'मी पाठीशी आहे'चा ट्रेलर प्रदर्शित , श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्मचा अनोखा संगम
नव्या युगातील श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा 'मी पाठीशी आहे' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या २८ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'मी पाठीशी आहे' हा चित्रपट स्वामी समर्थांच्या अद्भुत लीलांवर आधारित असून त्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक प्रेरणादायी प्रवास ठरेल. ट्रेलरमध्ये सक्षम कुलकर्णी हा एका नव्या भूमिकेत दिसत आहे. आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांचा वेध घेणाऱ्या या चित्रपटात अध्यात्म आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम पाहायला मिळेल. हा एक कौटुंबिक चित्रपट असून ट्रेलरमध्ये माधुरी पवार हिच्या दमदार लावणीची झलक देखील पाहायला मिळत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक पराग अनिल सावंत म्हणतात, " 'मी पाठीशी आहे' हा चित्रपट म्हणजे श्रद्धा आणि विश्वासावर उभा राहिलेला एक प्रवास आहे. स्वामी समर्थ हे केवळ एक दैवी शक्ती नाही तर अनेकांच्या आयुष्यातील मार्गदर्शक आहेत. त्यांचा आशीर्वाद आणि कृपा कशी जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते, हे आम्ही या कथेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना २८ मार्चला ही प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळेल. हा चित्रपट आम्ही बनवला नसून स्वामींनी ही कलाकृती आमच्याकडून साकारून घेतली आहे. "
ऑफबीट प्रॉडक्शन, नित्य सेवा प्रॉडक्शन आणि वेरा प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे कथा, संकलन आणि दिग्दर्शन पराग अनिल सावंत यांनी केले असून मयूर अर्जुन खरात, लक्ष्मीकांत गजानन कांबळे, ॲड. शुभांगी किशोर सोनवले, प्रमोद नंदकुमार मांडरे, शितल सोनावणे, ऋतुजा नरेंद्र कदम, अनिल गावंड आणि केतन कल्याणकर या स्वामींच्या सेवेकरांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. संजय नवगिरे, दिलीप परांजपे यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली असून संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत. तर चित्रपटातील गाण्यांना कबीर शाक्य यांना संगीत सेवा करण्याची संधी लाभली आहे. या चित्रपटात सक्षम कुलकर्णी, सतीश पुळेकर, अरुण नलावडे, सुहास परांजपे, वर्षा प्रभु, श्रीकांत पाटील, अश्विनी चवरे, प्रसाद सुर्वे, शितल सोनावणे, सूचित जाधव, श्रद्धा महाजन, राजवीर गायकवाड, वैष्णवी पोटे यांच्या प्रमुख भूमिका असून माधुरी पवार, संदेश जाधव आणि नूतन जयंत हे विशेष पाहुणे म्हणून झळकणार आहेत.