1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 18 जुलै 2019 (09:50 IST)

‘त्या’ आमदाराची भाजपमधून हकालपट्टी

उत्तराखंडचे भाजप आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांची अखेर पक्षाने हकालपट्टी केली आहे. चॅम्पियन यांचा बंदूक हातात घेऊन नाचतानाचा व्हिडिओ वायरल झाला होता. दारु पिऊन बंदुकीसह त्यांनी नाच केला होता. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर टीकेची बातमी देणाऱ्या एका पत्रकाराला राजधानी दिल्लीत बंदूक दाखवून धमकावले होते. सोशल मीडियातून चॅम्पियन यांचे कारनामे समोर आल्यानंतर भाजपवरही टीका झाली होती. त्यामुळे पक्षाने पहिले त्यांना निलंबित केले होते. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
 
आमदारांच्या वाढत्या बेशिस्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली होती. 2 जुलै रोजी झालेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यांनी अशा नेत्यांना तंबी दिली होती. भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आणि इंदुरचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी पालिका अधिकाऱ्याला बॅटने केलेल्या मारहाणीमुळेही वाद झाला होता. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. भाजपच्या संसदीय गटाची बैठकीत बोलताना नरेंद्र मोदी यांनी कुणाचाही मुलगा असला तरी अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, अशा शब्दात कानउघडणी केली होती. तसेच असा प्रकार पुन्हा होता कामा नये. ही बाब पक्षाच्या आणि देशाच्या हिताची नसल्याचे म्हणत आकाश विजयवर्गीय प्रकरणात आपली भूमिका केली होती.