शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मार्च 2022 (11:33 IST)

'मी वसंतराव'चे संगीत श्रोत्यांच्या भेटीला.. शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत रंगला संगीत सोहळा !

Music of 'Me Vasantrao' to the audience .. Rangala Music Festival in the presence of Shankar Mahadevan!
तुमचे घराणे कोणते? या खोचक प्रश्नावर 'माझं घराणं माझ्यापासूनच सुरु होतं' हे धाडसी उत्तर देण्याची ताकद पंडित वसंतराव देशपांडे यांनी त्यांच्या गायकीतून सिद्ध केली. उन्मुक्त मोकळेपण त्यांच्या स्वरातून आणि आविर्भावातून कायमच व्यक्त होत आले आहे. या असामान्य गायकाने शास्त्रीय संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. आणि आता या महान कलाकाराच्या जीवनावर आधारित 'मी वसंतराव' हा चित्रपट गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्वाचं म्हणजे वसंतरावांचे नातू आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, या चित्रपटाच्या निमित्ताने संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.
 
आजपासून या चित्रपटातील गाणी रसिकांच्या भेटीला आली असून हा सांगितिक सोहळा सुप्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत पार पडला. यानिमित्ताने राहुल देशपांडे यांनी आपल्या आजोबांनी अजरामर केलेलं नाट्यगीत 'घेई छंद' एका नव्या दमदार रूपात सादर केले. आणि याच सप्तरंगी अल्बममधील ‘घेई छंद’ याच गाण्याचा पहिला व्हिडीओ आज प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
 
या चित्रपटाचे संगीत म्हणजे प्रेक्षकांसाठी मुक्त अशा विविध रंगांची उधळण असणार आहे. यात ठुमरी, भैरवी, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तीगीत, गझल इ. असे संगीताचे विविध प्रकार ऐकायला, पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात एकूण बावीस गाणी असून मनाला भिडणाऱ्या या गाण्यांना दिग्गज गायकांचे स्वर लाभले आहेत. यात श्रेया घोषाल, उस्ताद रशीद खान, राहुल देशपांडे, आनंद भाटे, विजय कोपरकर, अंजली गायकवाड, प्रियांका बर्वे, सौरभ काडगांवकर, जिज्ञेश वझे आणि हिमानी कपूर असे दर्जेदार गायक आपलं गाणं सादर करणार आहे. या गाण्यांना वैभव जोशी, मंगेश कांगणे आणि मयुरेश वाघ यांनी शब्दबद्ध केले आहे.
 
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगीत दिग्दर्शक म्हणून राहुल देशपांडे हे या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यासमोर येणार आहेत. या निमित्ताने राहुलने पहिल्यांदाच लावणी गाण्याचा प्रयत्न केला असून त्याला दमदार साथ ऊर्मिला धनगरने दिली आहे.
 
पं. वसंतराव देशपांडे, या चित्रपटाचं संगीत आणि राहुलबद्दल शंकर महादेवन म्हणाले, ''मी स्वतः पं. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचा चाहता आहे. माझ्या लहानपणी श्रीनिवास खळेकाकांकडे शिकत असल्यापासून मी त्यांचं गाणं ऐकत आलो आहे. त्यांची गायकी अत्यंत वेगळ्या आणि अवघड वळणाची असून ती अनेकदा अक्षरशः अंगावर शहारा आणते. योगायोग म्हणजे माझ्या संगीताच्या कारकिर्दीतील पहिलं गाणं हे वसंतरावांचंच गायलं होतं. ‘बगळ्यांची माळ फुले’ असे या गाण्याचे बोल होते. आज मला इथं या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली. यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पुढे अनेकदा मला त्यांची गाणी सादर करण्याचं भाग्य लाभलं आणि अजून एक योगायोगाची गोष्ट म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली' या त्यांच्या नाटकावर जेव्हा चित्रपट बनला तेव्हा त्याचं ‘घेई छंद’ हे गाणं माझ्यावर चित्रीत झालं. आज वसंतरावजींचा वारसा अत्यंत सक्षमपणे राहुल पुढे नेत आहे. इतक्या महान गायकावर, शास्त्रीय संगीतावर, आजच्या काळात असा चित्रपट निर्माण करण्याचं स्वप्न घेऊन ते प्रत्यक्षात उतरवण्याचं धाडस करणं, याबद्दल राहुलचं, निपुण आणि त्याच्या संपूर्ण टीमचं मी खूप खूप अभिनंदन करतो.”
 
या संगीत प्रकाशनाच्या सोहळ्यादरम्यान राहुल देशपांडे म्हणतात, “आजोबांना गायकीचा वारसा त्यांच्या आईकडून मिळाला आणि मला त्यांच्याकडूनच. आजोबांना जे स्फुरलं, भावलं तेच ते गायले. त्यांच्या सान्निध्यात राहून मला त्यांच्याकडून गायनाचे धडे गिरवता आले नसले तरी त्यांची गायकी ऐकतच मी संगीतातील अनेक बारकावे शिकलो. त्यांची संगीताविषयी असलेली आस्था घरातील तसंच त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींकडून ऐकत आलो आहे. शास्त्रीय संगीतातील हे एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ते माझे आजोबा आहेत, यापेक्षा अभिमानास्पद काय असू शकते? त्यांच्या गायकीची सर माझ्या गायकीला नक्कीच येणार नाही. मात्र माझ्या बाजूने मी त्यांच्या गायकीला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.”
 
जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली आहे. निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.