1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 नोव्हेंबर 2023 (08:51 IST)

AJAGRAT : श्रेयस तळपदेने केली त्याच्या 'अजाग्रत' या पॅन इंडिया ब्लॉकबस्टरची घोषणा

Ajagrat
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा एक अष्टपैलू अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. 'पुष्पा' या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला हिंदी आवाज दिल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'अजाग्रत' या हिंदी चित्रपटाद्वारे श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 
 'अंधारामागील सावल्या' अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाचे कथानक अनपेक्षिरित्या उलगडणार आहे. चित्रपटाच्या शक्तिशाली शीर्षकाला तितक्याच ताकदीचे टॅगलाईन लाभल्याने प्रेक्षकांना या रहस्यमय चित्रपटात काय पाहायला मिळेल, याची उत्सुत्कता लागली आहे. या चित्रपटात माजी मुख्यमंत्री यांची पत्नी, कन्नडची अभिनेत्री राधिका कुमारस्वामी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त 'अजाग्रत'मध्ये सुनील, राव रमेश, जगपती बाबू, आदिथ्य मेनन, देवराज, अच्युत कुमार, साई कुमार, समुद्र कानी, मोहन लाल यांच्यासह अन्य कलाकार आहेत. या चित्रपटात जिवंतपणा आणण्यासाठी सेटची रचना अतिशय बारकाईने केली आहे. चित्रीकरणस्थळ अधिक नैसर्गिक वाटण्यासाठी दिग्दर्शक शशिधर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शशिधर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. 
 
 रवी राज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट पॅन इंडिया नेण्याचा मानस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून 'अजाग्रत'च्या राधिका कुमारस्वामी यांच्या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. हा चित्रपट हिंदीसह सात विविध भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'अजाग्रत' हा एक ॲक्शन थ्रिलर असून यात श्रेयस तळपदेसोबत अजून एक बॉलिवूड अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याची ओळख लवकरच समोर येणार आहे, ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता वाढेल. हा चित्रपट श्रेयस तळपदेसाठी खास असणार आहे. सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणारा त्याचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणारा आहे. आकर्षक कथानक, कलाकार आणि दूरदर्शी दिग्दर्शनासह 'अजाग्रत' भारतीय चित्रपटसृष्टीत नवीन बेंचमार्क सेट करण्यासाठी सज्ज आहे.