तुझी मम्मी आणि मी आत्महत्या करत आहे पोलिसांना सांग, पत्नीचा खून नवऱ्याची आत्महत्या
पुणे येथे पत्नी, मुलीला सणसवाडी डोंगरावर घेऊन जाऊन मुलीला तुझी मम्मी आणि मी खोटी खोटी आत्महत्या करतो. तू पोलिसांना जाऊन सांग, असे सांगून पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पत्नीच्या साडीनेच गळफास घेऊन पतीनेही आत्महत्या केली. उर्मिला संतोष बच्चेवार (रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ. चांडोळा, ता. नांदेड, जि. नांदेड) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. संतोष बच्चेवार असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. या घटनेची माहिती दांपत्यांची मुलगी कोमल संतोष बच्चेवार (वय- ९) हिने पोलिसांना दिली. संतोष याने एका महिलेला तीन लाख रुपये आणि पत्नीचे दागिने दिले होते. मात्र, त्या महिलेने पैसे आणि दागिने परत देण्यास नकार दिला. संतोषने महिलेविरुद्ध पाबळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. उर्मिला आणि संतोष महिलेकडे पैसे मागण्यासाठी गेले होते. त्या महिलेने पैसे दिले नाहीत. यावरून संतोष आणि उर्मिला यांच्यामध्ये जोरदार वाद झाले. संतापलेला संतोष पत्नी आणि मुलीला घेऊन सणसवाडी डोंगरावर घेऊन गेला. डोंगरावर गेल्यानंतर त्याने मुलीला तुझी मम्मी आणि मी खोटी खोटी आत्महत्या करतो. तू पोलिसांना जाऊन सांग. मग पोलीस त्या बाईकडून आपले पैसे काढून देतील असे संतोषने कोमलला सांगितले. कोमल डोंगर उतरत असताना आईचा ओरडण्याचा आवाज आला. तिने परत आई-वडीलांकडे जात असाताना वडील आईची साडी घेऊन जाताना दिसले. कोमलने इतरांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेत माझी मम्मी आणि पप्पा आत्महत्या करत असल्याचे सांगताच पोलीस देखील चक्रावून गेले. पोलिसांनी सणसवाडी डोंगरावर धाव घेतली असता उर्मिलाचा खून करून संतोषने तिच्या साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.