मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 जानेवारी 2019 (09:13 IST)

‘व्हॉट्सॲप लव’ बंधनात राकेश बापट आणि अनुजा साठे

हिंदी आणि मराठी दोन्ही मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने स्वतंत्रपणे नाव कमावलेले हॅन्डसम हंक राकेश बापट आणि ‘स्टार’ची फेवरेट बेटी अनुजा साठे हे दोघे ‘व्हॉट्सॲप लव’ बंधनात अडकणार आहेत. बॉलीवूड आणि हिंदी टेलिव्हीजनवर प्रेक्षकांची पसंती मिळविलेल्या ह्या दोन्ही कलाकारांनी मातृभाषा मराठीतही अनेक चित्रपटांमध्ये स्वतंत्रपणे प्रमुख भूमिका साकारल्या असल्या तरी ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘व्हॉट्सॲप लव’ ह्या मराठी चित्रपटात दोघे पहिल्यांदा एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे हिंदी मनोरंजनविश्वाला दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या जोडीची मराठमोळी ‘व्हॉट्सॲप लव’ स्टोरी पाहणं औत्सुक्याचे ठरेल.  
 
शो मॅन म्हणून संगीतविश्वात ओळखले जाणारे हेमंतकुमार महाले यांची कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती असलेल्या ‘व्हॉट्सॲप लव’ ह्या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पोस्टरवर एकमेकाकडे पाठमोरे परंतु एकाच टेबलवर हातात मोबाईल घेऊन बसलेले राकेश बापट आणि अनुजा साठे आणि त्यात अनुजाचं राकेशच्या मोबाईल मध्ये तिरक्या नजरेने पाहणं चित्रपटाच्या आशयासंदर्भात अनेक संकेत देऊन जातात. त्यामुळे चित्रपटाचे शीर्षक आणि पोस्टर पाहून चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण होते.
 
“व्हॉट्सॲप लव ह्या चित्रपटाची कथा ही सध्या जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या न त्या मार्गाने घडत आहे. कृत्रीम संबंध, भावभावना जोपासताना तारेवरची होणारी कसरत आणि भौतिक सुखाचा माग घेताना सांडत चाललेला खरेपणा आणि आलेले एकाकीपण नव्या संपर्कयंत्रणेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत बनवला आहे. आणि व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येकाला हा चित्रपट पाहून आनंद होईल, याची मला खात्री आहे” असे कथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माता हेमन्तकुमार महाले यांनी सांगितले.
 
व्हॉट्सॲप हा सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. केवळ व्हॉट्सॲप वरून सर्वांशी संपर्कात राहाता येत असल्याने युवकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेत. व्हॉट्सॲप वरून आलेल्या संदेशातील भावभावनांचा ओलावा किंवा शब्दांमागील भावार्थ ज्याच्या त्याच्या समजण्यावर अवलंबुन असतो. त्यामुळे अनेक समज - गैरसमज निर्माण होतात आणि पुढे प्रसरण पावतात. पण, थेट संवाद साधण्यासाठी न धजावणाऱ्या व्यक्तिलाही आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं अधिक सोपे वाटू लागल्याने प्रेम प्रकरणात व्हॉट्सॲप मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे. पण, ‘व्हॉट्सॲप लव’ ह्या सिनेमाची व्हॉट्सॲप लव्हस्टोरी नेमकी काय आहे? हे फक्त राकेश बापट आणि अनुजा साठे ह्या दोघांनाच माहिती. त्यामुळे हे व्हॉट्सॲप लव प्रकरण जाणून घेण्यासाठी हेमंतकुमार म्युझिकल ग्रुपची निर्मिती असलेला व्हॉट्सॲप लव ह्या चित्रपटाची ५ एप्रिल पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या कॅमेऱ्याने टीपला असून पिकल एंटरटेनमेन्टचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी हे वितरणाची धुरा वाहणार आहेत.