प्लॅनेट मराठीवर १४ एप्रिलपासून चिकटगुंडे २
भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच 'भाडिपा' प्रस्तुत 'चिकटगुंडे' ही लॉकडाऊनवर आधारित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ८ विविध पात्रे, ४ वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या कथा आणि प्रेमभावना असा विषय असलेल्या या वेबसीरिजचा पहिला सीझन प्रचंड गाजला. प्रेक्षकांना या वेबसीरिजचा दुसरा सीझन कधी येईल, याची उत्सुकता लागली होती. प्रेक्षकांचे पहिल्या सीझनवरचे प्रचंड प्रेम पाहून फार काळ उत्कंठा ताणू न देता 'प्लॅनेट मराठी आणि भाडिपा प्रस्तुत चिकटगुंडे २'चा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून येत्या १४ एप्रिल रोजी पहिला एपिसोड प्लॅनेट मराठी ॲपवर प्रदर्शित होणार आहे.
गौरव पत्की दिग्दर्शित चिकटगुंडे २मध्येही सारंग साठे, श्रुती मराठे, सुहास शिरसाट, स्नेहा माझगांवकर, सुशांत घाडगे, चैतन्य शर्मा आणि पुष्कराज चिरपुटकर, श्रुती मराठे हेच कलाकार असून लॅाकडाऊनचे नियम थोडे शिथिल झाल्यानंतरचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये धमाल, गोंधळ, गंभीर असे सगळेच सीन दिसत आहेत. त्यामुळे आता पहिल्या एपिसोडमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय विलास बर्दापूरकर म्हणतात, "पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सिझन २ प्लॅनेट मराठीवर झळकणार आहे. भाडिपासोबत काम करताना आनंद होतोय. त्यांचा कंन्टेट हा नेहमीच उत्कृष्ट असतो आणि एक सामाजिक, महामारी सारखा विषय ज्याचे गांभीर्य जाऊ न देता घराघरांत घडणारी कथा अतिशय हलक्याफुलक्या, विनोदी पद्धतीने चिकटगुंडेमध्ये मांडण्यात आली आहे. सिझन २ चा नवीन एपिसोड दर शुक्रवारी मोबाईल, टिव्ही, कॅाम्प्युटरवर प्लॅनेट मराठीच्या ॲपच्या माध्यमातून पाहता येईल.