शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 मे 2023 (15:00 IST)

गौरव मोरे : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये एन्ट्री ते ‘फिल्टरपाड्याच्या बच्चन'पर्यंतचा प्रवास

Gaurav more/Instagram
“एकदा माझा मित्र मला आयएनटी एकांकिका स्पर्धा पहायला घेऊन गेला. ती पाहिली तेव्हा वाटलं की, या मुलांकरता ही सगळी मंडळी टाळ्या वाजवत आहेत. म्हणजे ही काहीतरी वेगळी आहेत. तेव्हा वाटलं की, या मुलांसाठी कोणीतरी टाळ्या वाजवतंय तर आपल्यासाठीही कोणीतरी टाळ्या वाजवायला हव्यात,” अभिनेता गौरव मोरे सांगत होता.
 
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे गौरव मोरे. फिल्टरपाड्यामध्ये लहानाचा मोठा झालेला, सर्वसामान्य परिस्थिती वाढलेल्या गौरवच्या मनात शिक्षण, नोकरी असाच प्लॅन होता. पण ही चौकट त्याच्यासाठी नव्हती.
 
त्याला अभिनयाची गोडी लागली. आपल्या हटके विनोदी शैलीमुळे फिल्टरपाड्याचा गौरव मोरे आज हास्यजत्रेच्या मंचावरचा ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ बनला आहे.
 
त्याचा हा प्रवास कसा होता? गौरव मोरेला हास्यजत्रेच्या मंचावर एन्ट्री कशी मिळाली? हास्यजत्रेमधे गौरवचा सतत अपमान का होतो? कोणासोबत गौरवची केमिस्ट्री भन्नाट आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया गौरव मोरेकडून.
 
गौरव मोरे कसा बनला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’
 
गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडाला हास्यजत्रेच्या मंचावरचा ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ ही ओळख कशी मिळाली याचं फिल्मी कनेक्शन गौरवने सांगितलं.
 
“ आम्ही 90’s मधली मुलं आहोत. सिनेमाचं आम्हाला प्रचंड वेड होतं. मी शाळेत होतो, तेव्हा 'हम' हा सिनेमा खूप सुपरहिट झाला होता आणि प्रत्येकाला वाटत होतं की, आपण बच्चन सर आहोत. तेव्हा सिनेमात मागे एक म्युझिक वाजायचं ना...टणाणाणाणा. आम्ही खेळताना वगैरे काहीही बोललो की पुढे तेच म्हणायचो.”
 
गौरव पुढे सांगतो, “एकदा प्रसाद खांडेकर सचिन गोस्वामींना म्हणाले की, हा खूप फिल्मी आहे. त्याला आपण एखादं फिल्मी स्किट करायला देऊ. आम्ही तेव्हा एक कॉमेडी शो करत होतो. तेव्हा सरांनी पाहिलं आणि मला सांगितलं की, इंट्रोडक्शन देतानाच तसं दे... ‘आय अम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा आणि पुढे टणाणाणाणा.”
 
या एका ओळीमुळे गौरवची स्वतःची स्टाईल डेव्हलप झाली, मंचावरचा तो ‘बच्चन’ बनला.
 
‘आता माझ्या शाळेतली छोटी मुलं म्हणतात...’
फिल्टरपाड्यामध्ये वाढलेला गौरव जेव्हा टीव्हीच्या स्क्रीनवर दिसला, त्याचं नाव होऊ लागलं तेव्हा तिथल्या त्याच्या मित्रांची, आजूबाजूच्या लोकांची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी त्याचं यश कसं सेलिब्रेट केलं?
 
या प्रश्नाचं उत्तर देताना गौरवने म्हटलं की, जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा स्क्रिनवर पाहिलं, तेव्हा त्यांना धक्काच बसला. हा कालपर्यंत तर आपल्यासोबत होता. याला सिनेमाची आवड आहे, तो नकला करतो हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे हा कधीतरी टीव्हीवर दिसेल असं त्यांना वाटलं नव्हतं.
 
पण आता ते सगळे खूश आहेत. आमच्या शाळेतली लहान मुलं सांगतात की, आम्हाला मोठं होऊन गौरव दादासारखं व्हायचंय.
गौरवच्या डोक्यात आपल्याला अभिनय करायचाय हे नेमकं कधी आणि केव्हा आलं?
 
