गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जून 2024 (17:07 IST)

सनस्क्रीन योग्य पद्धतीनं लावताय का? कधी लावायचं आणि किती प्रमाणात लावायचं?

Sunscreen Mistakes To Avoid
जेसिका ब्रॅडली
सुंदर दिसावं असं आजच्या काळात प्रत्येकालाच वाटतं. त्वचेचं सौंदर्य आणि आरोग्य त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणूनच अलीकडच्या काळात सनस्क्रीनचा सर्रास वापर केला जातो. मात्र याविषयी योग्य माहितीचा अभाव दिसून येतो. सनस्क्रीनसंदर्भातील अनेक शंकांचं निरसन करणारा हा लेख...
 
सूर्यकिरणं कार्सिनोजेनिक (carcinogenic) असतात म्हणजे ज्यामुळे कॅन्सरची वाढ होऊ शकते असे असतात. त्यांच्यापासून स्वत:चं संरक्षण योग्यरितीनं कसं करायचं याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया.
 
आपल्या आरोग्यासाठी सनस्क्रीनचा वापर करणं हाच सर्वांत उत्तम पर्याय असल्याचं सर्वसामान्यपणे मानलं जातं. 80 टक्क्यांपेक्षा जास्त मेलानोमा हा त्वचा कॅन्सर (melanoma skin cancer) सनबर्नमुळे म्हणजे सूर्यकिरणामुळे त्वचा उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे हे होतं. दरवर्षी त्याची संख्या वाढते आहे.
 
जगभरात दरवर्षी साधारणपणे 15 लाख त्वचा कॅन्सरचे रुग्ण आढळतात. 2040 पर्यंत हा आकडा 50 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
 
हे वास्तव असताना आणि लोकांना सूर्यप्रकाशामुळे असणाऱ्या धोक्यांसंदर्भात वारंवार सूचना देऊनसुद्धा, सनस्क्रीन कसं आणि कधी वापरायचं याबाबतीत बरचसा गोंधळ दिसून येतो.
 
प्रखर सूर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण का केलं पाहिजे?
जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या अंगावर पडतो तेव्हा त्यातील यूव्ही रेडिएशन किंवा अतिनील किरणोत्सर्गामुळे आपला डीएनए, प्रोटीन्स आणि त्वचेच्या पेशीत आढळणारे इतर रेणू यांचं नुकसान होतं, असं रिचर्ड गॅलो म्हणतात. ते कॅलिफोर्निया विद्यापीठात वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
 
सूर्यकिरणांमधील अतिनील किरणोत्सर्ग माफक प्रमाणात आपल्या अंगावर घेतल्यास त्यामुळे आपल्या त्वचेच्या पेशींना व्हिटॅमिन डी तयार करण्यास मदत मिळते. मात्र आपण जसे अती प्रमाणात सूर्यप्रकाश अंगावर घेतो तेव्हा आपली त्वचा मेलानिनचं उत्पादन करून रापण्यापासून त्वचेचं संरक्षण करते.
 
गॅलो म्हणतात, "जर अती प्रमाणात सूर्यप्रकाश अंगावर घेतला गेला तर त्वचा स्वत:चं संरक्षण करू शकत नाही आणि त्यामुळे त्वचा काळवंडते."
 
यामुळे आपल्या पेशीतील डीएनएचं नुकसान होतं. त्यामुळे अकाली वार्धक्य येऊ शकतं आणि त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो, असं गॅलो सांगतात.
 
सर्वसामान्यपणे त्वचेचे कॅन्सर होण्यामागे अतिनील किरणोत्सर्गच कारणीभूत असतो. एसपीएफ (SPF) कमी प्रमाणात असलेल्या सनस्क्रीनमुळे सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणोत्सर्गाचा मारा थोडासा कमी होतो. मात्र अनेकवेळा यामुळे जे नुकसान व्हायचं आहे ते होऊ शकतं.
 
