1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 14 मार्च 2022 (18:45 IST)

जुई गडकरीला झालेले Rheumatoid Arthritis आणि प्रोलॅक्टिन ट्युमर हे नेमके काय आजार आहेत?

'मी थकले होते या सगळ्याला... विचार करुन डोकं सुन्नं व्हायचं... एक दिवस सगळ्या गोळ्या औषधं फेकून दिल्या, प्रिस्क्रिप्शन पेपर्स फाडून टाकले आणि स्वतःला सांगितलं you have been a fighter since childhood!'
 
अभिनेत्री जुई गडकरीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जुईनं या पोस्टमध्ये तिला 2013 सालापासून तिला ज्या शारीरिक समस्यांना, आजारांना सामोरं जावं लागलं त्याबद्दल सविस्तर लिहिलं आहे.
 
जुईचे ते सगळे अनुभव वाचल्यानंतर तिच्या धाडसाचं कौतुक होत आहे, तिला निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या जात आहेत.
 
पुढचं पाऊल, बिग बॉस मराठी यांसारख्या मालिकांमधून जुई गडकरी घराघरांत पोहोचली आहे.
जुईनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे-
 
मला कळेना हे सगळं अचानक काय झालं?
2013 साली सहयाद्री चॅनेलचा डान्स इव्हेंट करून घरी येत असताना पावलं इतकी सुजली की चपलेशिवाय ड्राइव्ह करावं लागलं. मला वाटलं डान्स इव्हेन्ट करुन पाय सुजले असतील. सकाळी मला उठताच येईना. मान-पाठ अवघडलेली. मला काही सुचेना. 'पुढचं पाऊल'चं शुटींग तेव्हा सुरु होतं.
 
बरं नाही आज येत नाही असं सांगुन सुट्टी घेणं या फिल्डमध्ये शक्य नसतं! पण तरी ही मी विचारुन बघितलं आणि मला सुट्टी दिली गेली. डॉक्टरांनी physical tests करुन एक्स रे काढायला सांगितला. एक्स रे बघून त्यांनी म्हटलं की, "मला वाटलं होतं तेच झालय. MRI आणि ब्लड टेस्ट करायला सांगिल्या. मी आणि आई full tension मध्ये! MRI झाला. पहिल्यांदा त्या MRI च्या बोगद्यात जाताना attack येतो की काय अशी स्थिती झाली होती माझी. काहीवेळात रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी आत बोलावलं.
 
मणक्यात Cervical, lumbar मध्ये Cord compression (मणक्या खालची मऊ गादी फाटून त्या खालच्या मेंदुला जाणाऱ्या नसा दाबल्या जाताहेत), आणि मणका सरळ झालाय असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यातले काही मणके एकमेकांना चिकटलेले MRI मध्ये स्पष्टं दिसत होते!
 
"फिजिओ थेरपी करावी लागेल. स्पाइन डॅमेज पाहता सर्जरी करावी लागेल. पण तुमचं वय खूप कमी आहे (24 वर्षं) म्हणून सर्जरी सजेस्ट नाही करणार," असं डॉक्टर म्हणाले.
 
"तुमचा अॅक्सिडेंट झाला होता का? कधी जोरात पडलात का?" असंही त्यांनी विचारलं. मी आणि आई पटकन म्हणालो, "कधीच नाही"!
 
डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आणि एक महिना बेडरेस्ट सांगितली. आजारापेक्षा जास्त टेन्शन मला सुट्टी मिळणार नाही याचं आलं! सुट्टी मिळाली नाही, पण सीन कमी करुन सेटवर दर सिननंतर आडवं होता येईल अशी अॅडजस्टमेंट झाली!! ब्लड रिपोर्टस आले. थायरॉइड आहे असं कळलं!! अजून एक भर! (त्या दरम्यान माझं वजन ६ किलो वाढलं होतं. केस, भुवया, पापण्या गळत होत्या).
मला कळेना हे सगळं अचानक का? मला जिम, डान्स, ट्रेकिंग सगळं बंद करायला सांगितलं. जमिनीवर बसायचं नाही, वजन ऊचलायचं नाही, पळायचं नाही, वाकायचं नाही, ड्राइव्ह करायचं नाही, नो हॉर्स रायडिंग...अशी कुठलीच गोष्ट करायची नाही ज्याने मणक्याला त्रास होईल असं सांगितलं!
 
