सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2019 (16:22 IST)

चारुलता पटेल: 87 वर्षांच्या आजीबाई ठरल्या 'फॅन ऑफ द टुर्नामेंट'

बांगलादेशवर विजय मिळवत मंगळवारी विराट कोहलीची भारतीय टीम वर्ल्ड कप 2019च्या सेमी फायनलमध्ये दाखल झाली. आणि विराटने हा विजय साजरा केला त्याच्या एका सुपर फॅनसोबत. या फॅनचं वय - फक्त 87 वर्षं. नाव - चारुलता पटेल.
 
विजय मिळवून टीम मैदानातून बाहेर पडत असताना विराट कोहली आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला रोहित शर्मा थेट गेले चारुलता पटेल यांना भेटायला. स्टॅण्ड्समधून भारतीय टीमला पिपाणी वाजवत चिअर अप करणाऱ्या या आजी कॅमेऱ्यावर झळकल्या आणि इंटरनेटवर व्हायरल झाल्या.
 
पत्रकार मझहर अर्शद यांनी ट्वीट केलंय : "पहिला वर्ल्डकप खेळवला जायच्या 43 वर्षं आधी चारुलता यांचा जन्म झालाय. त्यांनी क्रिकेटर्सच्या अनेक पिढ्या पाहिल्या आहेत, पण विराट त्यांना सर्वोत्तम वाटतो. त्या फॅन ऑफ द टूर्नामेंट आहेत!"
 
टीम इंडियाला जोशामध्ये प्रोत्साहन देणाऱ्या चारुलतांचा फोटो पाहत इंग्लेंडचा माजी कॅप्टन मायकल वॉघनने म्हटलं की हा 'वर्ल्ड कप मधला सर्वोत्तम फोटो' आहे.
 
विराट कोहलीनेही याबद्दल ट्वीट केलं : "मी टीमच्या चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानतो. विशेषतः चारुलताजींचे. त्या 87 वर्षांच्या आहेत आणि मी पाहिलेल्या फॅन्सपैकी सर्वात उत्साही आहेत. वय हा फक्त आकडा असतो. पण एखाद्या गोष्टी विषयची वेड तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जातं. त्यांचे आशीवार्द घेऊन आता पुढच्या मॅचेस खेळू."
 
कोण आहेत चारुलता पटेल ?
चारूलता आजी कॅमेऱ्यावर दिसताच सर्वत्र त्यांचीच चर्चा होऊ लागली. आयसीसीची टीमही त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेली. मुलाखतीतल आजींनी सांगितलं की त्यांचा जन्म भारतात नव्हे तर टांझानियामध्ये झाला आहे.
 
त्यांनी आपली क्रिकेटची आवड आणि क्रिकेटच्या प्रेमाबाबत माहिती दिली. त्यांची मुलं काऊंटी क्रिकेट खेळतात. त्यांना पाहूनच आजी क्रिकेटप्रेमी बनल्या आहेत. आजींचे आई-वडील मूळचे भारतीय आहेत. त्यामुळे या सामन्यात भारताला पाठिंबा देण्यासाठी त्या आल्या होत्या.
 
भारत यावेळी विश्वचषक नक्की जिंकेल, असा विश्वास असल्याचं चारूलता यांनी सांगितलं. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आजी म्हणाल्या की भारताच्या विजयासाठी त्या गणपतीची प्रार्थना करतील.
 
१९८३ मध्ये जेव्हा भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता, त्यावेळीही चारूलता आजी इंग्लंडमध्येच होत्या असं त्यांनी सांगितलं.
 
क्रिकेट त्यांना खूप आवडतं, मात्र नोकरी करत असताना त्या केवळ टीव्हीवर मॅच पाहायच्या. मात्र निवृत्तीनंतर आता जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा त्या सामना पाहण्यासाठी स्टेडियमला आवर्जून जातात, असं चारूलता पटेल म्हणाल्या.