सूर्यापासून येणारा किरणोत्सार अगदी कमी प्रमाणात असला तरी त्यामध्ये कॅन्सर निर्माण करण्याची क्षमता आहे.
 
एसपीएफ काय असतं आणि ते आपल्याला किती प्रमाणात हवं?
एसपीएफ (SPF) म्हणजे 'सन प्रोटेक्शन फॅक्टर'. याच्याशी निगडीत जो आकडा सनस्क्रीनच्या बाटलीवर असतो त्यातून हे लक्षात येतं की ते निष्प्रभ ठरण्यासाठी किती प्रमाणात अतिनील किरणोत्सर्ग लागतो. त्यामुळेच एसपीएफ जितका अधिक तितकेच तुमच्या त्वचेचं संरक्षण अधिक. मात्र एसपीएफमुळे फक्त अतिनील किरणोत्सर्गापासून होणाऱ्या संरक्षणाची पातळी कळते. अतिनील किरणोत्सर्गापासून असणारं संरक्षण एका वेगळ्या मानांकनाद्वारे दाखवलं जातं.
 
दिवसभरात सूर्य जसजसा वर चढत जातो तसतसे आपल्यावर पडणारी अतिनील किरणोत्सर्ग बदलत जातात. सूर्य जितका वर असतो तितकेच आपण सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेला सामोरे जात असतो. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेदरम्यान सूर्याची किरणं सर्वाधिक प्रखर असतात.
 
सनस्क्रीन लावण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?
2018 मधील एका अभ्यासात आढळलं की सनस्क्रीन लावल्यानंतर अतिनील किरणोत्सर्गापासून जो धोका उत्पन्न होतो त्यातून बचाव होऊ शकतो.
 
साधारणपणे सनस्क्रीन त्वचेवर स्थिरावण्यास जवळपास 10 मिनिटे लागतात. अर्थात उन्हात जाण्यापूर्वी 20-30 मिनिटे आधी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यामुळे सनस्क्रीन त्वचेमध्ये शोषले जाण्यास पुरेसा वेळ मिळतो.
 
सनस्क्रीन दोनदा लावणं चांगलं ठरू शकतं. कारण अभ्यासातून असं दिसून आलं आहे की बहुतांश लोक कमी प्रमाणात सनस्क्रीन लावतात.
 
एका अभ्यासानुसार संशोधकांनी त्यात सहभागी झालेल्या 31 जणांना प्रयोगशाळेत काळ्या प्रकाशाखाली सनस्क्रीन लावण्यास सांगितलं आणि संशोधकांना असं आढळून आलं की दोनदा सनस्क्रीन लावल्यामुळे पहिल्यांदा सनस्क्रीन लावल्यावर त्वचेचा जो भाग तसाच राहून गेला गेला होता त्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजेच जास्तीत जास्त त्वचेवर सनस्क्रीन लावलं जातं.
 
घाम आल्यानंतर सनस्क्रीन पुन्हा लावण्याचा सल्ला वैज्ञानिक देतात. कारण पाण्यामुळे किंवा कापडाने किंवा धुळीमुळे आपल्या त्वचेवरील सनस्क्रीन पुसले गेलेले असते.
 
त्याचबरोबर मॉइश्चरायझरसारख्या त्वचेच्या इतर उत्पादनांबरोबर सनस्क्रीनचा समावेश न करणं महत्त्वाचं ठरतं, असं रिचर्ड ब्लॅकबर्न म्हणतात. ते लीड्स विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिझाइनमध्ये पर्यावरणपूरक वस्तूंचे प्राध्यापक आहेत.
 
त्यांनी असं सांगण्यामागचं कारण म्हणजे सनस्क्रीनमध्ये झिंक ऑक्साईडसारखे काही सूक्ष्म धातू कण असतात ज्यांचा सनस्क्रीनमधील इतर घटकांबरोबर प्रक्रिया झाल्यानंतर प्रभाव कमी होतो.
 
