मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (10:29 IST)

भिकारी सिनेमातील 'मागू कसा मी' गाण्याचे बनले प्रॅक्टीस सॉंग

मी मराठा फिल्म प्रॉडक्शनचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच जीसिम्सचे कार्तिक निशानदार व अर्जुन बरन प्रस्तूत 'भिकारी' सिनेमातील 'मागू कसा मी' हे गाणे सध्या खूप गाजत आहे.  निस्सीम मातृप्रेमाचे प्रतिक असलेलं हे गाणं, थेट काळजाचा वेध घेत आहे. गुरु ठाकूर लिखित आणि विशाल मिश्रा संगीत दिग्दर्शित या गाण्याला अजय गोगावले यांचा आवाज लाभला आहे. या गाण्याची वाढती प्रसिद्धी लक्षात घेता, नांदेडच्या काही युवकांना त्यावर प्रॅक्टीस सॉंग बनवण्याचा मोह आवरला नाही. आईसाठी सर्वकाही सोडून, रस्त्यावर 'भिकारी' च्या वेशात वणवण फिरणारा मातृभक्त मुलगा यात दिसून येतो. स्वप्नील जोशीवर चित्रित करण्यात आलेल्या या हृदयस्पर्शी गाण्याला, नांदेडच्या कपिल रमेश जोंधळ या युवकाने चांगलाच न्याय दिला आहे.
 
ह्या गाण्यातील भावना जपत कपिल जोंधळ यांनी त्यावर एक प्रॅक्टीस सॉंग दिग्दर्शित केले आहे. यात मुख्य कलाकार महेंद्र मीनाक्षी गायकवाड असून, आपल्या आईसाठी हे गाणे चित्रित केले असल्याचे तो सांगतो. विशेष म्हणजे सोशल साईटवर प्रसारित झालेले हे प्रॅक्टीस सॉंग फेसबुकवरील बिईंग मराठी या पेजवर टाकण्यात आले असून, आतापर्यत दोन लाखांहून अधिक लोकांनी ते पाहिले आहे. 
 
गणेश आचार्य दिग्दर्शित 'स्वामी तिन्ही जगाचा...भिकारी ह्या सिनेमात आई आणि मुलाच्या भावनिक नात्याची नाजूक गुंफण आपल्याला पाहायला मिळणार आहेत.. 'मागू कसा' हे गाणे प्रत्येकांना आपल्या आईची आठवण करून देईल. 
 
येत्या ४ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाची कथा शशी यांची असून पटकथा, संवाद गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. यात स्वप्नील जोशीची मध्यवर्ती भूमिका असून, ऋचा इनामदार, कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर,  सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा ह्या कलाकारांची देखील विशेष भूमिका असणार आहे.