मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मुंबई पाण्यात तरीही महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 25% कमी पाऊस

- गणेश पोळ
जून महिन्यात मान्सून लांबल्यामुळे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 25 टक्के कमी पाऊस पडला आहे. दरवर्षी जूनमध्ये राज्यात सरासरी 207.6 मिलीमीटर पाऊस पडतो. पण यंदा 155.3 मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
 
कोकण प्रदेश सोडला तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यांत जून महिन्यात कमी पाऊस पडला आहे.
 
विभागनुसार पाहायचं झालं तर विदर्भात सरासरीपेक्षा 47 टक्के कमी पाऊस पडला आहे. मराठवाड्यात 33% तर मध्य-महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 21 टक्के कमी पाऊस पडला आहे.
 
यंदा मान्सून केरळ किनारपट्टीवर उशिराने दाखल झाला आहे. तसंच मान्सून सुरू व्हायच्या वेळेस भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर 'वायू चक्रीवादळ' आलं होतं. त्यामुळे मान्सून दक्षिण कर्नाटकमध्येच जास्त दिवस बरसला आहे. या सगळ्या कारणांमुळे जून महिन्यात कमी पाऊस पडला आहे, असं सांगण्यात आलं.
 
अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या काळात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर पाऊस कमी पडतो.
 
दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुण्यासारख्या शहरांना पाणीपुरवठा करणार्‍या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. मात्र, या भागातली धरणं भरण्यासाठी आणखी पावसाची गरज असल्याचे हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं.
 
यंदा महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. राज्यातील 26 जिल्ह्यांतील आणि 151 तालुक्यांत दुष्काळ आहे.
 
विभागनुसार किती पाऊस पडला?
मध्य महाराष्ट्र - पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा 21 टक्के कमी पाऊस पडला आहे.
 
कोकण - कोकणात सध्या मान्सूनने इथे जोर धरला आहे. जून महिन्यात याठिकाणी 689.7 मिलीमीटर पाऊस पडणं अपेक्षित होतं. पण याठिकाणी 642.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
 
मराठवाडा - सध्या संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट आहे. त्याठिकाणी फक्त 92.3 मिलीमीटर म्हणजे 33% कमी पाऊस पडला आहे.
 
विदर्भ - विदर्भात तर केवळ 91 मिलीमीटर पाऊस पडला हा सरासरीपेक्षा 47 टक्के कमी पाऊस पडला आहे.
 
मराठवाडा आणि विदर्भात येत्या काळात चांगला पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याचे उप महासंचालक KS होसाळीकर यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.
 


'हवामानबदलामुळे कमी पाऊस'
 
पावसाच्या काही हंगामात जूनमध्ये पाऊस कमी पडण्याचं मुख्य कारण हे नैऋत्य मान्सून उशीरा सुरु होणं. दुसरं कारण म्हणजे EL Nino चा परिणाम असतो. समुद्राच्या पाण्याचं तापमान कमी जास्त झाल्यामुळे El Niño आणि La Nina हे हवामान बदलाचे परिणाम होतात. यावर्षी ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, आफ्रिकेच्या काही देशात El Nino मुळे कमी पाऊस पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
जेव्हा जेव्हा El Niño ची स्थिती निर्माण होते, तेव्हा पॅसिफिक परिसरात वाढणारी उष्णता इतरत्रही पसरते.
 
पण जून महिन्यातला पाऊस कमी होणं हा हवामान बदलाच एक भाग आहे, असं पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर सांगतात.
 
"जेवढं कार्बन उत्सर्जन वाढेल तेवढे हवामान बदलाचे तीव्र परिणाम दिसू लागतील. शास्त्रज्ञांच्या मते येत्या 10 वर्षांत उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, अवर्षण, हे प्रकार सतत दिसतील."
 
2019मध्ये वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 411ppm इतकं राहील, असं संशोधकांनी सांगितलं आहे. 2013मध्ये कार्बन डायऑक्साईडच्या पातळीने पहिल्यांदा 400ppm ची पातळी ओलांडली होती.
 
