शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (12:26 IST)

'बोनस’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

अर्जुन सिंग बरन व कार्तिक डी निशाणदार आणि ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ प्रस्तुत; गोविंद उभे, अनुपमा कराळे, कांचन पाटील व जीसिम्स निर्मित मराठी चित्रपट ‘बोनस’चा ट्रेलर मंगळवारी मुंबईत एका भव्य अशा समारंभात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या यापूर्वीच प्रकाशित झालेल्या पोस्टर आणि टीझरनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलेले असताना हा नवा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यामुळे या चित्रपटाबद्दलची रसिकांमधील उत्कंठा अधिक वाढली आहे. मात्र त्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 
ट्रेलर प्रकाशनाच्या या शानदार समारंभाला चित्रपटातील कलाकार गश्मीर महाजनी, पूजा सावंत, मोहन आगाशे आणि जयवंत वाडकर, दिग्दर्शक सौरभ आर भावे आणि प्रस्तुतकर्ता तसेच निर्माते हजर होते.
 
आज प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची अधिक माहिती रसिकांना दिली असून त्यामुळे या चित्रपटाबद्दल आणखी हवा चित्रपटसृष्टीत निर्माण झाली आहे. या चित्रपटाची कथा एका सुखवस्तू कुटुंबातील युवकाभोवती फिरते. तो एका सर्वसामान्य मजुराप्रमाणे एक महिना आयुष्य व्यतीत करण्याचे आपल्या आजोबांचे आव्हान स्वीकारतो आणि त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. या युवकाने त्याच्या आजोबांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या निर्णयावर टीका केलेली असते, त्यातून हे आव्हान आजोबा त्याला देतात. आठ हजार रुपयांमध्ये महिना काढण्याचे आव्हान तो स्वीकारतो. तो एका कोळीवाड्यात ८० चौरस फुटांच्या झोपडीत राहतो. त्यादरम्यान त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या जीवनशैलीशी जुळवून घेणे कठीण होते.
 
‘छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख आहे,’ अशी टॅगलाईन त्याच्या या ट्रेलरवर अवतरते. त्यातून ही कथा पुढे सरकते आणि शेवटी एक सामाजिक संदेश देत संपते. त्या कोळीवाड्यातच तो त्याच्या प्रेयसीला भेटतो. तिची भूमिका पूजा सावंतने साकारली आहे. नायक आपले आव्हान पूर्ण करतो की त्यात त्याला हार मानवी लागते? त्याच्या प्रेमकथेचा शेवट गोड होतो? त्याच्या प्रेयसीच्या युक्तीवादाला तो योग्य उत्तरे देतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 
 
या चित्रपटाची सध्या अख्ख्या चित्रपटसृष्टीत चर्चा आहे, ती विविध कारणांसाठी. या चित्रपटाची कथा तर अनोखी आहेच, पण पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी हे सौंदर्यवान कलाकार अगदी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. गश्मीर आणि पूजा यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने चित्रपट रसिकांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे. ‘बुडायची भीतीच माणसाला पोहायला शिकवते’ ही टॅगलाईन गश्मीरच्या पोस्टरवर आहे. त्यातून हा युवक एका आव्हानाचा सामना करतो आहे, ही बाब व्यतीत होते. मंगळवारी जो ट्रेलर प्रदर्शित झाला तो या कथेवर आणखी प्रकाशझोत टाकतो.
 
हा सिनेमा रंगीबेरंगी आणि सदाबहार अशा कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतो. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत ‘बोनस’ चित्रपटात एक वेगळीच भूमिका साकारत आहे.
 
गश्मीर महाजनीने अगदी कमी वेळातच आपली अशी वेगळी छाप चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. देऊळबंद, कान्हा, वन वे टीकेट आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही यांसारखे त्याचे चित्रपट गाजले आणि त्यातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुक झाले. तब्बल दोन वर्षांनी तो मराठी चित्रपटांमध्ये पुन्हा दिसणार आहे. हिंदी चित्रपट आणि टेलीव्हीजन मालिका यांमुळे तो काही काळ मराठी चित्रपटांमध्ये दिसला नव्हता. त्यामुळेही त्याच्या या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षकांना आहे.
 
चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात युवा दिग्दर्शक सौरभ भावे याने केले आहे. त्यांची ओळख एक प्रख्यात कथा आणि पटकथालेखक म्हणून चित्रपटसृष्टीत आहे. त्यांनी कित्येक मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यांत हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक आदी चित्रपटांचा समावेश आहे.
 
या चित्रपटाची प्रस्तुती जीसिम्सच्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांची आहे. जीसिम्सने याआधी मोगरा फुलला, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण या चित्रपटांची निर्मिती केली असून भिकारी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. जीसिम्स हा भारतातील एक आघाडीचा स्टुडीओ असून तो चित्रपट, टीव्ही आणि वेब सिरीज निर्मिती आणि प्रतिभा व्यवस्थापन तसेच उपग्रह संयोजन या क्षेत्रांमध्ये अग्रणी आहे.