एका राजाची जशी राजकन्या, तशी भूमिकन्या”! नवी कोरी गोष्ट
सोनी मराठीवरील 'भूमिकन्या' चर्चेत एका राजाची जशी राजकन्या, तशी भूमिकन्या”! नवी कोरी गोष्ट –
भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा, १० जून पासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता सोनी मराठीवर
आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा सक्रिय सहभाग आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामगिरीने दखल घ्यायला लावणाऱ्या अनेक कन्या आज आपल्या अभिमानाचा विषय ठरत असताना सोनी मराठी वाहिनीवरील भूमिकन्या ही सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. मनोरंजनातून प्रबोधन करत सध्या अनेक सामाजिक व अवतीभवती घडणारे विषय मालिकांमध्ये प्रभावीपणे मांडले जाऊ लागले आहेत. असाच वेगळा विषय असलेली भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर येत्या १० जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता पाहता येईल. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेमार्फत या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.
पीक पाण्यावर जगणारा शेतकरी अवघ्या जगाचा अन्नदाता आहे. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. मात्र, आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला, कितीही प्रगत शेती केली, तरीही त्याला असंख्य गोष्टींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका लढाऊवृत्तीच्या कन्येची कथा भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा मालिकेतून पाहायला मिळणार आहे.
साद म्हणजे साथ होय. जगभरातील सर्वांकरिता झटणारा, मुख्य अन्नदाता म्हणून ज्याची ओळख आपल्याला आहे तो म्हणजे बळीराजा होय. 'भूमिकन्या' ही मालिका अशाच एका शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे. बळीराम असे या शेतकऱ्याचे नाव असून तो आपल्या गावात शेती करणारा एक सामान्य शेतकरी आहे. आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. काही संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं जगणं जिद्दीने सकारात्मक घडवतात. अशाच एका संघर्षमय जिद्दीची कथा आपल्यासमोर या मालिकेतून उलगडणार आहे. मालिकेची नायिका लक्ष्मी ही कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधत कणखर भूमिकन्या म्हणून आपल्या वडिलांच्या पाठीशी कशी उभी ठाकते? याची रंजक कथा भूमिकन्या – साद घालते निसर्गराजाया मालिकेत पाहता येणार आहे.
भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे व अभिनेता आनंद अलकुंटे, गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेचं दिग्दर्शन अवधूत पुरोहित यांचे आहे. जमीन कसून तिचा मान राखणारी… एका राजाची जशी राजकन्या, तशी माझी भूमिकन्या! असं म्हणत, आपल्या मातीतली नवी कोरी गोष्ट १० जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.