संशोधक म्हणतात, की दीर्घकालीन अभ्यास लक्षात घेतला तर कार्बन डायऑक्साईडची पातळी सातत्याने वाढत असल्याचं दिसतं.
 
याआधी महाराष्ट्रासहित देशात जूनमध्ये मान्सूनला सुरुवात व्हायची. पण आता जून महिन्यात पडणारा पाऊस लांबणीवर पडत आहे, तसंच जूनमध्ये पडणाऱ्या पावसाचं प्रमाणही कमी झालं आहे. हवामान बदलामुळे असे प्रकार यापुढे आणखी वाढतील, असं देऊळगावकर यांचं निरीक्षण आहे.
 
'कमी पावसाचा पिकांना आणि शेतकऱ्यांना फटका'
 
"समजा दरवर्षी 100 दिवस पाऊस पडतो, पण 100 दिवसातला पाऊस 40 दिवसांतच पडला तर? अशा प्रकारामुळे पिकांवर वाईट परिणाम होतो," असं ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक सांगतात.
 
खरीप हंगामातल्या पेरण्या साधारण 7 जूनच्या दरम्यान सुरू होतात. या हंगामात उडीद, मुग, करडई, मटकी, तूर याची पेरणी होते. पण पाऊस न पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ही अशी पिकं घेण्याचं टाळलं आहे. काहींनी पेरणी केली असली तरी ते उगवणं अवघड आहे, असंही त्यांनी सांगितलं.
 
"शेतकऱ्यांनी मान्सूनचा बदलता पॅटर्न लक्षात घेतला पाहिजे. जूनमध्ये पडणारा पाऊस पेरणीसाठी महत्त्वाचा ठरतो. जून-जुलैमधला पाऊस कमी होऊन सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या पावसाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे खरीप पिकं काढणीच्यावेळी पिकांचं नुकसान होताना दिसतं," असं देऊळगावकर सांगतात.
 
स्थानिक पातळीवर पावसाचं वितरण कसं झालं याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे. एक-दोन दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर त्याचा काहीही फायदा होत नाही. महाराष्ट्रातल्या जमिनीत पाणी मुरण्याची अधिक क्षमता नाहीये, असं बुधाजीराव मुळीक सांगतात.
 
महाराष्ट्रातील शेतीवर आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर हवामान बदल आणि तापमान वाढ यांचा प्रभाव पडेल, असा दावा पर्यावरण तज्ज्ञांचा आहे.
 
हवामानातील बदल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांच्यात थेट संबंध आहे, असं मत पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केलं.
 
"गेल्या काही वर्षांत जून-जुलैमध्ये कमी पाऊस पडताना दिसतो. नंतर ऑगस्टमध्ये काही प्रमाणात आणि सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान म्हणजे खरीप पिकं काढणीच्या वेळी जास्त पाऊस पडत असल्याचं दिसून येत आहे," असं ते म्हणाले.
 
"वेळेवर पाऊस पडला नाही तर पिकं जळून जातात आणि अवकाळी पाऊस पडल्याने पिकांचं नुकसान होतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचं आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे हवामान बदलाचा शेतकऱ्यांच्या मृत्यूमागे सरळ संबंध आहे," असं ते म्हणाले.
 
हवामान बदल ही अनेक वर्षांपासून होत असणारी प्रक्रिया असल्याने ती रोखणं अवघड आहे, त्यामुळे शेतीमध्ये बदल करावे लागतील, असं तज्ज्ञांना वाटतं.
 
"हवामान बदलाशी सामना करण्यासाठी शेती व्यवसायाला अनुकूल धोरण स्वीकारावं लागेल. त्यात शेतकरी, संशोधन संस्था आणि सरकार पातळीवर प्रयत्न होणं आवश्यक आहे," असं मत देऊळगावकर यांचं आहे.