"मात्र याचा अर्थ असा नाही की आपण सनस्क्रीनचा वापर करू नये. यातील सर्वांत महत्त्वाचा संदेश म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान दररोज सनस्क्रीन लावा," असं ब्लॅकबर्न म्हणतात.
 
युकेमध्ये उपलब्ध असणारे बहुतांश सनस्क्रीनचा वापर जसाच्या तसा केला जाऊ शकतो. मात्र वेगवेगळ्या ब्रँड्सचा सनस्क्रीनचा एकत्रित वापर करणं किंवा त्वचेच्या इतर उत्पादनांबरोबर सनस्क्रीनचा वापर करणं टाळण्याचा सल्ला ब्लॅकबर्न देतात. कारण दोन वेगवेगळ्या ब्रँड्सच्या सनस्क्रीनमधील घटक किंवा सनस्क्रीन आणि त्वचेच्या इतर उत्पादनांमधील घटक एकमेकांना अनुकूल नसू शकतात.
 
अमेरिकेतील सनस्क्रीन युकेमधील सनस्क्रीनपेक्षा वेगळं असतं का?
अमेरिका आणि युकेमध्ये विकल्या जाणाऱ्या सनस्क्रीनमध्ये काही फरक असतो. यातील एक भाग म्हणजे दोन्ही देशात सनस्क्रीन वेगवेगळ्या श्रेणीमध्ये मोडतात.
 
अमेरिकेत सनस्क्रीनना डॉक्टरद्वारे सुचवलं न गेलेलं औषध किंवा उत्पादन मानलं जातं. म्हणजेच सनस्क्रीसाठी डॉक्टरच्या प्रीस्क्रिप्शनची आवश्यकता नसते. त्यामुळेच सनस्क्रीन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रदीर्घ नियामक प्रक्रियेतून जावं लागतं.
 
याचाच अर्थ नवीन सनस्क्रीनना नियामक संस्थांची मंजूरी मिळण्यास प्रदीर्घ काळ लागू शकतो. त्याउलट युरोपियन युनियनमध्ये सनस्क्रीन कॉस्मेटिक्स म्हणजे सौंदर्य प्रसाधनांच्या श्रेणीत मोडतात.
 
नवीन आणि अतिनील किरणांबाबत अधिक प्रभावी असणाऱ्या सनस्क्रीनना मंजुरी मिळण्यासाठी लागणाऱ्या संभाव्य प्रदीर्घ प्रक्रियेमुळे अमेरिकेतील काही सनस्क्रीन्स युरोपियन युनियनच्या अतिनील किरणांपासून संरक्षण मिळण्याच्या उच्च निकषांना पात्र ठरत नसल्याचे संशोधकांना आढळून आलं आहे.
 
काचेमुळे त्वचेला संरक्षण मिळतं का?
गॅलो म्हणतात, काचेमुळे बहुतांश घातक अतिनील किरणांपासून संरक्षण मिळतं, मात्र तरीदेखील काचेतूनसुद्धा थोडी अतिनील किरणं आत येतात आणि त्यामुळे कमी प्रमाणात त्वचेचं नुकसान होतं.
 
सूर्यप्रकाशात वारंवार गेल्यास मग ते काचेच्या खिडकीच्या माध्यमातून का असेना, त्यामुळेच त्वचेचं नुकसान होतं. अतिनील किरणं काचेमधून देखील पुढे जाऊ शकतात. आपलं वय वाढतं तसं आपल्या त्वचेवर दिसणाऱ्या 90 टक्के बदलांसाठी हीच अतिनील किरणं कारणीभूत असतात.
 
सनस्क्रीनला एक्सपायरी असते का?
तज्ज्ञ सांगतात, जसजसे दिवस वाढतात तसतसा सनस्क्रीनचा प्रभाव कमी होत जातो. सर्वसाधारणपणे ज्या दिवशी तुम्ही ती विकत घेतली त्या दिवसापासून तीन वर्षांपर्यत सनस्क्रीन उपयुक्त ठरायला हवं.
 
