‘वेल डन बेबी’चा अभिनेता पुष्कर जोगने आपल्या प्रियजनांसोबत साजरा केला ‘सुरक्षित’ गुढी पाडवा!
पुष्कर जोगसाठी हा गुढी पाडवा खास आहे कारण नुकताच अॅ मेझॉन प्राइम व्हिडिओवर त्याचा 'वेल डन बेबी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पुष्कर हा केवळ या चित्रपटाचा मुख्य नायकच नसून त्याने या चित्रपटाची सहनिर्मिती देखील केली आहे. प्रेक्षकांकडून त्याला चांगल्या प्रतिक्रियाही मिळत असल्यामुळे तो खुश आहे आणि आजच्या या गुढी पाडव्याच्या प्रसंगी आपल्या कुटुंबासमवेत घरीच एक खास आणि सुरक्षित असं डबल-सेलिब्रेशन करत आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पुष्कर आणि चित्रपटाची मुख्य कलाकार अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांनी चाहत्यांना सुरक्षा, आनंद, शांती आणि समृद्धीने भरलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढी पाडव्याविषयी बोलताना पुष्कर म्हणाला की, “मी आणि माझी पत्नी, आमच्या दोघांचा ठाम विश्वास आहे की, देवच आपले आशास्थान आणि कल्याण करणारा आहे. या शुभ सणाच्या वेळी, आम्ही पारंपारिक विधी पाळतो आणि देवाच्या मंगलमय आशीर्वादासाठी प्रार्थना करतो. माझ्या छोटीसाठी, हा सर्व उत्सव म्हणजे ऑनलाईन-शाळेचा ब्रेक असतो, जो तिला आवडतो. हा गुढी पाडवा यावेळी माझ्यासाठी आणखीनच विशेष आहे कारण आम्ही आमचा वेल डन बेबी हा चित्रपट अॅवमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला आणि देवाच्या कृपेने चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. माझ्या सर्व चाहत्यांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. घरी रहा आणि सुरक्षित रहा आणि निश्चितच आपल्या कुटुंबासमवेत वेल डन बेबी पहा, जो आम्ही तुमच्यासाठी प्रेमाने तयार केला आहे.”
नवोदित दिग्दर्शिका प्रियंका तन्वर दिग्दर्शित या कौटुंबिक नाट्यामध्ये एक आधुनिक काळातील जोडपे जे त्यांच्या विवाहातील जटिल समस्यांमध्ये गुंतलेले आहे, ते प्रेग्नंट झाल्यावर काय घडते, याची मनोवेधक कथा सांगितली आहे. गुढी पाडव्यानिमित्त विशेष असा वेल डन बेबी, अॅामेझॉन प्राइम व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत आहे.