1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified गुरूवार, 6 मे 2021 (07:59 IST)

अभिनेत्री अभिलाषा पाटीलचे कोरोनामुळे निधन

अनेक हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केलेली अभिनेत्री अभिलाषा पाटील (४७) हिचे कोरोनामुळे मुंबईत निधन झाले. प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अभिलाषा पाटीलने ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘छिछोरे’, ‘गुड न्यूज’, ‘मलाल’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या होत्या.
 
उत्तर प्रदेशमधील बनारस शहरात गेल्या काही दिवसांपासून अभिलाषा पाटील वेब शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. मात्र तिथे शूटिंगदरम्यान तब्येत अचानक बिघडली होती. तब्येत बिघडल्यामुळे ती मुंबईला निघून आली. मुंबईत आल्यानंतर तिने कोरोनाची टेस्ट केली होती, जी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर अभिलाषावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. तब्येत खालावल्यामुळे तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, मात्र दिवसेंदिवस तब्येत आणखी बिघडली आणि अखेर अभिलाषाचे निधन झाले.
 
अभिलाषाने ‘बायको देता का बायको’, ‘ते आठ दिवस’, ‘प्रवास’, ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’, ‘पिप्सी’ अशा अनेक मराठी चित्रपटांत तिने काम केलं होतं. ‘बापमाणूस’ ही त्यांच्या लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त अभिलाषाने डिज्नी हॉटस्टारच्या वेब शो ‘क्रिमिनल जस्टिस’ च्या दुसर्‍या सीजनमध्येही काम केलं होतं.