1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (16:29 IST)

सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार निर्मित व प्रणय चोकसी आणि ‘डान्सिंग शिवा’ प्रस्तुत मराठी बहुचर्चित चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ हा सिनेमा ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून आत्तापर्यंत या सिनेमाचे पोस्टर, टीझर, गाण्याला प्रेक्षकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आहे. सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’मध्ये सोनाली कुलकर्णी मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून आता ती एकदम नव्या लूकमध्ये या चित्रपटात प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीजरने प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली असतानाच नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ, रमा जोशी, दिग्दर्शक सौरभ वर्मा आणि चित्रपटातील इतर कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला. 

या ट्रेलरमध्ये सोनाली कुलकर्णी ही ‘विक्की वेलिंगकर’च्या भूमिकेत दिसत असून ट्रेलरच्या सुरूवातीला ती एक कॉमिक बूक आर्टिस्ट आहे. तिचे बूक आणि घड्याळाचे दुकान असून ती कोणापासून तरी पळताना दिसत आहे. पण ती कोणापासून, कशासाठी आणि किती वेळ पळणार आहे याचे उत्तर तिच्याकडे नसून ती हे वेळेचं कोडे सोडविण्याचा प्रयत्न करते आहे. पुढे या ट्रेलरमध्ये ‘मास्क मॅन’ देखील दिसत असून ती त्याच्यापासून पळते आहे असे लक्षात येते. हे वेळेचे कोडे उलघडण्यासाठी तिला तिचा हॅकर मित्र, विद्या आणि पबजी आजी मदत करताना दिसत आहे. हा ट्रेलर बघितल्यानंतर “ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?, मास्क मॅन नक्की कोण आहे? हा वेळेचा नक्की काय खेळ आहे, चित्रपटामध्ये वेळेचा, विक्की, विद्या, आणि मास्क मॅनचा नक्की काय संबंध आहे, असे अनेक उत्कंठादायक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे सिनेमाबद्दलची उत्कंठा अधिकच ताणली गेली आहे. 
 
या सिनेमामध्ये विक्कीची भूमिका सोनाली कुलकर्णी हिने साकारली असून स्पृहा जोशीने विद्या, संग्राम समेळने हॅकर मित्राची तर रमा जोशी यांनी पबजी आजीची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे यांच्यादेखील महत्त्वाच्या  भूमिका आहेत. 
 
“विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहणाऱ्या नायिकेची ही कथा आहे,” असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. त्यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘७ अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 
 
‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार म्हणतात, ‘या सिनेमाच्या टीझरला समाज माध्यमांवर उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 
 
चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी आणि सर्व कलाकारांनी खूप चांगले काम केले आहे, दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनीदेखील खूप उत्तमप्रकारे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी कथेला योग्य न्याय दिला आहे, त्याचबरोबर या सिनेमाचा ट्रेलर खूप उत्कंठादायक झाला असून प्रेक्षकांचा या ट्रेलरला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्ही आशा करतो आणि प्रेक्षकांनी हा ट्रेलर पाहिल्यानंतर ते देखील ६ डिसेंबरची वाट नक्की बघतील, असे आम्हाला वाटते’.
 
सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार तसेच प्रणय चोकसी, डान्सिंग शिवा प्रॉडक्शनचे अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा आणि लोकीज स्टुडीओचे सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.