गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (12:23 IST)

'दादा एक गुड न्यूज आहे' सोबत साजरे करा रक्षाबंधन

marathi natak
बहीण - भावाच्या सुंदर नात्याचे नाजूक बंध उलगडणाऱ्या सोनल प्रॉडक्शन निर्मित 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. अल्पावधीतच या नाटकाने प्रेक्षकांना आपलेसे केले. भावा-बहिणीचे नाते हे नेहमीच खास असते. या नात्यात कधी भांडणे असतात तर कधी थट्टामस्करी असते, कधी रुसवे, फुगवे असतात तर कधी अबोलाही असतो आणि या सगळ्यामागे असते ते फक्त निःस्वार्थी प्रेम. भावा-बहिणेचे हे अतूट नाते अधिक समृद्ध करण्यासाठी आणि  'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या शतकमहोत्सवी प्रयोगानिमित्ताने रक्षाबंधनच्या दिवशी एका अनोख्या सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रक्षाबंधनला म्हणजेच १५ ऑगस्टला ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे दुपारी ४. ३० वाजता 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक बघायला जाताना, आपला भावा-बहिणीसोबतचा एखादा सुंदर फोटो सोबत घेऊन जा, त्याच्यामागे तुमची एखादी एकमेकांसोबतची खास आठवण लिहा आणि प्रयोगाआधी तो ड्रॉपबॉक्समध्ये टाका. प्रयोगाच्या शेवटी ३ विजेत्या भाव-बहिणींना सोन्याची राखी भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे 'दादा एक गुड न्यूज आहे'च्या पुढाकाराने आयोजिलेल्या या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होऊन, यंदाचे तुमचे रक्षाबंधन अधिकच खास आणि अविस्मरणीय बनवा. 
 
प्रिया बापट प्रस्तुत, अद्वैत दादरकर दिग्दर्शित 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाने अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली, इतकेच नाही तर सिंगापूरवासियांनाही या नाटकाने आपलेसे केले. भावा-बहिणीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या नाटकाचे लेखन कल्याणी पाठारे यांनी केले असून उमेश कामत, हृता दुर्गुळे, आरती मोरे, ऋषी मनोहर यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत.