1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 19 डिसेंबर 2020 (08:27 IST)

अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण, फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करुन दिली माहिती

Actor Prashant Damle
प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. मला डॉक्टरांनी सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मी नाटकाचे दोन प्रयोग रद्द केले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.  पिंपरीचा प्रयोग करुन आल्यानंतर मला 
कणकण जाणवली. त्यामुळे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे रिओपनिंगचे प्रयोग रद्द केले, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
'मागच्या रविवारी चिंचवडचा प्रयोग झाला होता. तेव्हा मला थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे मी बुधवारी कोरोना चाचणी करुन घेतली. त्यातही मी काठावर पास झालो. 
 
तसा काठावर पास मी शाळेपासूनच आहे. पण हा काठ जरा डेंजर आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की, काठावर जरी असलात तरीही सात दिवसांच्या आयसोलेशनमध्ये तुम्हाला जावं लागेल. म्हणून मी बुधवारपासून सात दिवसांच्या आयसोलेशनमध्ये आहे. पण, उद्या दुपारचा बोरीवलीत प्रयोग आणि परवा दुपारी गडकरी रंगायतनचा प्रयोग आहे. हे प्रयोग आता रद्द करावे लागले आहेत. सध्या मी ठणठणीत आहे. पण डॉक्टर म्हणत आहेत की तुला सात दिवस विश्रांती घ्यावीच लागेल. सगळ्यात महत्त्वाची आणि दिलासा देणारी बाब म्हणजे माझे सगळे सहकलाकार, बॅक स्टेजचे आर्टिस्ट ठणठणीत आहेत. मीच थोडासा काठावर आहे. काठावरचा मी थोडासा मागे येतो आणि परत काम सुरु करतो. मी काळजी घेतो तुम्हीही काळजी घ्या.' 
 
१२ डिसेंबरला पुण्यात एका लग्नाची पुढची गोष्ट नंतर चिंचवाडलाही नाटकाचा प्रयोग झाला होता. परंतु, प्रशांत दामले जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांना कणकण जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी बुधवारी कोरोना चाचणी केली, ती  पॉझिटिव्ह आली, अशी प्रशांत दामले यांनी माहिती दिली आहे.