुझा ।
काशीपुरीमध्ये तू योगीराजा ।
चरणी देशी जागा तू स्वामी माझा ।
आर्ता भक्तांचा पावशिल काजा ॥२॥ जयदेव०॥
उत्तरेचा देव दक्षिणी आला ।
दक्षिण केदार नाव पावला ।
काठ्या कावड्या येती देवाला ।
चांग भले बोला शीण हरला ॥३॥ जयदेव०॥
पाताल भुवनीं थोर तुमची ख्याती ।
पर्णूनी योगेश्वरी स्वभुवना नेहती ॥
कानाचा मुद्रिका देती सल्लाळा ।
तू माय माऊली शेषाचा माळा ॥जयदेव०॥
पाची तत्त्वांची करुनिया आरती ॥
ओवाळू या काळभैरवाची मूर्ती ॥
अनन्यभावे चरणी करुनीया प्रीती ॥
नारायण म्हणे मुक्ति या निजभक्ताप्रती ॥जयदेव जयदेव०॥