चिमुकली आजारी असतांना रडते म्हणून आईने केली तिची हत्या
चिमुकली स्वरा ही मागील काही दिवसांपासून आजारी होती, त्यामुळे सहाजिकच तिचे रडणेदेखील वाढले होते. त्यामुळे आई योगिताला स्वराचा फार कंटाळा आलेला होता. सोबतच स्वरावरील औषधोपचाराचा, तिचा सांभाळ करण्याचा योगिताला खूप वीट आला होता. तर हा कंटाळा पुढे तिटकार्यात बदलला व आई योगिताने अत्यंत थंड डोक्याने स्वराच्या गळ्यावर ब्लेड चालवत तिची हत्या केली. फक्त वय १४ महिने असलेल्या स्वराचे रडणे कायमचे बंद केले. तर पुढे घरात शिरलेल्या चोरट्याने स्वराची हत्या केल्याचा बनाव योगीताने केला. हे सर्व सत्य पोलीस तपासातून पुढे आले आहे. नाशिक येथील औरंगाबाद रोडवरील साई पॅराडाइज सोसायटीमधील रहिवासी योगिता मुकेश पवार हिने घरात एकटी असताना, मंगळवारी दि. 16 स्वत:ची लेक स्वरा (14 महिने) हिची गळा चिरून हत्या केली. पोलिसांकडे तक्रार नोंदवताना अज्ञात चोरट्याने स्वराची हत्या केल्याचा बनाव केला. पंचनाम्यात समोर आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांवरून योगिताचा बनाव उघडकीला आला. योगिता पवार हिला पोलिसांनी बुधवारी (दि.17) अटक केली होती. या आईला न्यायालयात उभे केले असता तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.