मी मुळात उडाणटप्पू! ट्रेकिंग, जिम, घरातली काम हे सगळं मला खूप आवडतं आणि तेच सगळं बंद म्हटल्यावर मला त्याचं डिप्रेशन जास्त आलं. या सगळ्याशी अॅडजस्ट करत करत चार वर्षं गेली. इम्प्रूव्हमेंट एवढीच होती की वेदना कमी होत्या.
 
MRI मशीनच्या कर्कश आवाजातच झोप लागायची
काही दिवसांनी माझ्या Dates चा problem सुरु झाला. महिना झाला तरी काही घडेना, तेव्हा मी 'पुढचं पाऊल' सोडली. खूप कठीण दिवस होते ते. कोणाला काही सांगताही येईना. माझ्या गायनॅकने काही टेस्ट सांगितल्या.
 
रिपोर्टस आल्यावर त्यांनी Brain MRI सांगितला! आणि तिथे मी खरी घाबरले. MRI साठी मशीनमध्ये गेले, 20 मिनिटांनी बाहेर काढून मला मनगटात इंजेक्शन लावून पुन्हा आत नेलं (contrast) बघण्यासाठी.
 
20 मिनिटांनी परत बाहेर आले. मला त्या इंजेक्शनने चक्कर येत होती. मी अर्धा तास तिथेच बसले होते. मला DY Patil चा स्टाफ ओळखत असल्यामुळे त्यांनी माझा रिपोर्ट लवकर तयार केला. मला आणून दिला. मी जरा रिलॅक्स होत होते, तेवढ्यात Radiologist म्हणाले डॉक्टरांना दाखवून घ्या, प्रॉब्लेम आहे आणि मी थरथरायला लागले. नेरुळ ते ठाणे हा प्रवास तेव्हा दहा तासांचा वाटला...
 
माझ्या गायनॅककडे गेले तेव्हा तिने मला सांगितलं, "टेन्शन घ्यायचं नाही, डिप्रेस व्हायचं नाही, सगळ्यांनाच मुलं-बाळं होतात असं नाही, सायन्स आहेच त्यावरुन आपण प्रयत्न करु शकतो."
 
मी म्हटलं झालंय काय नक्की? त्यावर त्या म्हणाल्या "तुला Prolactin Tumour आहे" मी आणि आई गप्प…
 
मग डॉक्टरांनी समजावल्यावर त्याची गंभीरता कळली आणि तेव्हा मी थोडीशी खचले! हो थोडीच...कारण पुढे अजून मोठी परीक्षा येणार होती. मी तेव्हा हा विचार केला नाही की, मूल-बाळ होईल ना होईल पण तेव्हा सगळ्यांत जास्त महत्त्वाचं होतं स्ट्राँग होऊन accept करणं...मला खूप वाईट वाटलं पण मला स्वतःसाठी उभं राहायचंच होतं. माझी तीही treatment सुरु झाली!
 
आठवड्याला एक गोळी होती ट्युमरची, पण त्याचा खुप त्रास व्हायचा. मळमळ, चक्कर सतत सुरु आणि अशा सगळ्यांत रोजचं शूटिंग, ड्राइव्हिंग वगैरे. या सगळ्यात मी फिट राहण्यासाठी डॉक्टरांना विचारुन काय exercise करता येईल हे शोधून काढलं.
 
Spinning (heavy cardio) सुरु केला. मला बरं वाटू लागलं! मी स्वतःसाठी काहीतरी करत होते रडत न बसता... हळूहळू दोन वर्षं गेली. वजन कमी झालं, blood reports normal झाले. I started living with all these medical things. I was so comfortable with MRIs की त्या कर्कश आवाजात मला मशिनमध्ये झोप लागायची!
 
