गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2017 (22:27 IST)

डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांवर भाष्य करणारे गाणे लवकरच प्रदर्शित

डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजण्याचा एक काळ होता. नुसता डॉक्टरांचा चेहरा जरी पाहिला तरी रुग्णाला ठीक झाल्यासारखे वाटायचे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचे हेच नाते आता हळूहळू लोप पावत आहे.व्यावहारिकतेच्या या जगात रुग्ण तसेच रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. त्यामुळेच तर डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रकार आता चेव धरू लागले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांची बाजू मांडण्यासाठी विक्टरी व्हिजन बॅनरखाली अभिनेत्री प्रियांका यादव निर्मित 'चुकलं जरा डॉक्टर होऊन' हे गाणे लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे . रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या रोषांचा सामना करणाऱ्या आजच्या डॉक्टरांचा आक्रोश मांडणा-या या गाण्याचे नुकतेच जुहू येथील आजीवासन स्टुडियोत सॉंग रेकोर्डींग करण्यात आले. प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित 'चुकलं जरा डॉक्टर होऊन' या गाण्याचे रोहन पटेल यांनी संगीत दिग्दर्शन केले असून, सुरेश वाडकर, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि वैशाली सामंत या गोड गळ्यांच्या गायकाचा आवाज त्याला लाभला आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या मानसिकतेचा वेध घेणा-या या गाण्याचे बोल काही डॉक्टरांनीच लिहिले आहेत. डॉ. स्वप्नील मानकर, डॉ. सुनंदा डावरे अशी त्यांची नावे असून अविनाश घोडके यांनी देखील हे गाणे शब्दबद्ध करण्यात त्यांना सहाय्य केले असून, हे सारे जुळवून आणण्याचे काम कार्यकारी निर्माते प्रमोद मोहिते यांनी केले.   
 
उपचारादरम्यान पेशंट दगावला अगर काही बरेवाईट झाल्यास, डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मनोवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे, त्यासाठी डॉक्टरांची बाजू देखील पडताळून घेणे गरजेची आहे. 'चुकलं जरा डॉक्टर होऊन' हे गाणे डॉक्टरांच्या याच सकरात्मक बाजूचे दर्शन प्रेक्षकांना करून देणार आहे.