गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

सुबोध – भार्गवीची जमली पक्की जोडी

माणूस हा आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी दिवसरात्र कष्ट करत असतो. आपलं कुटुंब सुखी रहावं म्हणून त्याचे अतोनात प्रयत्न सुरु असतात. परंतू आनंद आणि सुख देण्याच्या जबाबदारीत तो स्वतःच्या आरोग्याकडे आणि कुठे ना कुठे कुटुंबाकडेही त्याचे दुर्लक्ष  होते. अशाच एका व्यक्तीची गोष्ट सांगणारा ज्योतीप्रकाश फिल्म्स आणि हरिश्चंद्र गुप्ता निर्मित , डॉ. राज माने लिखित आणि दिग्दर्शित ‘काही क्षण प्रेमाचे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ह्या चित्रपटात सुबोध भावे आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री ‘भार्गवी चिरमुले’ हिने दिलखुलास गप्पा मारल्या.
 
भार्गवी चिरमुले ही ह्या चित्रपटात सुबोध भावेच्या बायकोची भूमिका निभावतेय. ‘काही क्षण प्रेमाचे’ हा चित्रपट पूर्णपणे कौटुंबिक चित्रपट असून प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट आपल्याच घरातील वाटेल असे भार्गवी म्हणाली. चित्रपटातील नायक हा कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी नेहमी तणावात जगत असतो. आणि ह्याच तणावात तो आपल्या आरोग्याकडे आणि आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्षित होतो. ह्या गोष्टीची जाणीव त्याला त्याच्या आयुष्यात एक मोठी घटना घडल्यावर होते, आणि ह्याच गोष्टीतून तो आणि त्याचे कुटुंब कसे सावरते? हे ह्या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्याचसोबत स्वतःच्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करू नका,स्वतःच्या कुटुंबाकडेही लक्ष ठेवा असे भार्गवी चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगताना म्हणाली. सुबोध भावे सोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. ह्या आधीही सुबोध सोबत काम केलं असल्यामुळे आणि आम्ही दोघेही खूप जुने मित्रमैत्रीण असल्या कारणाने आमची बॉंडिंग खूपच मस्त होती आणि ह्या चित्रपटामुळे अजून पक्की झाली. त्यामुळे सुबोध सोबत काम करण खूपच सोप गेलं. असे भार्गवी सांगत होती. ह्या चित्रपटाचे निर्माते हरिश्चंद्र गुप्ता म्हणजेच हरिभाऊ. हरिभाऊंचे व्यक्तिमत्त्व खूपच चांगले आहे. दिग्दर्शक,निर्माते आणि डी.ओ.पी. ह्यांनी सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित मॅनेज केल्यामुळे आम्हांला चित्रपट करताना कोणताच त्रास झाला नाही. खूप समजूतदारपणे संपूर्ण जबाबदाऱ्या, आव्हानांना ते सामोरे गेल्याचे भार्गवी म्हणाली.
 
ह्या चित्रपटातील गाण्याचे शूटिंग दोनदा करण्यात आले होते, आणि शूट केल्यानंतर निर्मात्यांना वाटलं की हे गाणं जसं हवंय तसं मनाला भिडत नाहीये. तर पुन्हा आम्ही त्या गाण्याची शूटिंग केली. हे गाणं एका हॉस्पिटलमध्ये शूट केलं आहे. तर त्या गाण्याच्या शुटींग दरम्यान त्या हॉस्पिटलमधल्या रुग्णांशी आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप वेळ त्यांच्यासोबत घालवला. तर तो अनुभव, तो क्षण खूप छान होता आणि तो क्षण एक आठवणीतला क्षण असल्याचे भार्गवी म्हणाली. नाटक, चित्रपट आणि सिरीयल अशा तिन्ही क्षेत्रात काम केल्यामुळे तिन्ही क्षेत्रातून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. अंगिक अभिनय, वाचिक अभिनय आणि कायिक अभिनय हे तिन्ही फरक ह्या क्षेत्रातून शिकायला मिळाल्याचे भार्गवी म्हणाली.
 
आजकाल आपण खूप तणाव घेऊन सर्वत्र संचार करत असतो. पण हा तणाव घेताना आपण आपल्या तब्येतीवर खूप दुर्लक्ष करत असतो तर सर्व गोष्टी सांभाळूनआरोग्यावर आणि कुटुंबावर लक्ष दिलं तर आपण खूप सुखी राहू शकतो असा संदेश देणारा 'काही क्षण प्रेमाचे’ हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन नक्की पहावा, असे आव्हान भार्गवीने केले.