विचार करून डोकं सुन्न व्हायचं
अणि एक दिवस अचानक मला चक्करेचा मोठा झटका आला. मी झोपल्या जागी सतत कुशीवर वळत होते, सगळं फिरत होतं मला प्रचंड ढवळत होतं. इतकं की मी स्वामी समर्थांचा जप सुरु केला. मला वाटलं मी आता यातून काय बाहेर येत नाही. पण चमत्कारासारंखी चक्कर कमी झाली. पण जीभ जड होती. दोन-तीन तासांनी त्यावर कंट्रोल आला. माझ्या कानात landline cross connection ला जो कर्कश आवाज येतो तसे आवाज येत होते.
माझ्यासाठी हे खूप विचित्र होतं...भयावह... डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी काही टेस्ट केल्या आणि सांगितलं मणक्याच्या त्रासामुळे Positional Vertigo episodes होताहेत. त्यावर त्यांनी म्हटलं की, काळजी घ्यायला हवी खूप. मी परत level zero ला आले.
 
हे सगळं का? मीच का? असे अनेक विचार येऊ लागले. माझं जे जे पूर्ववत होत होतं त्यावर परत बंधनं आली. मी पूर्ण खचले. मला chiropractor कडे जावं लागायचं पुण्याला. तिथे ते माझ्या मानेत dry needling करायचे! सुया मानेच्या मसल्समध्ये घालून blood flow stimulate करायचे. मी थकले होते या सगळ्याला. विचार करुन डोकं सुन्नं व्हायचं.
 
एक दिवस सगळ्या गोळ्या औषधं फेकून दिली आणि स्वतःला सांगितलं you have been a fighter since childhood! Already 6-7 वर्षं यात गेली! पुढचं आयुष्य यात घालवायचं नाहीये! आणि कामाला लागले.
 
नियमित योग, शाकाहारी आहार, lifestyle change हे सगळं सुरु केलं. बरं हे सगळे त्रास सुरु असताना शूटिंग्ज सुरु होती. हवा तसा आराम मिळत नव्हता. हे सगळं थांबतच नव्हतं. गोळ्यांच्या हीट मुळे infections, acidity सतत सुरु होतं. महिन्यातले चार-पाच दिवसच मान, डोकं दुखत नसेल. बाकी कधीही migraine attack 15-20 दिवस सुरुच. तेव्हा माझ्या Brain surgeon ने मला blood inflamation test करायला सांगितली आणि हाडांची सतत होणाऱ्या झीजेचा खरा छडा लागला मी RA positive होते. आजही आहे. RA (rheumatoid arthritis).
 
हा असा आजार आहे जो बरा होत नाही म्हणे! हा Auto immune disease आहे. Hereditary असतो. या आजारात तुमची इम्युन सिस्टीमच तुमच्या चांगल्या टिश्यूवर attack करत राहते. तुमचे सांधे जाम होऊ लागतात. तुमच्या शरीराचा एकेक अवयव त्याच्या विळख्यात येत जातो. हे ऐकून उरलं सुरलं अवसान गळून गेलं होतं. पण मी मनाशी एक गोष्टं ठरवून होते. काही झालं कितीही शरीर आखडलं तरी No excuses! Regular exercise करायचीच!
 
आपल्या पाठिशी आपल्या गुरुचं बळ असेल तर काहीही शक्य आहे! फक्तं विश्वास हवा...
 
रुमेटोईड आर्थरायटिस (Rheumatoid Arthritis) म्हणजे काय?
हा एक ऑटो-इम्युन आजार आहे. हा संधी वाताचाच एक प्रकार आहे.
 
फोर्टिस रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. कौशल मदान याबद्दल अधिक सांगताना म्हणतात, "या आजारात रोगप्रतिकारशक्ती चुकीने शरीरातील चांगल्या पेशींवर हल्ला करते. ज्यामुळे सांध्यांना इजा होते."
 
रुमेटोईड आर्थरायटिसला हिंदीमध्ये (बोली भाषेत) 'गाठिया' असं म्हणतात.
"कमी वयातच महिलांना हा आजार होतो आणि दुखणं दिवसागणिक वाढत जातं," डॉ. मदान पुढे म्हणाले.
 
