marathi blog | नेत्रसुखद पक्षीजीवन
|
या ब्लॉगचा लेखक आहे 'पम्या'. रहाणार शहर पुणे. आवड पक्षीनिरिक्षण आणि त्या पाठोपाठ येणार्या भटकंतीची. त्यामुळे हा ब्लॉग माहितीपूर्ण तर आहेच. पण तितकाच नेत्रसुखदही. पम्यातला पक्षीनिरिक्षक, भटक्या आणि उत्तम छायाचित्रकारही या ब्लॉगमधून दिसून येतो. २००६ मध्ये त्याने हा ब्लॉग सुरू केला. ब्लॉगवरच्या नोंदी विरळ असल्या तरी त्यात काही एक नियमितता आहे. मुख्य म्हणजे माहिती आहे.
सामान्यपणे आपल्याला पक्ष्यांविषयी फारशी माहिती नसते. असलीच तर ती आजूबाजूच्या रोजच्या वावरण्यातल्या पक्ष्यांचीच. त्यापलिकडे आपल्या माहितीचं आकाश विस्तारत नाही. पम्या मुळातच पक्षीनिरिक्षक असल्याने वेगळे पक्षी त्याच्या ब्लॉगमधून भेटायला येतात. पक्ष्यांची छायाचित्रे दाखवून पम्या थांबत नाही, तर त्यांची माहिती, वैशिष्ट्ये आणि त्याला आनुषांगिक अशी इतर माहितीही तो देतो.
|
तू शाहीन है, परवाझ है काम तेरा, काम तेरा
तेरे सामने आसमां और भी है, और भी है
तू शाहीन है, बसेरा कर, पहडों की चट्टानों पर
तू शाहीन है! तू शाहीन है! तू शाहीन है!
|
|
''काळे कुळकुळीत पोट, चॉकलेटी पाय, चिलखत घातल्याप्रमाणे दिसणारे ब्रॉंझ रंगाचे पंख, जिरेटोपाची आठवण करुन देणारा तुरा, त्याचे ते छाती फ़ुगवून बसणे, डोळ्यातली ती चमक आणि एकूणच वागणे, सगळे एखाद्या "बिगडेदिल शहजाद्या" सारखे. हे वर्णन झाले नराचे.''
|
सासवड भागात पम्या आणि त्याच्या टीमने रातवा या पक्ष्याला शोधून काढून त्याचे फोटो घेतले आहेत. त्याची माहितीही दिली आहे. हे सगळेच वाचायला मजा येते. यानिमित्ताने देणारी इतर माहितीही वाचकाच्या ज्ञानात भर घालणारी असते. उदा. आपण नेहमी बेचका या शब्दाचा वापर करतो. बेचक्यात अडकला वगैरे. पण बेचका म्हणजे काय तर झाडाच्या दोन फांद्या जिथून फुटतात, तो बेचका. पण त्याही पुढे जाऊन तीन फांद्या फुटतात त्याला 'तिचका' म्हणतात ही नवी माहितीही या ब्लॉगमध्ये वाचायला मिळते.
पक्षीजीवनाविषयी जाणून घेण्यासाठी आणि नितांतसुंदर, देखण्या आणि खिळवून ठेवणार्या छायाचित्रांसाठी या ब्लॉगला चुकवून चालणारच नाही.
ब्लॉगचे नाव- भटक्या विमुक्त उनाड- पम्या
ब्लॉगर- पम्या
ब्लॉगचा पत्ता- http://bhatavimuktaunad-pamya.blogspot.com
पुढील लेख
