शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 20 जुलै 2019 (14:28 IST)

झिम्बाब्वे क्रिकेट: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारताला नमविणारा संघ राजकारणामुळे आऊट होतो तेव्हा...

पराग फाटक
'झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड निलंबित' हे नोटिफिकेशन थडकल्यावर गावातल्या वाड्याची शेवटची तुळई निखळल्यासारखं वाटलं. चौसोपी नांदता वाडा खंक व्हावा तशी गत झाली.
 
जिथे एकेकाळी पंगती वाढल्या गेल्या, तिथे तेलाचे डाग पडलेली शुष्क चूल उरावी. माणसांनी गजबजलेल्या दिवाणखान्यात फक्त सदरा टांगायची खुंटी उरावी तशी अवस्था.
 
लिंबू टिंबू ते दखल घ्यावी असे आणि वचकून राहावं असा संघ अशा स्थितीतून झिम्बाब्वेच्या अधोगतीला सुरुवात झाली. सोळा वर्षांपूर्वी अधपतनाला सुरुवात झाली. शुक्रवारी ICCच्या एक पत्रकाने एका पर्वाला अधिकृतरीत्या पूर्णविराम मिळाला.
 
नव्वदीत जन्मलेल्या आणि वायटूके आधीच्या काळात लहानाचे मोठे होत असलेल्या मंडळींसाठी झिम्बाब्वे क्रिकेट हा हळवा कोपरा होता. आणि हे हळवेपण सहानुभूती, अनुकंपेतून नव्हे तर खणखणीत कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी मिळवलं होतं.
 
यंत्रवत सातत्यासह रन करणारा अँडी फ्लॉवर, हळूवार बॉलिंग अॅक्शन असणारा ग्रँट फ्लॉवर, शैलीदार अॅलिस्टर कॅम्पबेल, बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये ओपनिंग करून स्लिपमध्ये उभा राहणारा भन्नाट ऑलराऊंडर नील जॉन्सन, चित्याप्रमाणे बॉलवर झडप घालणारा मरे गुडविन, दणकट बांध्याचा हिथ स्ट्रीक, पॉल आणि ब्रायन स्ट्रँग, गॅव्हिन आणि जॉन रेनी, बोर्डाशी पंगा घेणारा हेन्री ओलोंगा, चिवटपणे रन्स करणारा स्टुअर्ट कॅरलाइस, क्रिकेटपेक्षा WWEमध्ये शोभेल असा इडो ब्रँडेस, क्लूसनरप्रमाणे फटकेबाजी करणारा अँडी ब्लिगनॉट, स्कूप शॉटने आपल्याला हरवणारा डग्लस मॅरेलिअर, उंची लहान पण कीर्ती महान तातेंदा तैबू, संघासाठी युटिलटी ठरणारा ट्रॅव्हिस फ्रेंड - किती नावं घ्यावी.
 
अंगीभूत गुणवत्ता, मेहनतीने मिळवलेली गुणकौशल्यं, मोठ्या संघांविरुद्ध दडपण न घेता केलेलं दमदार प्रदर्शन यामुळे झिम्बाब्वे क्रिकेटचे असंख्य शिलेदार कायमचे मनात कोरले गेले. चांगला आंतरराष्ट्रीय संघ होण्यासाठी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्या पक्क्या लागतात.
 
झिम्बाब्वेचे बॅट्समन पेस आणि स्पिन दोन्ही उत्तम खेळायचे. त्यांची बॉलिंग प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणायची. फिल्डिंगबाबतीत ते बाप होते. कॅचेस, रनआऊट्स आणि प्रत्येक मॅचमध्ये 20-30 वाचवणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या मॅचेस बघताना सकस काहीतरी बघितल्याची अनुभूती मिळायची.
 
झिम्बाब्वे म्हणजे पूर्वीचा ऱ्होडेशिया. हा संघ दक्षिण आफ्रिकेतल्या कुरी कपमध्ये खेळायचा. 1980 मध्ये ते स्वतंत्र झाले आणि पुढच्याच वर्षी ICCने झिम्बाब्वेची असोसिएट मेंबर म्हणून नोंद केली.
 
1983 वर्ल्ड कपमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. 1987ची वर्ल्ड कपवारी त्यांच्यासाठी फारशी ग्रेट नव्हती, मात्र 1992 वर्ल्ड कपमध्ये त्यांनी इंग्लंडला हादरवलं.
 
वनडेमधली चांगली कामगिरी लक्षात घेऊन त्याचवर्षी झिम्बाब्वेला कसोटी दर्जा देण्यात आला. 1995 मध्ये हरारेत झिम्बाब्वेने पाकिस्तानविरुद्ध पहिल्यावहिल्या कसोटी विजयाची नोंद केली. 1999 वर्ल्ड कपमध्ये झिमाब्वेने भारताला हरवलं आणि खऱ्या अर्थाने जगाला दखल घ्यायला भाग पाडलं.
 
झिम्बाब्वेच्या खेळात लिंबूटिंबू संघाकडे असतं तसं नवखेपण नव्हतं. वेस्ट इंडिज संघ मनमौजी दृष्टिकोनासाठी ओळखला जातो, झिम्बाब्वे कट्टर व्यावसायिक संघ होता. 1997 ते 2002 या कालखंडात त्यांनी यशाचे अनेक टप्पे गाठले.
 
