शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (16:43 IST)

'गर्ल्स'मध्ये झळकणार 'हा' चेहरा!

विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून हा चित्रपट मुलींच्या अनोख्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर, पार्थ भालेराव, देविका दफ्तरदार, अतुल काळे, अमोल देशमुख, सुलभा आर्या, किशोरी अंबिये यांसारख्या अनेक कलाकारांसोबत आणखी एक नावाजलेला चेहरा झळकणार आहे. या चित्रपटात त्यांची भूमिका छोटी असली तरी ती लक्षवेधी आहे. 
 
आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे तसेच चित्रपटसृष्टीत गीतलेखन, संवादलेखन करत असतानाच 'चुंबक' सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावणारे स्वानंद किरकिरे 'गर्ल्स' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.'' स्वानंदबद्दल नरेन सांगतात की, ''एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझे आणि स्वानंद यांचे खूप जुने संबंध आहेत. आम्ही 'चुंबक' चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. 'चुंबक' चित्रपटाच्या चित्रकरणादरम्यान आमची मैत्री अधिकच घट्ट झाली. स्वानंद आणि मी एकदा बोलत असताना सहज 'गर्ल्स'चा विषय निघाला. त्यावेळी मला स्वानंद म्हणाले होते, या चित्रपटाचा मला भाग व्हायला नक्कीच आवडेल. त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी भूमिका असेल तर मला सांग. स्क्रिप्टचे वाचन सुरु असताना आम्हाला एका व्यक्तिरेखेची गरज होती, मात्र यासाठी असा चेहरा हवा होता, जो प्रेक्षकांना आवडेल. याचा विचार करत असतानाच मला स्वानंदचे शब्द आठवले आणि मला या भूमिकेसाठी स्वानंद योग्य वाटले. मी स्वानंदशी बोललो. थोडा विचार केल्यानंतर स्वानंद तयार झाले. 
 
शूटिंग रात्री तीन - साडे तीनला होणार असल्याची कल्पना मी त्यांना दिली आणि ते शूटिंगला रात्री एक वाजता सेटवर हजर होते. सकाळपर्यंत आम्ही मजामस्ती करत शूट पूर्ण केले. या क्षेत्रात अनेक जण शब्द देतात मात्र त्यातले फार कमी लोक शब्द पाळतात आणि त्यापैकीच एक स्वानंद किरकिरे. माझ्या विनंतीचा स्वानंद यांनी मान राखल्याबद्दल खरेच त्यांचे आभार.'' या भूमिकेबद्दल स्वानंद किरकिरे सांगतात, ''या चित्रपटामध्ये मी एका पोलिसाची भूमिका साकारत आहे. मी या चित्रपटामध्ये जरी पाहुणा कलाकार असलो तरी ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ज्यावेळी मला या भूमिकेसाठी विचारणा केली त्यावेळी थोडा विचार करून मी त्यांना होकार दिला. मुळात ही भूमिका माझ्यासाठी खूप वेगळी आहे. आणि अशा प्रकारची भूमिका साकारणे माझ्यासाठी नवीन होते. परंतु नरेन यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याने मी ही  भूमिका उत्तमरित्या साकारू शकलो.  मुख्य म्हणजे ''पुन्हा एकदा नरेन आणि त्यांच्या 'गर्ल्स'च्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप वेगळाच होता.
 
'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट', 'कायरा कुमार क्रिएशन्स' प्रस्तुत आणि 'अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शन'च्या अंतर्गत 'गर्ल्स' या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. तर चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.