गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (15:54 IST)

आणि रमेश भाटकरचा चेहरा घराघरात पोहोचला

ज्येष्ठ अभिनेता रमेश भाटकर याचे निधन झाले आहे. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्याने अखेरचा श्र्वास घेतला. तो 70 वर्षांचा होता. रमेशने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्याचे पहिले प्रेम होते. 1975 साली 'अश्रूंची झाली फुले' नाटकात त्याने 'लाल्या'ची भूमिका निभावली होती. सुरुवातीच्या काळामध्ये दूरदर्शनवरील मालिकांच्या माध्यमातून भाटकर याचा चेहरा घराघरामध्ये पोहोचला होता. रंगभूमी हे त्याचे पहिले प्रेम असले तरी मालिकांनी त्याला खर्‍या अर्थाने लोकप्रिय केले. 1990 ते 2000 सालामध्ये त्याने अनेक मालिकांमधून अजरामर भूमिका साकारल्या. दूरदर्शनवर 1990 साली प्रदर्शित झालेल्या 'हॅलो इन्स्पेक्टर' आणि 'दामिनी' या दोन मालिकांमधील भूमिकांमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर झी टीव्हीवरील 'कमांडर' आणि डीडी टू वरील 'तिसरा डोळा' या मालिकेमधील गुप्तहेराच्या भूमिकेसाठी तो आजही ओळखला जातो. यानंतरही त्याने 'हद्दपार', 'बंदिनी', 'युगंधर' या मालिकांमधूनही काम केले. याशिवाय बी. पी. सिंग यांच्या ' सिर्फ चार दिन' या छोट्या टेलीफिल्ममध्येही रमेशने काम केले होते. काही महिन्यांपूर्वीच 'तू तिथे मी' आणि 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकांमधून त्याने अभिनय केला होता.
 
आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने 30 मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकांचे एकूण हजारांहून अधिक भाग प्रदर्शित झाले आहेत. 1990 च्या दशकामध्ये रमेश हा खर्‍या अर्थाने या टीव्हीवरील हिरो होता. गेल्याच वर्षी 98 व्या अखील भारतीय मराठी नाट्य समेंलनामध्ये भाटकरला 'जीवनगौरव'पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. वयाची सत्तरी गाठली तरी त्याचा कामाचा उत्साह जराही कमी झाला नव्हता. त्याच्या जाण्याने खर्‍या अर्थाने चिरतरुण अभिनेता गमावल्याची भावना व्यक्त होते आहे.