युकेमधील सनस्क्रीनच्या बहुतांश बाटल्यांवर जार (jar)चं चिन्ह असतं. त्यावरून एकदा का ती बाटली उघडली की ते उत्पादन किती दिवस टिकेल हे कळतं.
 
अमेरिकेच्या अन्न आणि औषधी प्रशासन (Food and Drug Administration - FDA) च्या नियमांनुसार, जर त्याच्यावर एक्सपायरी डेट असेल आणि त्या सनस्क्रीनची साठवणूक जर थेट सूर्यप्रकाशात किंवा उष्ण वातावरणात करण्याची आवश्यकता नसेल तर सर्व सनस्क्रीन उत्पादनांची शेल्फ लाईफ खरेदीनंतर किमान तीन वर्षांची असली पाहिजे.
 
म्हणजे खरेदी केल्यापासून किमान तीन वर्षे ते सनस्क्रीन टिकले पाहिजे.
 
तुम्हाला खात्री नसल्यास परिणामांमधील सुसंगतता आणि रंगातील कोणताही स्पष्ट बदल आढळल्यास तुम्ही सनस्क्रीन तपासण्याचा सल्लादेखील दिता जातो.
 
सनस्क्रीनची बाटली थेट सूर्यप्रकाशात किंवा कार सारख्या उष्ण ठिकाणी न ठेवल्यामुळे त्यातील घटकांचा ऱ्हास होण्याचा वेग कमी होतो.
 
सनस्क्रीनमुळे व्हिटॅमिन डी च्या निर्मितीमध्ये अडथळा येतो का?
कॅल्शियम शरीरात शोषले जाण्यामध्ये व्हिटॅमिन डी ची महत्त्वाची भूमिका असते. कॅल्शियममुळेच हाडं मजबूत राहतात आणि आपली रोगप्रतिकारक्षमता देखील कायम राहते.
 
सनस्क्रीन लावल्यामुळे व्हिटॅमिन डी शरीरात शोषले जात नाही याबद्दल काही चिंता आहेत. मात्र अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की आपल्या शरीरात किती व्हिटॅमिन डी शोषलं जातं यासंदर्भात सनस्क्रीनचा धोका खूपच कमी आहे.
 
सनस्क्रीनमध्ये विषारी घटक असतात का?
सनस्क्रीनमध्ये असे घटक असतात का जे आपल्या शरीरात जमा होतात आणि ते आपल्याला हानीकारक ठरू शकतात, याबद्दल काही चिंता किंवा प्रश्न आहेत.
 
पुराव्यांतून असं आढळलं आहे की युके, युरोपियन युनियन किंवा अमेरिकेत मंजूरी मिळालेल्या सनस्क्रीनमधील घटक सुरक्षित आणि योग्य परिणामकारक असतात. अतिनील किरणोत्सर्गापासून लोकांचं संरक्षण करण्याच्या फायद्यांच्या तुलनेत त्यांच्यापासून होणारी कोणतीही संभाव्य हानी कमी असते.
 
सनस्क्रीनबद्दलची सर्वात मोठी चिंता म्हणजे सनस्क्रीनमधील एखाद्या विशिष्ट घटकाची तुम्हाला अ‍ॅलर्जी होण्याचा किंवा काही अपाय होण्याचा मुद्दा. यामुळे त्वचेवर पुरळ देखील येऊ शकतात, असं गॅलो म्हणतात.
 
"सनस्क्रीनमध्ये विषारी घटक असण्याचं मिथक ही खूपच खळबळजनक अतिशयोक्ती आहे आणि सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या परिणामांशी त्याची तुलनाच होऊ शकत नाही. उत्पादन वापरण्याच्या सूचनांप्रमाणे सनस्क्रीन वापरल्यास ते सुरक्षित असतात आणि त्वचेच्या कॅन्सर होण्यापेक्षा चांगलेच असतात," असं गॅलो म्हणतात.
 
