रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जानेवारी 2024 (10:49 IST)

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या त्यांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतंच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने चित्रपटाच्या टीमने रॅपअपचे फोटो शेअर केले आहेत. चित्रपटात ‘मुक्ताई’ची, संत ज्ञानेश्वरांची भूमिका कोण साकारणार? याविषयी उत्सुकता असून चित्रपटात काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती देताना सांगितले की, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूपच दैवी होता आणि विलक्षण आंतरिक शांती प्रदान करणारा होता. आमच्या संपूर्ण टीम ने या चित्रीकरणाच्या दरम्यान अतीव मानसिक समाधान मिळाल्याचे वेळोवेळी सांगितले आहे.
 
‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांना मिळत असलेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाले असून ए.ए.फिल्म्स प्रस्तुत ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट जून २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
 
संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वांना परिचित आहेत. मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेने सिद्ध जीवन होते. अशा या ‘मुक्ताई’चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटात ‘मुक्ताई’ यांचे बालपण आणि त्यांचा अध्यात्माचा प्रवास दाखविला जाणार आहे.