1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 12 मार्च 2022 (10:59 IST)

गश्मीर मृण्मयीला म्हणतोय 'ही जादू तुझी'

'विशू' एक अनोखी प्रेमकहाणी घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले होते. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रेमात पडल्यावर भावना अबोल होतात आणि डोळे बोलू लागतात, सर्वत्र तिचा, त्याचा भास होऊ लागलो, दिवसाही स्वप्नं पडू लागतात. सारं काही जादुई वाटते, अशी ही प्रेमाची जादू या गाण्यातून सर्वत्र पसरणार आहे. 'ही जादू तुझी' असे या गाण्याचे बोल असून हे गाणे मृण्मयी गोडबोले आणि गश्मीर महाजनी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हे एक रोमँटिक साँग असून या गाण्यात गश्मीर मृण्मयीच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे दिसत आहे. गाण्याचे बोल, संगीत रसिकांना भावणारे असून प्रत्येकाला प्रेमात पाडणारे हे गाणे आहे. 
 
'विशू'बद्दल मृण्मयी गोडबोले आणि गश्मीर महाजनी म्हणतात, ''या चित्रपटात एक सुंदर प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. 'ही जादू तुझी' हे चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूपच सुंदर आणि प्रेमाची तरल भावना व्यक्त करणारे हे गाणे आहे. प्रत्येक प्रियकर- प्रेयसीला आपल्या प्रेमाच्या 'त्या' सुंदर दिवसांची आठवण करून देणारे हे गाणे आहे. 'विशू'च्या निमित्ताने आम्ही दोघे एकत्र स्क्रीन शेअर करणार आहोत. प्रेक्षकांना आमची केमिस्ट्री नक्कीच आवडेल.'' 
 
'ही जादू तुझी' या गाण्याला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले असून हृषिकेश कामेकर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर या प्रेमगीताला आवाजही हृषिकेश कामेकर यांचाच लाभला आहे. श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात गश्मीर, मृण्मयीसोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'विशू' हा चित्रपट ८ एप्रिलपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.