“खरंतर माझ्याही डोक्यात ते नव्हतं. फिल्टरपाड्यासारख्या झोपडपट्टीत आपण वाढतोय, आपल्या डोक्यात होतं की शिक्षण कम्पलिट, काम एवढंच. त्याच्या पलिकडे काही नव्हतं,” गौरव सांगत होता.
 
याच चाकोरीतून त्याचं आयुष्य गेलं असतं, पण त्याच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला.
 
“एकदा माझा मित्र मला आयएनटी एकांकिका स्पर्धा पहायला घेऊन गेला. ती पाहिली तेव्हा वाटलं की, या मुलांकरता ही सगळी मंडळी टाळ्या वाजवत आहेत. म्हणजे ही काहीतरी वेगळी आहेत. त्यावेळी मी मित्राला म्हटलं की, मलाही हे करायचं आहे.
 
हे एवढं सोपं नाहीये, असं त्यानं सांगितलं. पण मी म्हटलं की, हे मला जमेल असं वाटतंय. त्याची सुरूवात तिथून झाली, की या मुलांसाठी कोणीतरी टाळ्या वाजवतंय तर आपल्यासाठीही कोणीतरी टाळ्या वाजवायला हव्यात.”
 
हास्यजत्रेत कोणामुळे झाली एन्ट्री?
 
अभिनयात येण्याचा निर्णय कसा घेतला हे कळलं, पण गौरवची हास्यजत्रेच्या मंचावर एन्ट्री नेमकी कशी झाली?
 
प्रसाद खांडेकर... दोनच शब्दांत गौरवनं उत्तर दिलं.
 
त्यानं सांगितलं, “जेव्हा शो लाइन अप झाला, तेव्हा प्रसादने माझं नाव रेकमेंड केलं होतं. प्रसादने म्हटलेलं की, सर, गौरवला आपण एकदा ट्राय करून पाहूया. मग त्यानं मला सांगितलं की, बघ भाई, मी तुझं नाव रेकमेंड केलंय. माझं काम तुला तिथपर्यंत नेण्याचं होतं. पुढचं तू पाहून घे. मी त्याला म्हटलं की, तू एवढं केलंस ना माझ्यासाठी, आता पुढचं मी पाहून घेईन.”
 
तिथून पुढे मग माझा हास्यजत्रेतला प्रवास सुरू आहे.
 
‘...म्हणून माझा सतत अपमान होतो’
हास्यजत्रेच्या अनेक स्किट्समध्ये गौरवला मार खावा लागतो, त्याची गर्लफ्रेंड कोणीतरी दुसरंच घेऊन जातं, लग्न मोडतं...या गोष्टी प्रेक्षक खूप एन्जॉय करतात. खळखळून हसतो. पण गौरवला कधी एखाद्या तरी स्किटमध्ये आपलं सगळं चांगलं व्हावं, मार बसू नये असं वाटतं का?
 
त्याबद्दल विचारल्यावर गौरवने हसत हसत सांगितलं की, तो स्वतःही स्किटमधल्या या गोष्टी एन्जॉय करतो.
 
“मी सांगतो की, आता असंच बोल किंवा असंच मार.”
 
त्याबद्दलचा एक किस्साही त्यानं सांगितला.
 
“ वनिता आणि मी दोघे बऱ्याचदा एकत्र काम करतो. आमचं एक स्किट आहे खरात काकूंचं. त्यात मी तिला सांगितलं की, मी येऊन तुझ्या जवळ बसेन, तू मला जोरात मारायची आणि मी उडून पडणार. तसं मी गेलो आणि ‘काय आहे ना खरात काकू’ असं म्हणत वनिताच्या पायाशी बसलो, तर तिने मला पोटात बुक्की मारली. मी उडून बाजूला पडलो. तिलाही कल्पना नव्हती की मी असा पडणार आहे.”
 
चौघुले काका हे स्किट करताना मी आणि समीर चौघुले मला कसं वेगवेगळ्या पद्धतीने मारता येईल याची चर्चा करतो, ते करून पाहतो, असंही गौरव मोरेनं सांगितलं.
 
