पुरुषोत्तम बेर्डे यांचा गावरान तडका... 'मुक्काम पोस्ट आडगाव'
पुरुषोत्तम बेर्डे हे नाव उच्चारलं की वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण काहीतरी असणार याची खात्री असते. रसिक प्रेक्षकांची नाडी नेमकी ओळखणाऱ्या पुरुषोत्तम बेर्डे यांची प्रत्येक कलाकृती आकर्षक आणि बहारदार असते. लवकरच ते रंगमंचावर एक जबरदस्त गावरान तडका घेऊन येत आहेत. त्यांच्या 'मुक्काम पोस्ट आडगाव' या नव्या नाटकाचा शुभारंभ 24जानेवारीला दुपारी 4.00 वा. यशवंत नाट्यगृहात होणार आहे.
अष्टविनायक प्रकाशित, स्नेहा प्रदीप प्रोडक्शन्स आणि अकॅडमी ऑफ सिनेमा अँड थिएटर निर्मित पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या नाटकाद्वारे पुन्हा एकदा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नवीन अभिनेते, अभिनेत्री, गायक, नर्तक आणि वादक पदार्पण करणार आहेत.
'रिव्ह्यू' या नाट्यप्रकारांत मोडणाऱ्या फॉर्ममध्ये निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, वेशभूषाकार व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी हे नाटक २५ कलावंत तंत्रज्ञाच्या ताफ्यात उभे केले असून मराठवाड्यातील मूळ आडगाव मधून येऊन औरंगाबाद, पुणे, मुंबई नंतर संपूर्ण जग फिरलेले प्रदीप आडगावकर यांच्या आत्मनिवेदनातून अत्यंत नाविन्यपूर्ण असा नाट्याविष्कार निर्माता दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे मराठी रंगभूमीवर सादर करीत आहेत. हा सर्व नाट्यप्रकार संगीत, नाट्य, नृत्य आणि गीतांच्या माध्यमातून पुढे जातो. 'मुक्काम पोस्ट आडगाव' हा नाट्यप्रयोग भव्य-दिव्य असा दृष्टी सौख्याचा आनंद देणारा असेल असा विश्वास दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे व्यक्त करतात.
'मुक्काम पोस्ट आडगाव' हे नाटक म्हणजे मराठवाड्यातल्या एका खेडेगावातून मुंबई पुण्यात शिकून एका मोठ्या फार्मासिटिकल कंपनीच्या सीईओ पदापर्यंत पोहोचलेल्या अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा एका मूळच्या शेतकरीपुत्राची गोष्ट आहे, ज्याच्या नसानसात मराठवाड्याची भाषा, संस्कृती, लोककला, साहित्य, कविता, संतकाव्य आणि तिथल्या खेड्यापाड्यातल्या रूढी प्रथा ठासून भरलेल्या आहेत. असा हा शेतकरीपुत्र अनेक वर्षांनी मराठवाड्यातल्या आपल्या आडगाव या खेडयात जातो आणि तिथलं बदलत चाललेलं लोकजीवन आणि संस्कृती पाहून आपल्या गतकाळाच्या तुलनेने अस्वस्थ होतो.. आणि गतकाळातल्या समृद्धीचे मोठ्या रसिकतेने आणि रसभरीत भाषेने पुनःप्रत्ययाचा आनंद रसिकांनाही देतो आणि स्वत:ही अनुभवतो.