शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (09:13 IST)

सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महिलांनी अनुभवला पैठणीचा नक्षीदार प्रवास

marathi movie
'गोष्ट एका पैठणीची'च्या निमित्ताने मंत्रालयातील महिलांसाठी खास स्क्रिनिंग
 
नुकताच प्रदर्शित झालेला आणि सध्या चर्चेत असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईत काही ठिकाणी स्पर्धांचे, खेळांचे, बाईक रॅलीचे, लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले. या वेळी बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांना, खेळातील विजेत्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तर काही ठिकाणी या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजनही करण्यात आले. नुकताच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या या चित्रपटाचा मंत्रालयातील महिलांसाठी खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोला महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
 
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. ते पुढ म्हणाले, ‘’आयुष्याचा अर्थ समजवून सांगणारी 'गोष्ट एका पैठणीची'ची कथा हृदयाला भिडते. सुख कसे शोधावे, हे चित्रपटात उत्तमपणे मांडण्यात आलंय. सायली संजीवच्या सहजसुंदर अभिनयाने मन जिंकलं.’’
 
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " पैठणी म्हटलं की महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आम्ही अनेक खेळांचे, स्पर्धेचे आयोजन केले. या वेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाला होत्या. या स्पर्धेतील महिलांचा उत्साह खरंच उल्लेखनीय होता. यावेळी अभिनेत्री सायली संजीवनेही या महिलांसोबत धमाल केली. चित्रपटातील इंद्रायणी ही त्यांना आपल्यातीलच एक गृहिणी वाटली. या वेळी अनेकींनी चित्रपट पाहाणार असल्याची इच्छाही व्यक्त केली. हे सगळंच खूप सुखावह आहे. मंत्रालयातील महिलाही कामात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना सकारात्मक विचार दाखवण्याच्या उद्देशाने, त्यांचे थोडे मनोरंजन करण्याच्या निमित्ताने आम्ही खास शो आयोजित केला आणि मुख्य म्हणजे या शोला आपल्या महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. त्यांनीही चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. यावेळी सायलीसोबत महिलांनी हा चित्रपट एन्जॅाय केला.’’
 
मंत्रा व्हिजन प्रस्तुत, गोल्डन रेशो फिल्म्स, प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन निर्मित 'गोष्ट एका पैठणीची'चे अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता निर्माते असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.