एकूणच हास्यजत्रेमध्ये विनोदाचा तोल सांभाळताना काय काळजी घेतली जाते? तो विनोद सवंग, कोणाला दुखावणारा नसेल यादृष्टिने त्याचा तोल कसा सांभाळला जातो?
 
हा प्रश्न विचारल्यावर गौरवने त्याचं श्रेय टीमला आणि सचिन गोस्वामी-सचिन मोटे यांना दिलं.
 
त्यानं म्हटलं, की “ज्यादिवशी आमचा रिहर्सल डे असतो, तेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टी डिस्कस करतो. स्क्रिप्टमध्ये कोणाच्या भावना दुखावणारं काही आहे का किंवा प्रेक्षकांना काही न रुचणारं आहे का हे पाहतो. प्रत्येक टीमच्या गोस्वामी आणि मोटे सर स्वतः रिहर्सल घेतात. ते दोघं तसंच चॅनेल विनोदाच्या दर्जाची खबरदारी घेते. हे नको, ते हवं अशी चर्चा होते आणि मग त्यातून सगळी गंमत तयार होते, जी तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळते.”
 
एखादा पंच पडतो तेव्हा...
 
हास्यजत्रेच्या मंचावर कलाकार एकमेकांना हसून-भरभरून दाद देतात. पण एखाद्यावेळेस तो विनोद तितका अपील झाला नाही, एखादा ‘पंच’ पडला तरीही सगळे हसतात का, असा प्रश्न बऱ्याच प्रेक्षकांना पडतो.
 
पडद्यामागे अशावेळी काय घडतं हे गौरवने सांगितलं.
 
“एखादा पंच पडला तर आर्टिस्ट आमच्याकडे पाहतच नाहीत. कारण मग आम्हीच तिकडून ओरडतो- ए, पडला रे पडला!”
 
आणि अशी वेळ स्वतःच्याच स्किटमध्ये आली तर?
 
“अशावेळी आम्ही लक्ष देत नाही. मग मोठ्याने बोलायचं, लगेचच पुढचं बोलून सावरून घ्यायचं.”
 
ऑनस्क्रीन केमिस्ट्री कोणासोबत जास्त?
हास्यजत्रेत वेगवेगळ्या जोड्या किंवा ग्रुप स्किट्स सादर करतात. प्रत्येकाची स्वतःची शैली आहे, विनोदाचा बाज आहे, पण गौरवला ऑन स्क्रीन कोणासोबत आपली केमिस्ट्री एकदम भन्नाट आहे असं वाटतं?
 
“मी आतापर्यंत सर्वांत जास्त स्किट्स वनितासोबतच केली आहेत. वनितामध्ये एक उपजतच सेन्स आहे. मी काय बोलणार आहे, कुठे अॅडिशन घेणार आहे, कुठे थांबायचं हे वनिताला बरोबर कळतं. मी आणि वनिता सोबत असतो तेव्हा खूप कमी वेळा रिहर्सल करतो. किती बोलायचं, केवढं बोलायचं हे ठरवून घेतो.
 
‘...तोपर्यंत प्रेक्षकांचं प्रेम आहेच’
अभिनेता म्हणून आपण एकाच साच्यात अडकतोय असं गौरवला वाटतं का, त्याला अजून काय नवीन भूमिका करून पाहायच्या आहेत?
 
गौरवने याबद्दल सांगितलं की, मला काहीतरी करायचं आहेच. दिग्दर्शक आणि लेखकांना माझ्यात एखादं कॅरेक्टर दिसलं तर ते मला विचारतील. मी ती ऑडिशन देईन. करायचं तर प्रत्येक कलाकाराला असतं. पण भूमिका कशी येतीये, स्क्रिप्ट कशी येतीये याची मी वाट पाहतोय. पाहू...तोपर्यंत ‘वेट अँड वॉच.’ अर्थात, प्रेक्षक आपल्यावर प्रेम करताहेत, लहान लहान मुलं प्रेम करतात. कुठे जात असताना बाजूने ‘ए गौऱ्या’ म्हणून हाक येते. हेच आपलं प्रेम आहे.
 




Published By- Priya Dixit