शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जुलै 2019 (16:18 IST)

हणमंतराव गायकवाड यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

बीव्हीजी ग्रुपचे मालक हणमंतराव गायकवाड व त्यांच्या पत्नीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली. आकर्षक परताव्याच्या आमिषातून कंपनीत १६ कोटी ४५ लाख चार हजार ३६६ रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र त्याचा परतावा किंवा समभाग न देता फसवणूक केली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद रामचंद्र जाधव व त्याची पत्नी सुवर्णा विनोद जाधव (रा. विमाननगर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बीव्हीजी ग्रुपचे मालक हणमंतराव रामदास गायकवाड (वय ४६, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २६ ते ३१ मार्च २०११ दरम्यान हा प्रकार घडला.
 
फिर्यादी गायकवाड यांना आरोपी जाधव दाम्पत्याने कंपनीतील गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दिले. गुंतवणुकीस करण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादी गायकवाड आणि त्यांच्या पत्नीने आरोपी जाधव यांच्या सावा मेडिको लिमिटेड कंपनी, बायोडिल लॅबोरोटिज लिमिटेड, अनघा फार्मा प्रा. लि. या कंपन्यांमध्ये १६ कोटी ४५ लाख चार हजार ३६६ रुपयांची गुंतवणूक केली. यातील १२ कोटी ४५ लाख ९५ हजार ३७४ रुपयांची सावा मेडिको लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केली. त्याच्या मोबदल्यात एक कोटी ५३ लाख ९५ हजार २३७ रुपयांचे समभाग दिले. गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा तसेच समभाग किंवा मूळ मुद्दल न देता जाधव दाम्पत्याने फसवणूक केली.