व्हाय शुल्ड बॉइज हॅव ऑल द फन? आता 'गर्ल्स'ही करणार धमाका!
'बॉइज' आणि 'बॉइज 2' या दोन्ही चित्रपटांच्या भरघोस यशानंतर विशाल सखाराम देवरुखकर आता घेऊन येत आहेत, मुलींच्या अजब आणि हटके विश्वाची धमाकेदार सफर 'गर्ल्स'च्या रूपात.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि कायरा कुमार क्रिएशनस प्रस्तुत 'गर्ल्स' हा चित्रपट तरुणींच्या एका अनोख्या जगाची सफर घडवणार आहे.
मराठी चित्रपटांमध्ये मुलांवर आधारित, त्यांच्या शाळा, कॉलेज जीवनावर आधारित अनेक सिनेमे येऊन गेले आहेत किंबहुना येतच असतात. मात्र, मुलींवर आधारित, त्यांच्या मजा मस्तीवर आधारित चित्रपट अजून आलेच नाहीत. हीच मजा, मस्ती पडद्यावर दाखवण्यासाठी दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर घेऊन येत आहेत एक धमाल मनोरंजक चित्रपट 'गर्ल्स'.
या चित्रपटाबद्दल सांगताना विशाल देवरुखकर म्हणतात, " असं म्हणतात मुलांसारख्या मुली कधीच एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रिणी असू शकत नाही. मात्र हे साफ चुकीचे आहे. मुलींसारखी मैत्री आणि त्या मैत्रीत होणारी धमाल ही कुठेच पाहायला मिळत नाही. ‘व्हाय शूड बॉइज हॅव ऑल द फन’ या वाक्याला मात देत, मुली सुद्धा मुलांएवढीच किंवा मुलांपेक्षा जास्त मजा करू शकतात. मुलींमध्ये होणारे संभाषण त्यांच्यात होणारे किस्से हे फक्त मुली स्वतः पुरताच ठेवतात. बऱ्याच लोकांना त्यांच्या या विश्वाबद्द्ल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. याच उत्सुकतेचे उत्तर 'गर्ल्स' या चित्रपटातून मिळणार आहे. 'गर्ल्स' हा चित्रपट तरुणींच्या अवतीभवती फिरणारा आणि त्यांचे भावविश्व उलगडणारा मराठीतील पहिला सिनेमा असणार आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही." तर या चित्रपटाचे निर्माते नरेन कुमार म्हणतात की, "बऱ्याच वर्षांत तरुणींवर आधारित सिनेमा आला नव्हता. 'गर्ल्स' या चित्रपटाचा विषय घेऊन जेव्हा विशाल देवरुखकर माझ्याकडे आले, तेव्हा मी लगेच त्यांना होकार दिला. कारण चित्रपटाचा विषय खूपच रंजक होता. मला आठवते वीस वर्षांपूर्वी मराठीमध्ये तरुणींवर आधारित 'बिनधास्त' हा ब्लॉकबस्टर सिनेमा आला होता. आता तब्बल वीस वर्षांनी तरुणींवर आधारित 'गर्ल्स' हा चित्रपट येत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल."
आता ह्या चित्रपटातून नक्की काय दाखवले जाणार आहे? या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार आहे? या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. एकविसाव्या शतकात चौकटीबाहेर जाऊन आयुष्य जगणाऱ्या आजच्या काळातील मुलींचे जग त्यांची मजामस्ती याचे चित्रण 'गर्ल्स' या चित्रपटातून दिसणार आहे.
अ कायरा कुमार क्रिएशन प्रॉडक्शनच्या अंतर्गत 'गर्ल्स' या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार, सुजाता एन. कुमार यांची असून, अमित भानुशाली यांनी असोसिएट प्रोड्युसर म्हणून काम पाहिले आहे.