मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

अक्षय कुमारमुळे ट्रेंड होणारं 'बॉटल कॅप चॅलेंज' नेमकं काय आहे ?

- हर्षल आकुडे
 
बॉलीवूड अभिनेता 'खिलाडी अक्षयकुमार' भारतीय सिनेमा इंडस्ट्रीत त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. आपल्या चित्रपटांमध्ये अनेक अशक्यप्राय स्टंट तो स्वतःहून करताना दिसतो. सध्या अक्षयकुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
 
या व्हीडिओमध्ये अक्षयकुमार आपल्या तंदुरूस्त शरीरयष्टीची प्रचिती सर्वांना पुन्हा एकदा देत आहे. 28 सेकंदांच्या या व्हीडिओत अक्षयकुमार गिरकी घेत हवेत उडी मारून जवळपास पाच फुटांवरच्या बाटलीचं झाकण आपल्या पायांनी उडवताना दिसत आहे.
 
हा स्टंट त्याने कोणत्याही चित्रपटासाठी केलेला नाही. किंवा त्याच्या कोणत्याही चित्रपटाचं प्रमोशन सध्या सुरू नाही.
 
बाटलीचं झाकण उघडण्याचा हा व्हीडिओ म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून ते आहे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेलं 'बॉटल कॅप चॅलेंज'.
 
ट्विटर, इन्स्टाग्रॅम आणि फेसबुकवर सध्या अनेकजण अशा प्रकारचा व्हिडिओ तयार करून टाकताना दिसत आहे. रिव्हर्स किकच्या माध्यमातून आपण किती फिट आहोत हे सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
 
कसं सुरू झालं 'बॉटल कॅप चॅलेंज'?
बॉटल कॅप चॅलेंज 25 जून रोजी सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. MMA म्हणजेच 'मिक्स्ड मार्शल आर्ट्स'च्या फायटर्सनी मजेत हे चॅलेंज सुरू केलं.
 
सर्वप्रथम कझाखस्तानचा तायक्वांदो चॅम्पियन फराबी डेवलेचिन याने याची सुरूवात केली. त्यानंतर फॅशन डिझायनर एरलसन हुग, मार्शल आर्टिस्ट मॅक्स हॉलोवे, गायक-संगीतकार जॉन मायर आणि डेथ रेस फेम अभिनेता जेसन स्टॅथम यांनीही हे चॅलेंज स्वीकारून याचा व्हीडिओ बनवला. त्यानंतर जगभरात हे चॅलेंज व्हायरल होऊ लागलं.
 
अनेक सेलेब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि व्हीडिओ पोस्ट केले.
 
जेसन स्टॅथम यांनी याचा व्हीडिओ पोस्ट करताच अक्षय कुमारने त्यातून प्रेरणा घेत बाटलीचं झाकण काढतानाचा स्वतःचा व्हिडिओ बनवला. अक्षयकुमारने ट्विटमध्ये लिहिलं, "मी स्वतःला थांबवू शकलो नाही. माझा अॅक्शन आयडॉल जेसन स्टॅथमकडून प्रेरणा घेत आहे. सर्वांनी हे चॅलेंज ट्राय करा, चॅलेंज उत्तमरित्या करणाऱ्यांचे व्हीडिओ मी रिट्विट/रिपोस्ट करीन."
 
यासोबतच अक्षयकुमारने 'फिटइंडिया' हॅशटॅग वापरत फिटनेसचा संदेशही या माध्यमातून दिला. त्यामुळे त्याच्या पोस्टनंतर परदेशात सुरू झालेल्या या चॅलेंजची क्रेझ आता भारतातही सुरू झाली आहे.
 
'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी, गुरमित चौधरी यांनीही उत्तमरित्या हवेत गिरकी घेत रिव्हर्स किक मारत बाटल्यांची झाकणं उघडली. सध्या सोशल मीडियावर 'बॉटल कॅप चॅलेंज'चीच चर्चा असून अनेक नेटिझन अनेक आगळ्यावेगळ्या प्रकारचे व्हीडिओ पोस्ट करताना दिसत आहेत.