बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (16:49 IST)

‘बोनस’चे बिनधास्त माईकवर बोलायला लावणारे रॅप गाणे ‘माइक दे’ प्रदर्शित...

अर्जुन सिंग बरन व कार्तिक डी निशानदार आणि ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’प्रस्तुत आणि सौरभ भावे दिग्दर्शित ‘बोनस’ हा मराठी चित्रपट येत्या २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील कलाकारांचे हटके लुकमधील पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. या कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये नेमकं काय काय पहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठीतील ग्लॅमरस कलाकार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘बोनस’ या चित्रपटाचे ‘माइक दे’ हे रॅप गाणे प्रेक्षकांसाठी नुकतेच प्रकाशित करण्यात आले.
 
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार यांनी ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’, गोविंद उभे, एन अनुपमा आणि कांचन पाटील यांच्या समवेत ‘बोनस’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. आणखी एक आगळा वेगळा चित्रपट हे सर्वजण रुपेरी पडद्यावर सादर करायला सज्ज झाले
 
या रॅप गाण्याची सुरुवात ‘अनुभव छोट्या क्षणांची बोनस धमाल’ अशा वाक्याने होते आणि मग ते “माईक दे बिनदास बोलायचं ते बोलू दे, माईक दे जरा लोकांचे कान खोलू दे, माईक दे माईक दे बिनदास बोलायचं ते बोलू दे, ऐकायचा तर ऐक  नाय तर चल चुरन सोडून दे” अशा बेधडक शब्दांत पुढे सरकते. हे गाणे रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केले असून या गाण्यामध्ये सिनेमात गश्मीर महाजनीच्या सामान्य जगण्यातील संघर्ष दिसतो. त्यावर गश्मीर कशी मात करतो हे या गाण्यात व्यक्त होते. हे गाणे ऋषिकेश जाधव आणि एम सी आझाद यांनी शब्दबद्ध केले असून त्यांनीच ते गायले आहे. हे रॅप गाणे गश्मीर महाजनीबरोबर पूजा सावंत आणि जयवंत वाडकर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.
 
या गाण्याबद्दल बोलताना संगीतकार रोहन रोहन सांगतात की, ‘'माईक दे' हे ‘बोनस’मधील रॅप गाणे खूप उत्तमरीत्या तयार झाले असून ऋषिकेश जाधव आणि एम सी आझाद या दोघांनी खूप चंगल्यारित्या लिहिले व रॅप केले आहे. हे गाणे तरुणाईला बिनधास्तपणे बोलायला लावणारे आणि ठेका धरायला लावणारे असे गाणे आहे. या रॅप गाण्यामध्ये गश्मीर महाजनी जे पात्र साकारत आहे, त्यातून त्याचा रोजच्या सामान्य जगण्यातला संघर्ष अधोरेखित होतो. ‘बोनस’ या सिनेमासाठी हे गाणे संगीतबद्ध करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा आम्हांला खूप आनंद आहे. हे रॅप गाणे प्रेक्षकांनादेखील खूप आवडेल असा आम्हांला विश्वास आहे.”
 
‘बोनस– अॅवॉर्ड फॉर ऑडेसिटी’ या चित्रपटाची संपूर्ण चित्रपटसृष्टीत चर्चा आहे ती या चित्रपटाची कथा आणि त्यातील कलाकारांमुळे. गश्मीर महाजनीने अगदी कमी वेळातच आपली अशी वेगळी छाप चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. देऊळबंद, कान्हा, वन वे टीकिट आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही यांसारखे त्याचे चित्रपट गाजले आणि त्यातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुकही झाले.
 
पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वात सुंदर अशा नायिकांपैकी एक आहे. तिच्या नावावर अनेक गाजलेले चित्रपट आहेत. त्यांत दगडी चाळ, वृदांवन, पोश्टरबॉइज, लपाछपी, जंगली या चित्रपटांचा समावेश असून त्यांतील तिच्या मध्यवर्ती भूमिका गाजल्या आहेत.
 
चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात युवा दिग्दर्शक सौरभ भावे यांनी केले आहे. त्यांची ओळख एक प्रख्यात कथा आणि पटकथालेखक म्हणून चित्रपटसृष्टीत आहे. त्यांनी कित्येक मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यांत हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक आदी चित्रपटांचा समावेश आहे. 
 
या चित्रपटाची प्रस्तुती जीसिम्सच्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांची आहे. जीसिम्सने याआधी मोगरा फुलला, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण या चित्रपटांची निर्मिती केली असून भिकारी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. जीसिम्स हा भारतातील एक आघाडीचा स्टुडीओ असून तो चित्रपट, टीव्ही आणि वेब सिरीज निर्मिती आणि प्रतिभा व्यवस्थापन तसेच उपग्रह संयोजन या क्षेत्रांमध्ये अग्रणी आहे.