वर्धा : भरधाव वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघातात पती, पत्नी आणि मुलाचा मृत्यू
वर्धा येथील सेलू-काटे रस्त्यावर एक भीषण अपघात झाला. भरधाव वाहनाने धडक दिल्याने पती, पत्नी आणि मुलगा ठार झाले. दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला. चालक फरार असून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा सेलू-काटेजवळ चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार भोयर कुटुंब पती, पत्नी आणि त्यांच्या एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. नवोदय विद्यालयाजवळ रात्री १० वाजताच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला. मृतांमध्ये सोमनाथ भोयर (३८), निकिता सोमनाथ भोयर (३२) आणि त्यांचा १२ वर्षांचा मुलगा पूरब सोमनाथ भोयर यांचा समावेश आहे, तर ६ वर्षांचा कान्हा सोमनाथ भोयर गंभीर जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ भोयर हे त्यांच्या कुटुंबासह गणेश नगरमधील एका कार्यक्रमातून परतत होते. गावाजवळ अचानक एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे आणि फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.
Edited By- Dhanashri Naik