बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांच्या 'त्या' व्हीडिओमुळे पाकिस्तानचं राजकारण तापलं

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवरून पाकिस्तानातलं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. न्यायाधीशांनी दबावात येऊन नवाज शरीफ यांना शिक्षा सुनावल्याचा गंभीर आरोप मुलगी मरियम नवाज यांनी केला आहे.
 
पाकिस्तानात भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या इस्लामाबादच्या कोर्टाने न्या. मोहम्मद अरशद मलिक यांनी मरियम नवाज यांचे आरोप फेटाळले आहेत. मरियम यांच्या दाव्यानुसार, "नवाज शरीफ यांच्या विरोधात दबावात येऊन निर्णय सुनावल्याचं न्या. मलिक यांनी स्वत: स्वीकारलं आहे."
 
पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (PML-N) पक्षाच्या नेत्या मरियम नवाज यांनी आपल्या आरोपांना दुजोरा देण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात एक व्हीडिओ जारी केला.
 
या व्हीडिओमध्ये न्या. अरशद मलिक हे PML-Nचे समर्थक नसीर बट्ट यांच्यासोबत बोलताना असं कथितरीत्या सांगतात की नवाज शरीफ यांच्याविरोधात निर्णय सुनावण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं आणि दबाव आणला गेला.
 
मरियम नवाज यांच्या दाव्यानंतर पाकिस्तानात गदारोळ झाला. त्यानंतर न्यायाधीशांकडून न्यायालयाच्या रजिस्ट्रारने रविवारी दुपारी प्रेस रिलीज जारी करून, मरियम यांचा दावा फेटाळून लावला. शिवाय, हा दावा फसवणूक करणारा आणि निरर्थक असल्याचं ते म्हणाले आहेत.
 
"माझ्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कोणताही दबाव नव्हता, ना कुणी मला आमिष दाखवलं. मी खुदाला साक्षी मानून, पुराव्यांच्या आधारे निर्णय दिला आहे," असंही न्यायाधीशांकडून सांगण्यात आलं.
 
न्या. मलिक यांनी स्पष्टीकरण देतना आरोप केला की, "नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात सुनावणी दरम्यान त्यांच्या प्रतिनिधींनी मला वारंवार लाच देण्याचा प्रयत्न झाला. शिवाय, त्यांना सहकार्य न केल्यास गंभीर परिणाम भोगावं लागण्याची धमकीही दिली गेली."
 
फॉरेन्सिक चौकशीची मागणी
न्यायाधीश पुढे म्हणाले, "जर दबाव किंवा आमिषाला बळी पडून मी निर्णय दिला असता तर नवाज शरीफ यांना एका प्रकरणात निर्दोष आणि एका प्रकरणात दोषी ठरवलं नसतं."
 
न्या. मलिक यांनी 4 डिसेंबर 2018 रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अल-अजीझिया स्टील मिल्स भ्रष्टाचार प्रकरणात सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र त्याच दिवशी फ्लॅगशिप इनव्हेस्टमेंटच्या प्रकरणात शरीफ यांना निर्दोष सोडलं होतं.
 
मरियम नवाज यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, पनामा प्रकरणात नवाज शरीफ यांना तुरुंगात पाठवणारे न्या. अरशद मलिक यांच्यावर 'अज्ञात' व्यक्तींचा दबाव होता.
 
माझ्या वडिलांना आणखी तुरुंगात डांबून ठेवायला नको, असं मरियम यांनी म्हटलं. त्यांनी पुरावा म्हणून व्हीडिओ इस्लामाबाद हायकोर्टात सादर करण्याचे संकेतही दिले आहेत.
 
मरियम यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या व्हीडिओत छेडछाड करण्यात आली असून, त्याची फॉरेन्सिक चौकशीची मागणी इम्रान खान सरकारने केली आहे.
 
तसेच, इम्रान खान सरकारने याला 'न्यायसंस्थेवरील हल्ला' असं म्हटलं आहे. त्याचसोबत माहिती आणि प्रसारण प्रकरणांमधील पंतप्रधानांचे विशेष सहकारी फिरदौस आशिक यांनी व्हीडिओच्या चौकशीची घोषणा केली आहे.
 
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि PML-Nचे प्रमुख नवाज शरीफ सध्या लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात बंदिस्त आहेत.