मात्र या उष:कालावर भविष्यातला काळोख झडप घालणार होता. खेळ रुजण्यासाठी सामाजिक बैठक, आर्थिक सुबत्ता, राजकीय इच्छाशक्ती प्रबळ लागते. झिम्बाब्वेचे खेळाडू गुणवान होते, पण सभोवतालाने त्यांचा घात केला.
 
वर्णभेदाचे वाढते प्रसंग आणि सरकारकडून झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड बळकावण्याचे प्रयत्न यातून विनाशाचा मार्ग रेटला गेला. 2003 वर्ल्ड कपचे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, केनिया सहयजमान होते. वर्ल्ड कपदरम्यान अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलोंगा यांनी निषेध म्हणून Death of Democracy अर्थात 'लोकशाहीचा मृत्यू' झाल्याचं सांगत खेळताना दंडाला काळी फित बांधली.
 
अँडी फ्लॉवर झिम्बाब्वे संघाचा कणा होता तर ओलोंगा हा झिम्बाब्वेसाठी खेळणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू होता. या दोघांची संघातून हकालपट्टी करण्यात आली. याच वर्ल्ड कपमध्ये सुरक्षितता आणि रॉबर्ट मुगाबे यांची जुलमी धोरणं यांना विरोध म्हणून इंग्लंडने झिम्बाब्वेत खेळण्यास नकार दिला. त्या सामन्याचे गुण झिम्बाब्वेला बहाल करण्यात आले.
 
पुढच्याच वर्षी कर्णधार हिथ स्ट्रीकला नारळ देण्यात आला. स्ट्रीकला पाठिंबा आणि निर्णयाचा निषेध म्हणून 14 खेळाडूंनी संघत्याग केला. झिम्बाब्वे संघाचा प्राणच गेला.
 
खेळाडू आणि बोर्ड यांच्यात संघर्ष सुरू राहिला. त्यामुळे 2004 साली झिम्बाब्वेचा टेस्ट संघाचा दर्जाही काढून घेण्यात आला, तोही अवघ्या सात टेस्ट खेळल्यानंतर.
 
दोन वर्षात झिम्बाब्वेच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधली लोगन कप स्पर्धा बंद झाली. रॉबर्ट मुगाबे यांनी झिम्बाब्वे क्रिकेट संपवलं असा आरोप माजी खेळाडू, जाणकार करतात.
 
2007 मध्ये ट्वेन्टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवत झिम्बाब्वेने आशा पल्लवित केल्या. मात्र आर्थिक डबघाई, खेळाडूंच्या करारावरून असलेला वाद आणि राजकीय अस्थिरता यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट गाळात रुतलं.
 
बहुतांश खेळाडूंनी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया तसंच दक्षिण आफ्रिका गाठलं होतं. वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू फिल सिमन्स यांनाही अपमानास्पद वागणूक मिळाली. सिमन्स यांनी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला कोर्टात खेचलं. तंटे वाढत गेले, क्रिकेटला ओहोटी लागली.
 
पण कालांतराने परिस्थिती थोडी सुधारली आणि 2011 मध्ये टेस्ट खेळण्याचा परवाना त्यांना परत मिळाला. झिम्बाब्वेने लगेचच बांगलादेशला टेस्ट आणि वनडेत हरवलं.
 
2013 मध्ये कराराच्या मुद्यावरून खेळाडू आणि बोर्ड यांच्यातली खडाजंगी विकोपाला गेली. आणि तेव्हापासून झिम्बाब्वे क्रिकेट जणू दुष्काळालाच सामोरं जातोय.
 
गेल्या महिन्यात झिम्बाब्वे सरकारने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड बरखास्त केलं आणि एका अंतरिम समितीची नेमणूक केली. त्यानंतर ICCने हे पत्रक काढून अनेक व्यावसायिक क्रिकेटर्स आणि हजारो क्रिकेटप्रेमींच्या मनावर घाला केला.
 
"क्रिकेट प्रशासनात सरकारचा वाढता हस्तक्षेप चिंताजनक आहे. झिम्बाब्वे बोर्डाच्या निवडणुकांसाठी सुरक्षित आणि मुक्त वातावरण हवे. ICCच्या निर्देशक तत्त्वांची अंमलबजावणी न केल्याने झिम्बाब्वेला तात्काळ निलंबित करण्यात येत आहे," असं आयसीसीने पत्रकात म्हटलं आहे.
 
त्यामुळे आता ICCकडून झिम्बाब्वेला मिळणारा निधीपुरवठा बंद करण्यात येईल. झिम्बाब्वेच्या संघाला कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
 
डौलदार वृक्षाला वाळवीने पोखरून काढावं तसं काहीसं झिम्बाब्वे क्रिकेटचं झालं. लाल रंगाची जर्सी घालून त्या रंगाला साजेसा खेळ करणारे खेळाडू आणि एक टीम होती हे सांगावं लागेल हे चाहत्यांचं दुर्देव...