वयस्कांनी किती सनस्क्रीन लावावं?
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासना (FDA) चाचणीसाठी त्वचेवर 2 मिलीग्रॅम / चौ. सेमी (0.16 चौ. इंच) सनस्क्रीन लावण्याचा सल्ला देतं.
 
याचाच अर्थ आपण जर यापेक्षा कमी सनस्क्रीन लावलं तर बाटलीच्या लेबलवर देण्यात आलेल्या संरक्षणाइतकं संरक्षण आपल्या त्वचेला मिळणार नाही.
 
इतकं प्रमाण म्हणजे सरासरी आकाराच्या वयस्क व्यक्तीनं ढोबळमानानं चहाचे सहा चमचे इतके सनस्क्रीन चेहरा आणि शरारीला लावलं पाहिजे. मात्र अभ्यासातून असं दिसून आलं आहे की सर्वसाधारणपणे जितकी आवश्यकता असते त्यापेक्षा लोक कमी प्रमाणात सनस्क्रीन लावतात आणि त्यामुळेच त्यांना वाटतं तितकं संरक्षण त्यांच्या त्वचेला मिळत नाही.
 
लहान मुलं किंवा मोठ्या मुलांनी किती प्रमाणात सनस्क्रीन लावलं पाहिजे?
मुलांची त्वचांची त्वचा अती नील किरणोत्सर्गाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असते. त्यामुळे उन्हापासून त्याचं संरक्षण होणं महत्वाचं ठरतं.
 
सहा महिन्यांपेक्षा लहान बालकांना सनस्क्रीन लावता कामा नये. त्यांना थेट उन्हात नेऊ नये आणि सैल कपडे वापरून आणि सावलीत ठेवून त्यांचं संरक्षण केलं पाहिजे.
 
तुम्ही दोन टी-स्पुनएवढं सनस्क्रीन दोन वर्षांचा बाळाला लावण्याचा सल्ला दिला जातो. तीन चमचे सनस्क्रीन पाच वर्षांच्या मुलांना, चार चमचे नऊ वर्षांच्या मुलांना आणि पाच चमचे सनस्क्रीन तेरा वर्षांच्या मुलांना लावलं पाहिजे.
 
यापेक्षा मोठ्या मुलांना दर दोन तासांनी सनस्क्रीन लावण्याची शिफारस वैज्ञानिक करतात.
 
कोणत्या प्रकारचं सनस्क्रीन आपण वापरलं पाहिजे?
जास्त एसपीएफ (SPF)असलेलं सनस्क्रीन वापरणं महत्त्वाचं आहे. ज्यामध्ये लेबलवर ब्रॉड स्पेक्ट्रम लिहिलेलं असतं असं सनस्क्रीन. याचा अर्थ ते सनस्क्रीन अतिनील ए आणि अतिनील बी अशा दोन्ही अतिनील किरणांपासून संरक्षण करतात. अतिनील किरणांचे दोन प्रकार असतात अतिनील ए आणि अतिनील बी.
 
अतिनील ए किरणोत्सर्गांपासून संरक्षणासंदर्भात सनस्क्रीनची पातळी दर्शविण्याचे दोन मुख्य मार्ग असतात. त्यातील कोणता वापरायचा हे तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून असतं.
 
यातील एक प्रकार म्हणजे प्रोटेक्शन ग्रेड (PA)व्यवस्था, काही वेळा सनस्क्रीनच्या लेबलवर यूव्हीए-पीएफ (UVA-PF)किंवा पीपीडी (PPD)असं लिहिलेलं असतं. कोणत्या पद्धतीद्वारे त्यांचा दर्जा तपासण्यात आला आहे यावर ते अवलंबून असतं. या व्यवस्थेमध्ये पीए**** (PA****)ही संरक्षणाची सर्वोच्च पातळी आहे.
 
याचा अर्थ तुम्ही सनस्क्रीन लावलेलं नसताना जितकं तुमच्या त्वचेचं संरक्षण होतं त्यापेक्षा सहापट संरक्षण तुम्हाला या श्रेणीचं सनस्क्रीन लावल्यावर मिळतं.
 
स्टार जितके कमी तितकं मिळणारं संरक्षणदेखील कमी. या पद्धतीची मानांकन पद्धत अमेरिका आणि जपानमध्ये विकल्या जाणाऱ्या सनस्क्रीनवर अनेकदा दिसते.
 
आणखी एक सामाईक पद्धत म्हणजे यूव्हीए (UVA)पासून मिळणाऱ्या संरक्षणाची पातळी सनस्क्रीनवर यूव्हीए स्टार रेटिंग ( UVA star rating) देऊन दिली जाते. एका वर्तुळाकर चिन्हात यूव्हीए (UVA)हा शब्द आणि त्यापुढे पाच स्टारपर्यत दाखवून हे दर्शविलं जातं.
 
पाच स्टारमध्ये सर्वोच्च संरक्षण. यूव्हीए स्टार रेटिंगद्वारे अतिनील ए किरणोत्सर्गासंदर्भात मिळणारी संरक्षणाची पातळी दर्शविली जाते.
 
याचाच अर्थ SPF50 बरोबर पाच UVA रेटिंग असलेल्या सनस्क्रीनद्वारे SPF30 बरोबर पाच UVA रेटिंग असलेल्या सनस्क्रीनपेक्षा अधिक संरक्षण मिळतं. युके आणि युरोपमध्ये हीच पद्धत प्रचलित आहे.
 
ब्लॅकबर्न शिफारस करतात की ज्या सनस्क्रीनमध्ये पाच स्टार रेटिंग आणि किमान 30 SPF असेल त्याचा वापर करावा आणि त्याचबरोबर त्वचा कपड्यानं झाकलेली असावी.
 
त्वचा कॅन्सरसंदर्भात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थादेखील घराबाहेर जाताना वर्षभर दररोज उन पडणाऱ्या त्वचेच्या उघड्या भागावर सनस्क्रीन लावण्याची शिफारस करतात. त्याचबरोबर सनस्क्रीन लावल्यानंतर देखील उन्हात मर्यादित वेळ राहण्याचं महत्त्वदेखील सांगितलं जातं.
 
सनस्क्रीन आणि सनब्लॉक मध्ये काय फरक आहे?
सनस्क्रीन हे एकप्रकारे तुमची त्वचा आणि सूर्य यामधील एक रासायनिक अडथळा म्हणून काम करतं. सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणांना रोखण्याऐवजी सनस्क्रीन ते शोषून घेतं.
 
तर दुसऱ्या बाजूला सनब्लॉक तुमची त्वचा आणि सूर्याची अतिनील किरण यामध्ये एक भौतिक अडथळा निर्माण करतं, जेणेकरून अतिनील त्यातून पुढे जाऊ शकत नाहीत.
 
(डिस्क्लेमर: या लेखात देण्यात आलेली सर्व माहिती ही सर्वसामान्य महिती म्हणून देण्यात आलेली आहे. या माहितीचा वापर तुमच्या डॉक्टरच्या किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाच्या वैद्यकीय सल्ल्याला पर्याय म्हणून करू नये. या वेबसाईटवरील माहितीच्या आधारे वाचकानं जर एखादं निदान केलं तर त्याला बीबीसी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही. इथे दिसत असलेल्या बाहेरील वेबसाईटवरील माहितीसाठी बीबीसी जबाबदार असणार नाही. त्याचबरोबर इतर वेबसाईटवर दिसत असलेल्या व्यापारी उत्पादनं किंवा सेवा किंवा मार्गदर्शनाला बीबीसी समर्थन देत नाही. तुमच्या आरोग्यासंदर्भात काहीही अडचण असल्यास नेहमीच तुमच्या डॉक्टरचं मार्गदर्शन घ्या.)