रुमेटोईड आर्थरायटिसमध्ये गुडघे, हात आणि बोटांवर परिणाम होतो. काही रुग्णांमध्ये हृदय, त्वचा, डोळे, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्यांनाही इजा होण्याची शक्यता असते.
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार रुमेटोईड आर्थरॅटिसमध्ये सांध्यांना सूज येते. हाडांची झीज झाल्यामुळे सांधेदुखी सुरू होते.
 
महिलांना या आजाराचा त्रास जास्त का होतो?
तज्ज्ञ सांगतात की, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार तीनपट जास्त असल्याचं दिसून आलंय.
 
याची दोन प्रमुख कारणं डॅा मदान सांगतात- महिलांची रोगप्रतिकारशक्ती जास्त रिअॅक्टिव्ह असल्याने त्यांना पुरुषांपेक्षा जास्त त्रास होतो आणि महिलांच्या शरीरात सतत कमी-जास्त होणाऱ्या हार्मोन्समुळेदेखील हा आजार होण्याची शक्यता वाढते.
 
लक्षणं कोणती?
सांधेदुखी, सांधे लाल होणं
सांध्यांना येणारी सूज
सांध्यांना इजा झाल्यामुळे विकृत होणं
लंगडत चालणं आणि सांध्यांचं कार्य मंदावणं
अॅनिमिया, डिप्रेशन
या आजाराने ग्रस्त काही रुग्णांमध्ये त्वचा, डोळे, फुफ्फुस, किडनी, हृदय यांसारख्या अवयवांवरही परिणाम झाल्याचं दिसून येतं, असं तज्ज्ञ म्हणतात.
 
डॉ. मदान सांगतात, "रुमेटोईड आर्थरायटिसचे रिस्क फॅक्टर थांबवणं आपल्या हातात नाहीत. पण वजन योग्य ठेवलं पाहिजे आणि आपण काय काम करतो यावर लक्ष असणं गरजेचं आहे."
 
प्रोलॅक्टिन ट्युमर काय आहे?
प्रोलॅक्टिन ट्युमर हा पिट्युटरी ग्रंथीमध्ये होणारा ट्युमर आहे. शरीरात प्रोलॅक्टिन हार्मॅानचं प्रमाण वाढल्याने हा ट्युमर होतो.
 
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके सांगतात, "प्रोलॅक्टिन ट्युमरचे शरीरावर विविध परिणाम होतात. यामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही किंवा काही रुग्णांमध्ये अजिबात येत नाही."
 
ट्युमर मोठा असेल तर डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. प्रोलॅक्टिन ट्युमर जीवघेणा नसला तरी शरीरात सेक्स हार्मोन कमी होतात आणि वंध्यत्व येण्याची शक्यता असते.
 
प्रोलॅक्टिन ट्युमरची लक्षणं कोणती?
मासिक पाळीत येणारी अनियमितता किंवा मासिक पाळी न येणं
सेक्स करण्याची इच्छा कमी होणं
गर्भधारणा होण्यात येणाऱ्या अडचणी
यावर उपचार काय?
डॉ. कटके पुढे सांगतात, "प्रोलॅक्टिन ट्युमर छोटा असेल तर औषधांच्या मदतीने उपचार केले जातात. जेणेकरून शरीरातील प्रोलॅक्टिनची मात्रा संतुलित झाल्यामुळे ट्युमरचा आकार कमी करता येतो. ट्युमर मोठा असेल तर शस्त्रक्रिया आणि रेडिएशनच्या मदतीने यावर उपचार केले जातात."
 
प्रोलॅक्टिन ट्युमरचा त्रास असलेल्या महिलेला कायम वंध्यत्व येतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. कटके सांगतात, "शरीरातील प्रोलॅक्टिनचं प्रमाण संतुलित झालं की महिलांची पाळी नियमित होते. ज्यामुळे महिला गर्भवती राहू शकतात."
फोटो साभार -सोशल मीडिया(फेसबुक)