शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (11:25 IST)

दसऱ्याच्या शुभमुहुर्वावर शाहीर साबळेंवरील जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’च्या चित्रीकरणाला वाई येथे सुरुवात

दसऱ्याच्या शुभमुहुर्वावर निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत ५ ऑक्टोबर रोजी झाला शुभारंभ

maharashatra shahir
‘महाराष्ट्राचे शाहीर’म्हणून ज्यांची ख्याती होती त्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार  होत असलेल्या त्यांच्या जीवनावरील ‘महारष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या प्रत्यक्ष चित्रीकरणाला दसऱ्याच्या मुहूर्तावर बुधवारी ५ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. शाहिरांचे मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील वाई येथे या चित्रीकरणाला सुरुवात झाली. चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
 
उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेल्या ‘महारष्ट्र शाहीर’च्या चित्रीकरणाच्या शुभारंभाला चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया व बेला केदार शिंदे यांच्याबरोबर चित्रपटाचा संपूर्ण चमू उपस्थित  होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे करत असून संगीत आघाडीची संगीतकार जोडी अजय-अतुल यांचे आहे. चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. हे सार्वजण यावेळी उपस्थित होते. 
 
‘महाराष्ट्र शाहीर’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची आहे. चित्रपटात शाहिरांच्या इतर समकालीन आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार अशा प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने पुढे येतील.
 
चित्रपटाबद्दल एकेक विलक्षण गोष्टी पुढे आल्या आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली. या चित्रपटातील छोट्या शाहीर साबळेना आवाज देण्यासाठी निर्माते, संगीतकारांनी चक्क समाज माध्यमांवर ‘चंद्रा’गाण्याने लोकप्रिय झालेल्या जयेश खरेला करारबद्ध केले आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आजोबांवरील चित्रपटाचे दिग्दर्शन नातू करतो आहे, हे चित्रपटसृष्टीतील कदाचित पहिलेच उदाहरण असेल. त्यानंतर आणखी एक विक्रम या चित्रपटाने प्रस्थापित केला आहे आणि तो म्हणजे शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेत शाहिरांची पणती म्हणजे केदारची मुलगी सना दिसणार आहे. 
 
चित्रपटाच्या चित्रीकरण शुभारंभाबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणतो, “माझे आजोबा म्हणजे शाहिर साबळे यांच्या जीवनावरील चित्रपट ही आमच्यासाठी एक ऐतिहासिक घटना आहे. त्यात माझे योगदान मला देता येत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादात मी घडलो आहे. माझ्या आयुष्यावर त्यांची छाप आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत असल्याचा आजचा दिवस सुर्वणाक्षरांनी लिहून ठेवावा असाच आहे. मला त्याबद्दल अतिशय आनंद होतोय, अभिमान वाटतोय. नातू म्हणून मला शाहीर मोठे वाटतातच, पण एक कलाकार म्हणूनही मला त्यांचे जीवन खूपच मोठे वाटते. शाहिरांचा जीवनपटावरील काम गेली अडीच वर्षे सुरू आहे. आपले कलाकार किती मोठे होते, आपल्या मातीतून हे कलाकार कसे घडले, त्यांनी यश कसे मिळवले, यश मिळवणे एवढे सोपे असते का, अशा अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे नव्या पिढीला या चित्रपटाच्या माध्यमातून मिळतील.”
 
‘महाराष्ट्राचे शाहीर’अशी ज्यांची ख्याती होती त्या शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेंबर २०२२ ते ३ सप्टेंबर २०२३ दरम्यान साजरे होत आहे. शाहिरांच्या जीवनावरील हा जीवनपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होत आहे. 

Vaibhav Patil

Published By -Smita Joshi

Vaibhav Patil