शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जुलै 2019 (16:20 IST)

स्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र

प्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असताना या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच नाटक, सिनेमा आणि मालिका यांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली अभिनेत्री स्पृहा जोशी आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील गुरु म्हणून घराघरात पोहचलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर ‘संजय दत्त प्रॉडक्शन्स’ आणि ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ निर्मित ‘बाबा’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. स्पृहा जोशी ही ‘पल्लवी’ आणि अभिजीत खांडकेकर हा ‘राजन’ नावाची व्यक्तिरेखा साकारत असून या चित्रपटात दोघेजण नवराबायको बनले आहेत. या चित्रपटातील अभिजीत आणि स्पृहा या दोघांनी एकत्र केलेले काम आणि त्यांची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग आतुर झाला आहे. ‘भावनेला भाषा नसते’, हा सरळसाधा संदेश देतो ‘बाबा’ चित्रपट देतो. हा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे.
‘बाबा’मध्ये ‘तनु वेडस मनू’ आणि ‘हिंदी मिडीयम’ फेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भुमिका आहे. तो या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्याबरोबर नंदिता पाटकर प्रमुख भूमिकेत आहे. त्यांना स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी यांची साथ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. याआधी त्यांनी ‘धागा’ या झी5 वर प्रदर्शित झालेल्या मराठी लघुपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला रोहन रोहन यांचे संगीत असून पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचे आहे. 
 
आपल्या भूमिकेविषयी बोलताना स्पृहा जोशी म्हणाली की ‘मी आणि अभिजीत मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र येत आहोत. आम्ही दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत आहोत. अभिजीत आणि मी चांगले मित्र आहोत, पण आम्ही याआधी कधीच एकत्र काम केले नव्हते. ‘बाबा’च्या माध्यमातून ती संधी चालून आली, याचा मला आनंद आहे. ‘बाबा’ ही नात्यांमधील बंधाची एक सुरेख कथा आहे. आम्हा दोघांमधील केमिस्ट्रीचा प्रश्नच उद्भवला नाही, कारण आम्ही एकमेकांना खूपच चांगले ओळखतो’. 
 
अभिजीत खांडकेकर म्हणाला की ‘या चित्रपटात माझा लुक अगदीच वेगळा आहे. बेल बॉटम पँट तसेच चौकोनी आकाराची चष्म्याची फ्रेम या सर्व गोष्टी या व्यक्तिरेखेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना मला खूपच मजा आली. स्पृहा जोशी माझी चांगली मैत्रीण आहे तसेच मी तिला खूप वर्षापासून ओळखतो. पण तिच्याबरोबर मी कधीच काम केले नव्हते, मला या चित्रपटाच्या माध्यमातून ही संधी मिळाली याचा मला आनंद आहे’. 
चित्रपटाची सहनिर्मिती ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’बरोबर ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’च्या अशोक आणि आरती सुभेदार यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझर आणि पोस्टरला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद लाभतो आहे. 'अडगुलं मडगुलं' या गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या पहिल्या गाण्यालाही रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि इतर भाषेतील चित्रपटसृष्टींमध्येही चित्रपटाचा बोलबाला आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर दस्तुरखुद्द संजय दत्तने चित्रपटातील सर्व अभिनेते आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत नुकताच प्रकाशित केला. या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढवली आहे कारण चित्रपटात अनेक चकित करणारे टप्पे असल्याचा अंदाज बाबाचा हा ट्रेलर देतो. 
एका ऐकू-बोलू न शकणाऱ्या जोडप्याची आणि त्यांच्या आठ वर्षांच्या बोलू न शकणाऱ्या मुलाची ही कथा आहे. एका छोट्याशा गावात आपल्या छोट्याशा विश्वात हे कुटुंब खुश आहे. पण अशातच एक वादळ त्यांच्या आयुष्यात येते. एक उच्चभ्रू जोडपे त्यांच्या घरी येते आणि त्यांच्या मुलावर आपला हक्क सांगते. स्थानिक पोलीस हस्तक्षेप करतात आणि त्यांना मुलावरील हक्क कोर्टात शाबित करून आणायला सांगतात. त्यातून पुढे काय होते, बाबा सर्व संकटांवर मात करून आपल्या मुलाला त्या कायदेशीर लढाईत जिंकतो कि त्याला हार मानावी लागते, हे अनुभवण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट रसिकांना पाहावी लागणार आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणात चित्रित झालेला हा चित्रपट पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे.