मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (20:46 IST)

गोदावरी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

godavari cinema
मुंबई – “नद्यांचे प्रदूषण कमी केले पाहिजे. त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असून गोदावरी या मराठी चित्रपटातून नदीसोबतच आपलं नातं पुनरूज्जीवित करता येईल”, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘गोदावरी’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिओ स्टुडिओचे कन्टेन्ट हेड निखिल साने, अभिनेता जितेंद्र जोशी, दिग्दर्शक निखिल महाजन, गायक राहुल देशपांडे यांच्यासह चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, संबंधित मान्यवर उपस्थित होते.
 
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, ‘गोदावरी ही आपल्या करिता जीवनदायिनी आहे. या नदीशी नातं सांगणारी गोष्ट गोदावरी चित्रपटात आहे. सभ्यता, संस्कृती यांच्यासोबत नदीचा थेट संबंध आहे. आपल्या वेदांमध्ये, संस्कृतीतही नद्यांचे महात्म्य सांगितलेले आहे. पण कालौघात औद्योगिक विकास प्रक्रियेत नद्यांची शुद्धता धोक्यात आली आहे. ती शुद्धता जपण्यासाठी नद्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नदी शुद्धीकरणासाठी अमृत योजना सुरू केली आहे. त्यामध्ये गोदावरी नदीचा समावेश असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले की, गोदावरीचे आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान असून या चित्रपटात गोदावरी या नदीभोवतीच्या एका व्यक्तीची कथा सादर केली आहे. मराठी चित्रपटांना आशयघन परंपरा आहे. ती कायम ठेवत या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावलेला आहे’. प्रेक्षकांना ही गोष्ट आपली वाटेल. हा चित्रपट वेगळा ठसा उमटवेल असे सांगून श्री. फडणवीस यांनी पुरस्कारांबद्दल कलाकारांचे अभिनंदन केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor