मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 9 नोव्हेंबर 2019 (09:53 IST)

सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते पु.ल.कला महोत्सवाचे उदघाटन

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने आयोजित आठ दिवसीय पुलोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते आज रविंद्र नाट्य मंदिर येथे झाले. सर्वांचे लाडके साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या पुलोत्सवात विविधांगी कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवायची संधी दिल्याबद्दल मुक्ता बर्वे यांनी अकादमीचे कौतुक केले, तसेच रसिकांनी या महोत्सवाला भरभरुन प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही केले.
 
उद्घाटनप्रसंगी दिग्दर्शक मिलिंद लेले, लावणी नृत्यांगना मेधा घाडगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात व अनिस शेख, अवर सचिव प्रसाद महाजन, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चवरे हे उपस्थित होते. त्रिताल या अनोख्या सांगितिक कार्यक्रमाने या महोत्सवाची सुरुवात झाली. उद्घाटनानंतर नवीन संचातील कुसुम मनोहर लेले हे नाटक सादर करण्यात आले.
 
15 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात नवीन संचातील हिमालयाची सावली, संगीतकार-गायक सलील कुलकर्णी यांचा संगीतमय कार्यक्रम, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे व अन्य मान्यवरांकडून पु.लं.च्या लेखांचे अभिवाचन, पारंपरिक लोककला, ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम, हस्तकला कार्यशाळा दर्जेदार मराठी चित्रपट अशी विविधांगी कार्यक्रमांची भरगच्च सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे.
 
राज्यभरातून अनेक मान्यवर तसेच नवोदित कलाकार महोत्सवात सहभागी होणार असून नाट्य, नृत्य,काव्य,साहित्य, लोककला, हस्तकला, चित्रपट अशा अनेक कलाप्रकारांचा समावेश महोत्सवात करण्यात आला आहे. दिनांक 14 नोव्हेंबर हा बालदिन संपूर्णपणे बालकांसाठी राखून ठेवण्यात आला असून विस्मृतीत गेलेले खेळ पुन्हा एकदा खेळण्याची संधी मुलांना मिळणार आहे. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक, बिभीषण चवरे यांनी सर्व रसिक प्रेक्षकांना या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले आहे.