शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जून 2021 (16:04 IST)

'प्लॅनेट मराठी'वर ३० जूनला झळकणार 'जून' ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

काही दिवसांपूर्वी जितेंद्र जोशी, सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे - बायस यांच्यासह 'जून'च्या टीमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं, की अनेक महिन्यांपासून 'जून इन जून' च्या चर्चा रंगल्या होत्या. आता तर जून महिनाही संपत आला. कधी येणार आहे हा 'जून' प्रेक्षकांच्या भेटीला? आमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आता तरी 'जून' प्रदर्शित करा. प्रेक्षकांसोबतच आता कलाकारही 'जून'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आपल्या या मित्रमंडळींचा आणि प्रेक्षकांचा मान राखत 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी अखेर 'जून' चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे घोषित केले असून या चित्रपटाचा ट्रेलरही आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याबरोबरीनेच 'प्लॅनेट मराठी ओटीटी, 'अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनी' यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्लॅनेट मराठी सिनेमा'चा नवीन लोगोही प्रेक्षकांसमोर आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांची ही प्रतीक्षा आता संपली असून चित्रपटप्रेमी लवकरच 'जून' प्लॅनेट मराठी सिनेमावर पाहू शकणार आहेत.
 
'हिलिंग इज ब्युटीफुल' अशी टॅगलाईन असलेल्या 'जून' या चित्रपटाच्या ट्रेलरवरून साधारण अंदाज आला असेलच. नेहा पेंडसे - बायस आणि सिद्धार्थ मेनन यांचं  मैत्री पलीकडचं नातं यात पाहायला मिळणार आहे. सुप्री मीडियाचे शार्दुल सिंग बायस, नेहा पेंडसे-बायस आणि ब्लू-ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू यांनी 'जून'ची निर्मिती केली आहे. नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केले आहे. तर जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांचे शब्द लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांना शाल्मलीने संगीतबद्ध केले आहे. संवेदनशील कथानक लाभलेल्या 'जून'ने अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. नुकताच 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये सिद्धार्थ मेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जाहीर झाला आहे.
 
जून'च्या प्रदर्शनाबद्दल आणि 'प्लॅनेट मराठी ओटीटी' च्या लाँचबद्दल 'प्लॅनेट मराठी'चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर सांगतात, '' माझ्या मित्र परिवाराची आणि प्रेक्षकांची 'जून'च्या प्रदर्शनाविषयी असलेली उत्सुकता मी समजूच शकतो. परंतु ही प्रतीक्षा आता संपली असून 'जून' ३० जून रोजी प्रदर्शित होत आहे. मला एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय, की प्लॅनेट मराठी ओटीटीचा शुभारंभ 'जून'सारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाने होणार आहे. आयुष्याला जगण्याची नवी दिशा देणारा हा चित्रपट आहे. आज ट्रेलरबरोबरच आम्ही प्लॅनेट मराठी सिनेमाचा लोगोही तुमच्या भेटीला आणत आहोत. आम्हाला आशा आहे, 'जून' प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल आणि या पुढेही आम्ही असाच दर्जेदार आशय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ.''
 
'जून'ची निर्माती आणि अभिनेत्री नेहा पेंडसे - बायस 'जून' विषयी सांगते, ''जून हा नक्कीच पठडीबाहेरील चित्रपट आहे. मला खूप आनंद होतोय, की 'जून'च्या निमित्ताने सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. निखिल महाजन याने त्याच्या भावना लिहून एक उत्तम काम केले असून त्याच्या भावनांना सुहृद आणि वैभवने जिवंत केले आहे. हा एक धाडसी विषय असला तरी भावनिक आहे, त्यामुळे दुःखावर हळुवार फुंकर मारत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. प्लॅनेट मराठी खऱ्या अर्थाने या चित्रपटाला जागतिक स्थरावर प्रदर्शित करून योग्य न्याय देत आहे. यापेक्षा चांगले व्यासपीठ आम्हाला मिळूच शकले नसते.''
 
'जून'च्या प्रदर्शनाबद्दल सिद्धार्थ मेनन म्हणतो, '' एक कलाकार म्हणून हा चित्रपट आम्हा सर्वांसाठीच एक टर्निंग पॉईंट आहे. एक कलाकार म्ह्णून अधिक बारकाईने मला 'नील'च्या भूमिकेकडे बघता आले. प्रत्येकाच्या आयुष्याशी कुठेतरी साध्यर्म असलेला हा विषय प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया येतात, आता याकडे आमची उत्सुकता लागली आहे. तसेच 'प्लॅनेट मराठी' ओटीटीच्या जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 'जून'चा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे, ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे.''