सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 मार्च 2022 (15:57 IST)

'लोच्या झाला रे' आता ॲमेझॉन प्राईमवर

धमाकेदार लोच्या करणाऱ्या 'लोच्या झाला रे' या चित्रपटाने महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांनाही लोटपोट हसवले. चित्रपटगृहात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यानंतर आता जगभरातील प्रेक्षकांना हसवण्यासाठी  'लोच्या झाला रे' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर  प्रदर्शित होणार आहे. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल रोजी ॲमेझॉन प्राईमवर 'लोच्या झाला रे' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पारितोष पेंटर दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे, वैदेही परशुरामी, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर, रेशम टिपणीस यांची धमाल पाहायला मिळणार आहे.  

दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणतात, “महामारीमुळे आर्थिक चक्र विस्कटून गेले होते. मात्र आम्हाला हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करायचा होता आणि त्यासाठी आम्ही प्रतीक्षा केली. प्रेक्षकांकडून आलेला प्रतिसाद पाहता आम्ही हा चित्रपट आता ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणार आहोत.  प्रेक्षकांसाठी नववर्षाची ही खास भेट आम्ही देत आहोत.'' तर निर्माता नितीन केणी म्हणतात, ''ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षक पाहू शकतील, म्ह्णूनच आम्ही हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशात अनेक मराठी प्रेक्षक आहेत, ज्यांना मराठी चित्रपट पाहता येत नाहीत. त्यामुळेच आम्ही 'लोच्या झाला रे' हा चित्रपट परदेशातील सिनेमागृहातही प्रदर्शित केला होता. ज्यांना हा चित्रपट पाहता आला नाही, त्यांच्यासाठी आता आम्ही हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करत आहोत.''

लंडनमध्ये चित्रित  झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी व अभिनय मुंबई प्रॉडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर व शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मंगेश जगताप कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.